गेल्या चार दिवसापासून विदर्भात थंडीचा जोर वाढला असून पारा ९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत थंडी जाणवते. सायंकाळी गार वारे वाहत असल्यामुळे उबदार कपडे घातल्याशिवाय घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. थंडीने नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. विदर्भात सर्वात कमी तापमान गोंदियामध्ये ९.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
विदर्भातील काही जिल्ह्य़ात धुक्याचे प्रमाण वाढले आहे. डिसेंबर महिन्यात थंडीला चांगली सुरुवात झाल्याने यंदाच्या हिवाळ्यात थंडीचा जोर वाढणार असे वाटत होते. त्यानंतर काही दिवसातच थंडीचा जोर ओसरला. आता पुन्हा पारा घसरला असून थंडीने चांगलाच कहर केला आहे. गोंदिया, भंडारा, अमरावती, अकोल्यासह नागपूरमध्ये थंडीचा जोर वाढत आहे.  नागरिकांना दुपारच्या उन्हामुळे थोडा दिलासा मिळत असला तरी सायंकाळी पुन्हा थंडीचा कडाका जाणवतो. गेल्या चार दिवसापासून शहरातील विविध भागात शेकोटय़ा पेटू लागल्या आहेत. विदर्भात नागपूर १०.६, अकोला १२.१ अमरावती १५.२ , बुलढाणा १४, ब्रम्हपुरी १२.९ चंद्रपूर १३.५, गोंदिया ९.६, वाशीम १५.८, वर्धा १२ आणि यवतमाळ येथे १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नागपुरात गुरुवारी सकाळपासून अधिक थंडी जाणवायला लागली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह विदर्भाच्या काही भागात थंडीची लाट कायम असून तापमान सरासरीपेक्षा खाली जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार थंडीचा प्रकोप आणखी वाढणार आहे.  आला थंडीचा महिना..झटपट शेकोटी पेटवा.. असे शहरवासी म्हणू लागले आहेत.  वाढलेल्या थंडीमुळे आजारांचे प्रमाणही वाढले आहे. शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांत रुग्णांची गर्दी होत आहे. दमा, सर्दी या आजारांबरोबरच तापाचे रुग्ण वाढले आहेत. शहरातील विविध भागात अस्वच्छतेमुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. थंडीचा जोर वाढल्याने ‘मॉर्निग वॉक ’ला जाणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांनाही थंडीचा फ टका बसू लागला आहे.