स्पर्धा परीक्षांचा काळ आता सुरू झाला आहे. सर्वच शाखेतील विद्यार्थ्यांचा कल त्याकडे वाढत आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या शिकवणी वर्गाची संख्याही वाढत आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना ही तयारी करताना अनेक अडचणींचा सामनाही करावा लागतो. शिकवणी वर्गाची संख्या वाढलेली दिसते, पण त्यात दर्जाच्या मुद्दय़ावर प्रश्नचिन्ह कायम आहे. एकूणच स्पर्धा परीक्षांच्या वातारवणाचा घेतलेला हा धांडोळा!
* गेल्यावर्षी यूपीएससीत विदर्भातून चार विद्यार्थी यशस्वी झाले होते. महाराष्ट्रात ही संख्या ७६ होती.
* एमपीएससीत १७ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले होते.  राज्यात ३५० विद्यार्थी होते.
* दोन दिवसांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल  लागला. त्यात ८०० पैकी केवळ ९२ विद्यार्थी विदर्भातील आहेत.

यशाचा टक्का कमी का?
केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना बसणाऱ्यांच्या संख्येत अलीकडे विदर्भात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचवेळी यशस्वी होण्याचे प्रमाण तुलनेने अत्यल्प आहे. बचावात्मक पवित्रा आणि आवश्यक वातावरणाची कमतरता या दोन गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत आहेत. स्पर्धा परीक्षेत यशस्वी न झाल्यास काहीच करण्याजोगे राहणार नाही, या भितीपोटी रोजगार मिळवून देणारी व्यावसायिक पदवी आधी घेतली जाते. डॉक्टर, इंजिनीअर, किंवा शिक्षकाची नोकरी प्राप्त करून पोटापाण्याचा प्रश्न मिटल्यावर मग स्पर्धा परीक्षेत उतरण्याची मानसिकता येथे आहे. स्पर्धा परीक्षांबद्दल पालक-विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण झाली असली तरीही त्यासाठी कठोर परिश्रमाची गरज असते. परिश्रम आणि संयम या दोन्ही गोष्टीत आपल्याकडील विद्यार्थी कमी पडत आहे. शाळा, महाविद्यालयीन स्तरापासून स्पर्धा परीक्षांबद्दलची माहिती आणि तयारी या दोन्ही गोष्टींचे ज्ञान देणे आवश्यक आहे. मात्र, ना शिक्षक त्यासाठी मेहनत घ्यायला तयार आहे ना प्राध्यापक! समुपदेशकाचाही अभाव आहेच. त्यामुळे स्पर्धा परीक्षेविषयी जुजबी माहिती विद्यार्थ्यांना असते. त्यातून काय साध्य होते हे देखील अनेक विद्यार्थ्यांना ठाऊक नसते, असेही काही संस्थाचालकांनी बोलून दाखवले.
शहरात २६ खासगी संस्था
नागपूर शहरात स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या २६ संस्था आहेत. या संस्थेतून दरवर्षी शेकडो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासनात जात आहेत. मात्र, असे असले तरी मुंबई, पुणेच्या तुलनेत त्याचे प्रमाण कमी आहे. शून्य मैलाजवळ भारतीय नागरी परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्र आहे. हे केंद्र शासनातर्फे चालवले जाते. तर नागपूर विद्यापीठातर्फे अनुसूचित जाती-जमातीसाठी प्रशिक्षण केंद्र चालवले जाते. या केंद्राला विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे निधी दिला जातो. याशिवाय विविध महाविद्यालयातही स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन केले जाते.

कोटय़वधींची उलाढाल
स्पर्धा परीक्षांकडे हळूहळू का होईना, सर्वच शाखेतील विद्यार्थी वळायला लागले आहेत. या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी शिकवणी वर्ग हा एक पर्याय आहे आणि तो स्वीकारावाच लागतो. या शिकवणी वर्गाच्या माध्यमातूनच विदर्भात कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत आहे. मुंबई, पुणे, दिल्ली या शहरांच्या तुलनेत विदर्भातील शुल्क कमी असले तरीही त्यातून जाण्याशिवाय मार्ग नाही. शिकवणी वर्गाना प्रतिसाद मोठा असला तरीही सर्वच विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करतात असे नाही. सहा महिन्यांचे शुल्क भरून मध्येच शिकवणी वर्ग सोडणारेही विद्यार्थी आहेत. मुंबई, पुणे, दिल्ली या शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करून देणाऱ्या अनेक दर्जेदार संस्था आहेत आणि २५ हजार रुपयापासून तर दोन लाख रुपयापर्यंत शुल्क त्या ठिकाणी आकारले जातात, त्या तुलनेत नागपूर राज्याची उपराजधानी असतानासुद्धा येथे दर कमी आहेत. प्रत्येक शिकवणी वर्गाचे शुल्क सारखे नाहीत, तर कमीअधिक प्रमाणात शुल्क आकारले जातात. नागपुरात राज्य लोकसेवा आयोग परीक्षेसंदर्भात तयारी करण्यासाठी एका विद्यार्थ्यांला शिकवणी वर्गाचा खर्च तब्बल ४० ते ६० हजार रुपयांच्या घरात जातो. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करायची असेल तर ६० हजार ते एक लाख रुपये खर्च येत असतो. त्यात त्याला पुस्तके आणि परीक्षेच्यादृष्टीने आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिली जातात. बाहेरगावातील विद्यार्थी असेल तर त्याच्या खर्चात भोजन आणि निवासाची भर पडते. मुंबई, पुण्यात हाच खर्च दुप्पट, तिप्पट आहे. ज्या विद्यार्थ्यांची मानसिकता स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचेच अशी आहे, तो शिकवणी वर्गाचा विचार करत नाही. बँकिंग क्षेत्रासाठी ४० ते ५० हजार रुपये, केवळ फाउंडेशनचा सहा महिन्याचा अभ्यासक्रम असेल तर २० हजार रुपयापासून ३५ हजार रुपयापर्यंत खर्च येतो. शिकवणी वर्गाचे शुल्क जितके अधिक तितके संबंधित संस्थेत चांगले शिक्षण मिळेल असा सर्वसाधारण समज आहे, पण प्रत्येकवेळी तो खरा ठरेलच असे नाही. दर्जेदार शिकवणी वर्गात दर्जेदार शिकवणारे शिक्षक असतीलच असे नाही. विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांचा विचार भलेही होत असेल.

मार्गदर्शकांची वानवा
शेती व निश्चित पावसाच्या विदर्भात पूर्वीपासूनच स्पर्धा परीक्षा व नोकऱ्या याबद्दल उदासीनता होती. आजही पदवीनंतर लगेच स्पर्धा परीक्षा देण्याऐवजी पदव्युत्तर शिक्षण घेण्यावर विद्यार्थ्यांचा भर असतो. त्यामुळे प्रत्यक्ष स्पध्रेपासून विदर्भातील विद्यार्थी पुणे, मुंबई किंवा दिल्लीच्या तुलनेत विदर्भातील विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन तितकेचे उपलब्ध होत नाही. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्या त्या क्षेत्रातीन नवीन शिकण्याच्या संधी विदर्भातील मुलांना तुलनेने कमी मिळतात. मोठय़ा शहरांमध्ये वेगवेगळया विषयांसाठी विविध शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, या उलट आपल्याकडे सगळयाच विषयांकरिता एकाच ठिकाणी कोचिंग  क्लासेस लावण्याचे प्रमाण अधिक आहे. मुलांना प्रशासकीय सेवेत काम केलेल्यांकडून मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रयत्न झालेत. काही निवृत्त अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न केला. काहींनी सामाजिक कार्य म्हणून हे प्रयत्न केलेत. मात्र, विविध कारणांमुळे हे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यामुळे तज्ज्ञ व्यक्तींच्या दर्जेदार मार्गदर्शनापासून विदर्भातील विद्यार्थी वंचित राहतात.
इतर ठिकाणांहून तज्ज्ञ म्हणून शिक्षक बोलविते जातात मात्र हे लोक खरेच तज्ज्ञ असतात का, हा प्रश्न आहे. ज्या मान्यवरांचे मार्गदर्शन पुण्यात किंवा मुंबईत सहज मिळते, त्यांनी नागपुरात मार्गदर्शनासाठी आणण्याचा खर्च काही हजारांमध्ये असतो. त्यामुळे असे मान्यवर वारंवार बोलविणे येथील कोचिंग क्लासेसला परवडत नाही. या व्यतिरिक्त, विविध क्षेत्रातील माहिती प्रत्यक्षरीत्या मिळावी यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता क्षेत्र भेटींचे आयोजन केले जाते किंवा विदयार्थी स्वत:हून असे उपक्रम आयोजित करतात. या सगळया गोष्टींचा फायदा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेत होतो. अशा क्षेत्र भेटी किंवा तज्ज्ञांच्या भेटीबाबतही विदर्भातील विद्यार्थ्यांना अशा संधी फारशा मिळत नसल्याचे दिसून आले आहे.
नागपूर-विदर्भात अभ्यासासाठी मात्र पुरेसे संदर्भ साहित्य उपलब्ध आहे व अनेक चांगली पुस्तके विदर्भातील लेखकांनीही लिहिलेली आहेत. अभ्यासाकरिता लागणाऱ्या साहित्याच्या बाबतीत विदर्भातील विद्यार्थ्यांसमोर समस्या नाहीत. काही शासकीय धोरणांमुळे स्पर्धा परीक्षांमधून नोकरी मिळण्याचे प्रमाणही विदर्भात वाढते आहे. तलाठी पदाच्या परीक्षा जिल्हास्तरावर घेण्याच्या निर्णयामुळे स्थानिक तरुणांना नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. वर्ग ३ च्या परीक्षा देणारे आता वरिष्ठ पदांसाठीही प्रयत्न करू लागले आहेत. तलाठी किंवा लिपीक पदासाठी परीक्षा देणारे तहसीलदार, उपजिल्हाधिकारी अशा पदांकरिता आता परीक्षा देऊ लागले आहेत. नागपूर शहरापेक्षा इतर जिल्ह्य़ाच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. येत्या ३ ते ४ वर्षांत स्पर्धा परीक्षेकरिता इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता असून त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ त्या प्रमाणात उपलब्ध नसणे ही समस्या विदर्भातील विद्यार्थ्यांसंमोर राहणार आहे. नागपूर-विदर्भात अशा प्रकारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होणे गरजेचे आहे. खाजगी संस्थांव्यतिरिक्त विद्यापीठे, महाविद्यालये तसेच काही ठिकाणी शासकीय माध्यमातून स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाते. तज्ज्ञांकरिता करावी लागणारी आर्थिक तरतूद अशा संस्थांनी करणे शक्य असते. या केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करू दिले जावे, असे मत या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी व्यक्त केले.

वातावरणच गैरसोयींचे!
नागपुरात वाचनालयात अभ्यासासाठी जागा सोडली तर स्पर्धा परीक्षांसाठी वातावरण गैरसोयींचे असल्याचा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. एनसीईआरटीईची पुस्तके पुस्तकांच्या दुकानात फार उशिरा पोहोचतात, ती लवकर उपलब्ध झाली पाहिजेत, अशी अपेक्षा धंतोलीच्या सरस्वती वाचनालयात अभ्यास करणाऱ्या रवी चव्हाण याने व्यक्त केली. बाहेरचा अभ्यास दौरा तर सोडा पण, स्पर्धा परीक्षा केंद्रावर मिळणारे ज्ञान तुटपुंजे असते. बारावी ते पदवीपर्यंत पाच वर्षांचा इतिहास तीन तासात शिकवला जातो. त्यावरील प्रश्नांना समर्पक उत्तरे मिळत नसल्याचा अनुभव रवीने कथन केला. नागपूर विद्यापीठाच्या वि.भि. कोलते वाचनालय सकाळी ८ ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले राहते, हे विशेष. त्याचाच मिळता जुळता अनुभव बँकिंग स्पर्धेचा अभ्यास करणाऱ्या विकास पेंदामचा आहे. तो कला शाखेतून पदवी संपादन करून बँकिंगच्या स्पर्धा परीक्षा देऊ लागला. त्याला गणित आणि इतर विषयांतील मुख्य अडचणी जाणवल्या. मार्गदर्शन केंद्रावर घेतल्या जाणाऱ्या शुल्काच्या तुलनेत शिकवले जात नसल्याची खंत त्याने व्यक्त केली. आमच्या वयाचे, नुकतेच पदवी घेतलेले विद्यार्थीच आम्हाला शिकवत. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची सोडवणूक ते करू शकत नसल्याचा अनुभव विकासने विशद केला.
बँकिंगचे वर्ग गांधीनगर, रवीनगर, धरमपेठ आणि सक्करदरा या ठिकाणी होतात. इंग्रजी, तर्क किंवा सामान्य ज्ञान इत्यादीसाठी वेगवेगळे शिकवणी वर्ग लावावे लागतात. एकाच ठिकाणी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचा आशीष नैताम या विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. त्याला विकास आणि अनिल याने दुजोरा दिला. अनिल कुशराम बँकेची परीक्षा उत्तीर्ण झाला असून तो इतरही स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहे. मुलांचा मूलभूत अभ्यास पक्का असेल तर ती पुढे स्पर्धा परीक्षांच्या तयारी करताना टिकून राहतात. विशाखा कापसे हिलाही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा असून भारतीय नागरी सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात तिला प्रवेश घ्यायची तिची इच्छा आहे. तिच्या मैत्रिणींचा तेथील अनुभव चांगला असून सर्वाना त्या ठिकाणी चांगला लाभ मिळतो, असा तिचा अनुभव आहे.

* पूर्व विदर्भातल्या विद्यार्थ्यांमध्ये असलेला वाचनाचा अभाव त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षांमध्ये मारक ठरत आहे. वाचन नसेल तर जिज्ञासा राहणार नाही आणि जिज्ञासा नाही तर वाचन नाही. ही सायकल जो विद्यार्थी चालवेल, त्याला स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या ६० टक्के विद्यार्थ्यांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसून येतो, तर केवळ २० टक्केच विद्यार्थी नजरेत भरणारे असतात. उर्वरित विद्यार्थी संमिश्र प्रकारात येतात. परीक्षांच्या नोट्सव्यतिरिक्त वृत्तपत्र आणि अवांतर वाचनाची सवय जोपर्यंत लागणार नाही, तोपर्यंत यशाचा अभाव जाणवतच राहील.
प्रफुल्ल पाटील, युनिक क्लासेस, नागपूर
* समुद्र जसा खोलवर आणि दूरवर पसरलेला असतो, तेवढाच अभ्यास स्पर्धा परीक्षांसाठी असावा लागतो. स्पर्धा परीक्षांची पद्धती आता बदललेली आहे. कोणते प्रश्न तुमच्यासमोर येतील याची काहीच शाश्वती नाही, त्यासाठी तुमचा पाया मजबूत असावा लागतो. शाळा, महाविद्यालयात शिकलेले विसरून चालणार नाही. आपण खूप अभ्यास केला, त्यामुळे आता पुरे झाले असे आपल्याला वाटत असते. मात्र, अभ्यासाचा हा ‘टेम्पो’ आपल्याला टिकवून ठेवणे गरजेचे आहे. मी स्वत: यूपीएससीतून आले आहे. त्यासाठी एक वर्ष आणि तयारीसाठी किमान सहा-सात महिने लागतात. अशावेळी अभ्यासाचे हे सातत्य तुम्हाला टिकवून ठेवावेच लागते. बरेचदा परीक्षेचे निर्णय लागतात आणि प्रिलिम येते, अशावेळी गोंधळ उडण्याची दाट शक्यता असते. या परिस्थितीत गोंधळून न जाता तयारीचे सातत्य ठेवणे गरजेचे आहे. खूप साऱ्या नोट्स किंवा स्पध्रेशी संबंधित खूप सारी पुस्तके वाचून यश मिळत नाही. त्यासाठी वृत्तपत्र आणि अवांतर वाचन गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेसाठी पुणे, मुंबई, दिल्लीची वाट धरणारे अनेक विद्यार्थी आहेत. मात्र, या शहरांमध्ये जाऊनच यश मिळते हा विद्यार्थ्यांचा समज चुकीचा आहे. नागपुरात राहूनही स्पर्धा परीक्षेची उत्तम तयारी करता येऊ शकते, फक्त त्यासाठी असलेले मूलभूत तत्त्वांचे पालन करा. ते करणे जमले तर इतर शहरात जाऊन हातपाय मारण्याची गरज नाही. मूलभूत तत्त्वांचे पालन तुम्हाला यश मिळवून देऊ शकतात.
 दीपाली मासिरकर, पोलीस उपायुक्त, नागपूर शहर
* नागपुरातील मुलांमध्ये गुणवत्तेची कमतरता नाही, पण गणित आणि इंग्रजी विषयांत ते कमी पडतात. त्यामुळे प्राथमिक पातळीपासून त्यांची तयारी करून घ्यावी लागते. या दोन्ही विषयातील कमतरता त्यांना बँकिंग आणि स्टाफ सिलेक्शनमध्ये मागे ठेवण्यास कारणीभूत ठरतात. म्हणूनच मराठी मुलांचा कल एमपीएससीकडे तर हिंदी भाषिक मुलांचा कल बँकिंगकडे दिसून येतो. आर्ट, विज्ञान, कला शाखेतील विद्यार्थ्यांसोबतच आता वैद्यक शाखेतील विद्यार्थीसुद्धा एमपीएससीची तयारी करण्यासाठी येत आहेत.
डॉ. रजनी राम पाटील, संचालक, प्रतिभा इन्स्टिटय़ूट, नागपूर.
* पूर्वीच्या तुलनेत स्पर्धा परीक्षांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. केवळ वर्ग तीनच्या परीक्षाच नव्हे तर वरिष्ठ पदांकरिता होणाऱ्या परीक्षांकडेही विद्यार्थी वळू लागले आहेत. येत्या चार ते पाच वषार्ंत ही परिस्थिती निश्चितपणे बदलेल यात दुमत नाही. आपल्याकडे मार्गदर्शकांची कमतरता आहे आणि मुलांकडे पर्यायही कमी आहेत. याउलट विदर्भात अभ्यासाकरिता लागणारे साहित्य किंवा दर्जेदार पुस्तके पुरेशा प्रमाणात आहेत.
 संजय नाथे, संचालक, नाथे करिअर अकादमी, नागपूर
* पालकांचे उद्बोधन आणि पालकांचा आधार विद्यार्थ्यांसाठी कायम महत्त्वाचा ठरतो. दहावी-बारावीत हे मानसिक पाठबळ पालक मुलांना देतात, पण स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान हा मानसिक आधार कुठेतरी हरवलेला दिसतो. स्पर्धा परीक्षांचे जे वातावरण असायला हवे, त्या वातावरणाचीसुद्धा आपल्याकडे कमतरता आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत बँकिंग क्षेत्राकडे मराठी मुलांचा कल वाढला आहे, पण तरीही ऐन परीक्षेच्या वेळी तयारी ही मानसिकता अजून बदललेली नाही. आयआयटीला जाणारे केवळ एक टक्का विद्यार्थी आपल्याकडे आहेत तर उर्वरित तांत्रिक विषयाकडे वळतात. अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन लिपिक होण्यातच समाधान मानणारे विद्यार्थीही आपल्याकडे आहेत. कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांया स्पर्धा परीक्षांविषयी असलेला न्युनगंड आता कमी व्हायला हवा.
 निलेश निमजे,संचालक, निलेश फ्रेंड्स सोशल सर्कल स्पर्धा अकादमी
* स्पर्धा परीक्षाकडे विद्यार्थ्यांचा ओढा असला तरी त्यात सातत्य नसल्यामुळे अनेक विद्यार्थी अर्धवट अभ्यासक्रम करून शिकवणी वर्ग सोडून देत असतात. मुळात आपल्याकडे स्पर्धा परीक्षाच्या दृष्टीने वातावरण नाही आणि वातावरण असले तरी विद्यार्थ्यांची अभ्यास आणि परिश्रम करण्याची तयारी नाही. शिकवणी वर्गाला भलेही शंभर टक्के विद्यार्थी जातील, पण केवळ दहा टक्के विद्यार्थी या स्पध्रेत यशस्वी होतात. विशेषत: एमपीएससी परिक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना आवश्यक साधने उपलब्ध करून देता येत नाही आणि दिली तर तेवढे शुल्क देण्याची तयारी पालकांची नाही.
विजय गजघाटे, स्पंदन करिअर इन्स्टिटय़ूट
* विदर्भातील युवक बारावी किंवा पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे वळतो. त्यामुळे प्रथम व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी शालेय जीवनापासून झाली तर निश्चितच पहिल्याच प्रयत्नात यश मिळू शकेल, अशी अपेक्षा सुरेश जाधव यांनी व्यक्त केली. दिल्ली, बिहार, उत्तरप्रदेशात शालेय शिक्षणापासूनच स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन केले जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पास अकादमीतर्फे अत्यंत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाते. विदर्भातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेकडे वळावे, यासाठी संस्थेतर्फे प्रयत्न केले जात आहे.
सुरेश जाधव, पास अकादमी