जालना नगरपालिकेची सत्ता जनतेने शिवसेना-भाजपच्या ताब्यातून काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीकडे दिली. परंतु नागरी सुविधांच्या संदर्भात आघाडीने शिवसेना-भाजप युतीपेक्षा वेगळे काय केले? असा थेट सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुशराव टोपे यांनी उपस्थित केला. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्षा पद्मा भरतिया, तसेच आघाडीचे नगरसेवक, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात टोपे बोलत होते.
नगरपालिकेची सत्ता शिवसेना-भाजपच्या ताब्यातून आपणाकडे दिल्यास सर्व नागरी सुविधा देण्याचे आश्वासन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने दिले होते. आता सत्ता आपल्या ताब्यात असून कोणत्या सुविधा जनतेस मिळाल्या, याबाबत आत्मचिंतन केले पाहिजे, असे टोपे या वेळी म्हणाले. नगरपालिकेतील सर्व पदाधिकारी, सदस्य, अधिकाऱ्यांनी या संदर्भात विचार करण्याची गरज आहे. वाईट रस्त्यांमुळे आपण शहरात फिरण्याचे टाळतो, असे सांगून सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. विरंगुळय़ाची साधनेही उपलब्ध नाहीत. शहरात महिना-महिना पाणीपुरवठा होत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. औद्योगिक वसाहतीमधील लोखंड उद्योगांमुळे वायुप्रदूषण होत असल्याचेही ते म्हणाले.
उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन प्रारंभी टोपे यांच्या हस्ते झाले.