दीपावली फराळाने लज्जतदार बनविण्याचा सर्वाचा प्रयत्न असला तरी वाढत्या महागाईमुळे फराळाची चव किती दिवस जीभेवर रेंगाळेल हे सांगणे मात्र अवघड आहे. कारण, गेल्या वर्षीच्या तुलनेत खाद्य पदार्थाच्या किमतीत ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. यामुळे रोजच्या धावपळीच्या जीवनात घरातच फराळ तयार करण्याऐवजी बहुतांश महिलांनी आयता फराळ आणण्याचा पर्याय निवडला आहे.
दिवाळी म्हटले की फटाके, आकाशकंदील, नवे कपडे यासह ती फराळाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. दिवाळीच्या काही दिवस अगोदरच महिला वर्गाकडून घराच्या साफसफाई सोबत फराळाचे कसे करता येईल या दृष्टीने नियोजन सुरू आहे. कितीही नेटके नियोजन झाले तरी कधी पाककृती बिघडून बेत विस्कटण्याची शक्यता असते. गेल्या काही वर्षांंत बदलती जीवनशैली तसेच अधिकांश महिला वर्ग नोकरदार झाल्यामुळे फराळ घरी तयार करण्यापेक्षा आयते किंवा बाहेरून तयार करून घेण्याकडे अनेकांनी कल ठेवला आहे. किरकोळ बाजारात फराळासाठी लागणाऱ्या कच्चा मालाची किंमत साधारणत ३० टक्क्यांहून अधिकने वाढल्याने महिन्याचे अंदाजपत्रक बिघडण्याची शक्यता आहे. या सर्वात होणारी धावपळ कमी करण्यासाठी महिलांनी तयार फराळाला पसंती दिली. मात्र त्यातही दुकानातील फराळ हा किलोच्या दराने खिशाला परवडणारा नसल्याने अनेक महिलांनी आचाऱ्याकडे वाणसामान देऊन फराळ तयार करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. काही महिला समूहाने एकत्र येत आचारी कॉलनीत बोलावून त्याला किलोमागे ठरावीक मजुरी देत फराळाचे काम पूर्ण करण्याची धडपड चालविली आहे. चकली, शेव, चिवडा यासाठी प्रत्येकी ३० रुपये किलो मजुरी दिली जात आहे. शेवमध्ये जर पालक, बटाटा असा काही प्रकार हवा असेल तर त्यासाठी प्रतिकिलो १० रुपये जादा मोजावे लागतात. तसेच लाडु, करंज्या, बाकरवडी असे पदार्थ ५० रुपये किलोने तयार करून दिले जात आहेत. या शिवाय पाकातील चिरोटय़ा, शंकरपाळे, बर्फी यासाठी वेगवेगळी मजुरी ठरवली आहे.
महिलांची बदलती अभिरुची लक्षात घेत व्यावसायिकांनी एक किलोपासून पुढे अशा स्वरूपात विविध खाद्यपदार्थांचा एकत्रित फराळ दीड हजारापासून पुढे अशा भावात उपलब्ध करून दिला आहे. त्यात आंबा बर्फी, बाकरवडी, बेसन लाडू, चकली, नारळाच्या करंज्या, शंकरपाळे, शेव, चिवडा, कडबोळी, रवा लाडू असे पदार्थ अर्धा किलो प्रमाणात साधारणत: १८१५ ते १९०० रुपयांत उपलब्ध आहेत. तयार फराळ स्वतंत्रपणे खरेदी करावयाचा असल्यास त्याचे दर साधारणत: २०० रुपये प्रतिकिलो आहे. केवळ करंजीची नगाने विक्री होत असून सात रुपये नग असे त्याचे दर असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.