घामाचे दाम मागण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनातील नुकसानीची भरपाई मागता मग आंदोलनात तुमच्या पोलिसांनी मारलेल्या दोन हुतात्म्यांची भरपाई देणार का? मंत्रालय ज्यांनी जाळले त्यांच्याकडून किती भरपाई घेणार? याचे उत्तर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी द्यावे, असे आव्हान खासदार राजू शेट्टी यांनी घुणकी (ता.हातकणंगले) येथील जाहीर सभेत केले.    
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या घुणकी शाखेच्यावतीने खासदार शेट्टी यांची जाहीर सभा व विविध क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या गुणवंतांचा सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन भगवा चौकात करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या प्रचंड उपस्थितीत पार पडलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी रघुनाथ सिद (आप्पा)होते. स्वागत व प्रास्ताविक सुधीर मगदूम यांनी केले.    
खासदार शेट्टी म्हणाले, इतर कोणत्याही मालाची किंमत विकणारा ठरवतो. शेतमालाची किंमत मात्र विकत घेणारा ठरवतो ही व्यवस्था का बदलत नाही ? शेतकऱ्यांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांवर हात टाकला. कोणताही दोष नसताना केवळ उसाची किंमत मागणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन पोलिसांच्या बळावर चिरडण्याचा सरकारचा डाव शेतकऱ्यांनी उधळून लावला. या आंदोलनात शेतकऱ्यांकडून मोडतोड, जाळपोळ झाली. त्याची सव्वा दोन कोटी रुपयांची भरपाई राज्याचे गृहमंत्री मागताहेत. मग शरद पवारांवर झालेल्या हल्ल्यावेळी राष्ट्रवादीने केलेल्या आंदोलनात झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची, कसाब आणि त्याच्या टोळीने केलेल्या नुकसानीची आणि मंत्रालय ज्यांनी जाळले त्यांच्याकडून झालेल्यानुकसानीची भरपाई तुम्ही मागितली का, याचे उत्तर द्यावे. सी.रंगराजन समितीच्या शिफारशीमुळे लेव्हा कोटाबंद झाला त्याचे पैसे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करावेत, अन्यथा लवकरच उसाच्या दुसऱ्या हप्त्यापोटी आंदोलन छेडावे लागले. येत्या हंगामात गतवर्षीपेक्षा मोठय़ा ताकदीने शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत, हिंमत असेल तर अडवून दाखवाच असे आव्हानही शेट्टी यांनी केले.    
यावेळी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष शिवाजी माने, रामकृष्ण संस्था समूहाचे संस्थापक अशोक जाधव, वैभव कांबळे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास सरपंच राजवर्धन मोहिते, उपसरपंच मारूती पाटील, रमेश पाटोळे, जालिंदर नांगरे, महावीर पाटील, संपतराव पवार, माजी जि.प.सदस्य सर्जेराव डाळे, संभाजी मोहिते, हणमंतराव मोहिते, अजित पाटील, प्रवीण जाधव, नीलेश शेवाळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाशसिद यांनी केले. शिवाजी शिंदे यांनी आभार मानले.