पोषण आहार शिजविणाऱ्या बचत गटांची थकीत देयके मिळावीत, विविध प्रकारच्या खाऊची रक्कम द्यावी, बचत गटांना सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर मिळावे आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्हा शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेने सोमवारी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली.
वारंवार चर्चा करुनही आणि आश्वासन देऊनही ही रक्कम दिली जात नसल्याचा आरोप बचत गटातील महिलांनी केला. इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना सुरू आहे. पोषण आहार तयार करणाऱ्या कामगारांच्या मागण्यांवर वारंवार चर्चा करूनही थकीत देयके दिली जात नाहीत. या योजनेसाठी अतिशय तुटपुंजा निधी येतो. या प्राथमिक शाळेत पोषण आहार तयार करणाऱ्या कामगारांना काही काही ठिकाणी केवळ १० ते १५ रुपये रोज दिला जातो. दुसरीकडे शासनाशी संगनमत करून बडे ठेकेदार एकाच ठिकाणी आहार बनवून वाटप करण्याची परवानगी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. या निर्णसाला कामगार संघटनेचा तीव्र विरोध आहे. यामुळे राज्यातील हजारो पोषण आहार तयार करणाऱ्या कामगारांचा रोजगार हिरावला जाणार असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोहोचणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. थकीत देयकाच्या निषेधार्थ यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बचत गटांचे सात महिन्यांची थकीत देयके मिळावीत, बचत गटांना सवलतीच्या दराने सिलिंडर मिळावेत, कामगारांना भांडी घासण्याच्या कामाचा अतिरिक्त मोबदला मिळावा, कामगारांचे पगार पंचायत समितीमधून थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत, विनाचौकशी कामावरून कामगारांना कमी करू नये, दरवर्षी दोण गणवेश दिले जावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.