आठवडा हप्ता बाजार

ग्रामीण भागातील आठवडे बाजार संस्कृतीने ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली यांसारख्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून चांगलेच बाळसे धरले असून रस्ते,

ग्रामीण भागातील आठवडे बाजार संस्कृतीने ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली यांसारख्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून चांगलेच बाळसे धरले असून रस्ते, पदपथ अडवून राजरोसपणे भरणाऱ्या या बाजारांना महापालिका अधिकारी, राजकारणी आणि काही गल्लीगुंडांच्या हप्तेखोरीचे कवच मिळू लागल्याने हे आठवडे बाजार शहर नियोजनाच्या मुळावर उठू लागले आहेत. या बाजारात कपडय़ांपासून गृहोपयोगी वस्तू स्वस्त दरात मिळतात. त्यामुळे मजूर, गोरगरिबांसाठी हे बाजार सोयीचे ठरतात. असे असले तरी या बाजाराच्या माध्यमातून हप्तेखोरीचा मोठा धंदा आकाराला येऊ लागला असून गल्लीगुंडांसाठी हे बाजार पर्वणी ठरू लागले आहेत.
ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे स्टोअर्स येथे भरणारा आठवडा बाजार हा कळवा-बेलापूर पट्टय़ातील एकेकाळचा सर्वात मोठा बाजार मानला जायचा. ठाणे, नवी मुंबई, कळवा, मुंब्रा या पट्टय़ातील गरीब कामगार, मजुरांची जत्रा या ठिकाणी भरत असे. ठाणे, नवी मुंबईतील गावागावामध्ये या बाजारांचे लोण फार पूर्वीपासून पसरले होते. गावांमध्ये बेकायदा चाळी उभ्या राहिल्या आणि या चाळींमधून गोरगरिबांना जागा भाडय़ाने मिळू लागल्या. त्यामुळे या कामगार वर्गासाठी कपडय़ांपासून गृहोपयोगी वस्तू, भाजीपाला या बाजारात स्वस्त दरात उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळेच ठाणे, कल्याण, डोंबिवली, आदी शहरातही आठवडे बाजार वेगळे महत्त्व राखून आहे. मात्र, आठवडय़ातील एका दिवसाकरिता भरणारे बाजार स्थानिक गुंडांच्या हप्तेखोरीचे साधन बनू लागले आहे. या बाजारात पदपथावरील जागांचे दरही ठरू लागले आहेत. मोक्याची जागा मिळवायची असेल तर गल्लीगुंडाला जादा कमाई करून द्यायची आणि पुढे महापालिका, पोलीस यांच्यापर्यंत ही साखळी कायम राहते. ठाण्यातील अरुंद रस्त्यांवर भरणारे हे बाजार शहरातील इतर नागरिकांसाठी मात्र डोकेदुखी ठरू लागले आहेत. मध्यंतरी ठाणे महापालिकेने अशा बाजारांवर बंदी घातली होती. मात्र काही दिवसांनंतर हा बाजार पुन्हा जोमाने सुरू झाला असून त्याला आता हप्तेखोरांचे कवच लाभले आहे.

चिरीमिरी ८० ते ९० हजारांची
ठाणे शहरातील सावरकरनगर, किसननगर, मानपाडा, कासारवडवली यांच्यासह वेगवेगळ्या भागांत आठवडे बाजार भरत असून त्यांचे दिवस ठरलेले आहेत. विशेष म्हणजे, या बाजारात सुमारे १५०० ते १८०० विक्रेते रस्त्यावर स्टॉल लावून वस्तूंची विक्री करतात. त्यामध्ये मुंबईतील कुर्ला तसेच घाटकोपर भागातील ८५ टक्के विक्रेत्यांचा समावेश आहे. या स्टॉलकरिता एका दिवसासाठी प्रत्येक विक्रेता सुमारे ५० रुपयांचा हप्ता गल्लीबोळातील गुंडांना देतो. म्हणजेच लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या या बाजारात सुमारे ८० ते ९० हजार रुपयांचा हप्ता गोळा होतो. वर्गणीच्या नावाखाली हा हप्ता गोळा होत असला तरी, त्याची मात्र पावतीसुद्धा विक्रेत्यास मिळत नाही. त्यामुळेच या बाजारांना संरक्षण कवच देण्यासाठी गल्लीबोळातील गुंड पुढे येऊ लागले आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Week market culture progressing in thane navi mumbai and kalyan

ताज्या बातम्या