तालुक्यातील एका महिला कामगार तलाठय़ास तिच्या मदतनिसासह दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येथे रंगेहाथ पकडले. शासकीय महिला कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना पकडले जाण्याची तालुक्यातील ही बहुधा पहिलीच घटना असावी.
सुगाव खुर्द येथील जया सखाराम पनाड ही तलाठी लाचेच्या सापळय़ात रंगेहाथ सापडली. डॉ. साहेबराव वैद्य यांनी सुगाव खुर्द येथील शेतजमिनीच्या वादावर उपविभागीय अधिकारी संगमनेर यांनी दिलेल्या निकालाप्रमाणे आपल्या नावाची नोंद व्हावी तसेच पीकपाहणी नोंद करून सुधारित सातबारा उतारा मिळावा यासाठी कामगार तलाठी यांच्याकडे अर्ज केला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून ही नोंद व्हावी यासाठी ते प्रयत्नशील होते. पनाड यांनी त्यासाठी डॉ. वैद्य यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. खासगी मदतनीस चंद्रभान शिरसाठ याच्यामार्फत तिला आज दुपारी येथील अगस्ती विद्यालयाजवळील हॉटेल दीपज्योतीसमोरील रस्त्याच्या कडेला दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचलुचपत विभागाचे पोलीस उपायुक्त शशिकांत महावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक ए. आर. देवरे, निरीक्षक आर. पी. माळी, विजय मुतडक, पोलीस नाईक दिलीपसिंह ठाकूर, प्रमोद जरे, रवींद्र पांडे, हवालदार अंबादास हुलगे, महिला कर्मचारी घालमे यांनी सापळा रचून ही कारवाई केली. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात कारवाई उशिरापर्यंत सुरू होती.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jan 2014 रोजी प्रकाशित
तलाठी महिला लाचेच्या सापळय़ात
तालुक्यातील एका महिला कामगार तलाठय़ास तिच्या मदतनिसासह दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येथे रंगेहाथ पकडले.
First published on: 02-01-2014 at 01:57 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman talathi caught taking bribe