चालू वर्षी जिल्ह्यात टप्प्या-टप्प्याने अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाच्या अहवालावर लोकप्रतिनिधींनीही वेळोवेळी नाराजी व्यक्त केल्यानंतर मंत्र्यांच्या बठकीत हा मुद्दा चांगलाच गाजला. चार वेळा सर्वेक्षण व त्या अनुषंगाने आढावा बैठका झाल्या. मात्र, भरपाईची गाडी पुढे गेलीच नाही. आताही पाचव्यांदा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या दृष्टीने पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम येत्या बुधवारी (दि. ६) िहगोलीत येणार आहेत.
जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेले नुकसान, वन विभागासह विविध विषयांवर कदम यांच्या उपस्थितीत आढावा बठक घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात चालू वर्षी आतापर्यंत सरासरी १३६.४४ टक्के पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे व जमिनीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. पीक नुकसानीच्या झालेल्या सर्वेक्षणावर लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी नाराजी व्यक्त करून लक्ष वेधले. या मुद्दय़ावर मंत्री कदम, पालकमंत्री वर्षां गायकवाड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री सुरेश धस यांच्या दौऱ्यातही बराच खल झाला.
जिल्ह्यातील पीक नुकसानीसोबतच येलदरी, अप्पर पनगंगा धरणात अनेक गावे गेल्याने या गावांच्या पुनर्वसनात अनेक अडचणी येत आहेत. कदम यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीतही या वेळी चर्चा होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात वन विभागासह पुनर्वसन, अतिवृष्टीच्या मुद्यांवर ही आढावा बठक होणार आहे. या पूर्वीही पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेली बठक चांगलीच गाजली. त्यामुळे आता कदम यांच्या बठकीत लोकप्रतिनिधी कोणते मुद्दे उपस्थित करणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.