वरुणराजाने आज उघडीप घेतली असली तरी कर्मभूमी कराडात मात्र, श्रीनिवास पाटील यांच्यावर हितचिंतक व कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा अक्षरश: पाऊस पाडला. सिक्कीमचे नवनिर्वाचित राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे आज कराडकर नागरिकांसह हितचिंतक व कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.
श्रीनिवास पाटील यांनी सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी दिवंगत लोकनेते पी. डी. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, तर यशवंतराव चव्हाणांच्या ‘विरंगुळा’ या निवासस्थानी जाऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व त्यांच्या पत्नी वेणूताई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. श्रीनिवास पाटील यांचे त्यांच्या कार्यालयात आगमन होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून मोठय़ा उत्साहात स्वागत केले. पाटील यांच्या अभिनंदनासाठी हितचिंतक व कार्यकर्त्यांची एकच झुंबड उडाली होती. दरम्यान, आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील, विलासराव पाटील-वाठारकर, कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, कराडच्या नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे, कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते, माजी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, इंद्रजित मोहिते, मदनराव मोहिते, अतुल भोसले, प्रांताधिकारी संजय तेली, कराड जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर आदी मान्यवरांसह स्थानिक नेतेमंडळी, आजी, माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांनी श्रीनिवास पाटील यांचे अभिनंदन केले.