संपत्तीचा वाद ते नात्यांमध्ये आलेला दुरावा यांसारख्या विविध कारणांमुळे कित्येक घरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा छळ होताना दिसतो. हा छळ करण्यामध्ये घरची मुलगी किंवा लग्न करून सासरी आलेली सून अग्रेसर असल्याचे तरुणाचे म्हणणे आहे. तसे ‘हेल्प एज’ संस्थेच्या यंदाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुख्य म्हणजे केवळ ज्येष्ठ नागरिकही ही बाब मान्य करत असल्याचे हा अहवाल सांगतो. ५४.५% तरुण सुनेकडून सासू-सासऱ्यांचा छळ होत असल्याचे सांगतो, तर १८.२% तरुणांच्या मते घरातील मुली आईवडिलांचा छळ करत असल्याचे तरुणांनी मान्य केले आहे.

एरवी सोशल मीडियाच्या आहारी गेलेली तरुणाई सामाजिक प्रश्नांबाबत जागरूक नसल्याचे बोलले जाते. पण ही तरुणाई आपल्या आजूबाजूंना घडणाऱ्या घटनांबाबत तितकीच जागरूक असून त्याबद्दल बोलण्यासही तयार असल्याचे, ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी काम करणारी ‘हेल्प एज’ संस्था आणि लहान मुलांच्या हक्कासाठी झगडणारी ‘चाइल्ड राइट अ‍ॅण्ड यू’ या दोन संस्थांच्या अहवालांमधून समोर आले आहे. २०११च्या जनगणनेतील बालकामगार माहितीनुसार भारतात ५ ते १४ वयोगटातील १०१.३ लाख मुले बालमजूर म्हणून विविध ठिकाणी काम करत असल्याचे समोर आले आहे. या आकडेवारीनुसार भारतातील अकरावे मूल हे बालकामगार आहे. या प्रश्नाबद्दल आजची तरुणाई किती जागरूक आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘चाइल्ड राइट अ‍ॅण्ड यू’ या संस्थेने मुंबईतील ३८० महाविद्यालयीन मुलांशी बोलून अहवाल तयार केला. सध्या काम करण्यासाठी १४ वर्षे हे वय निश्चित करण्यात आले आहे. पण मुंबईकर मुलांना हेच वय किमान अठरा वर्षे असावे अशी इच्छा आहे. तसेच कौटुंबिक व्यवसाय हे बालकामगार वाढण्याचे मुख्य कारण असल्याचे या तरुणांना वाटते. त्यामुळे कौटुंबिक व्यवसाय आणि त्याचसोबत सिग्नलवर मासिके विकणारी मुलेही बालकामगार म्हणून गणली जावीत अशी त्यांची इच्छा आहे. ज्येष्ठ नागरिकांवर होणारे घरगुती अत्याचार ही सर्वसामान्य बाब झाल्याचे तरुण मान्य करत असल्याचे, मुंबईतील २०० तरुणांशी बोलून ‘हेल्प एज’ या संस्थेने केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. यामध्ये सुनांकडून सासू-सासऱ्यांवर अधिक अत्याचार होत असल्याचे ५४.५ टक्के तरुणांचे म्हणणे आहे, तर मुलगा आणि मुलीकडूनही तितक्याच प्रमाणात आई-वडीलांवर अत्याचार होत असल्याचे ते सांगतात. संपत्तीमधील वाद हे याचे मुख्य कारण असून अर्वाच्य शब्दांमध्ये वृद्धांशी बोलणे, त्यांना वैद्यकीय साहाय्य न करणे, शारीरिक हिंसा असे या अत्याचाराचे स्वरूप असल्याचे तरुण सांगतात.

बालकामगारांविषयी बोलताना सध्याच्या कायद्यात सुधारणा करण्याची गरज या वेळी तरुणांनी बोलून दाखवली. पण ज्येष्ठांच्या समस्यांबाबत मात्र घरातल्यांसोबत पुरेसा वेळ घालवून, त्यांच्याशी संवाद साधून या समस्यांवर मात करता येऊ शकते असा विश्वासही तरुणांनी मांडला आहे.

ज्येष्ठांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत तरुणांची मते (‘एज हेल्प’च्या अहवालानुसार):

 

अत्याचार करणारे

’ सून ५४.५%

’ मुलगा १४.५%

’ मुलगी १८.२%

 

ल्ल अत्याचाराची कारणे

’ संपत्तीतील वाद ५०.९%

’ आरोग्यविषयक कारणे १८.२%

 

ल्ल अत्याचाराचे स्वरूप

’ शिवीगाळ करणे ७०.९%

’ शारीरिक हिंसा ४१.८%

’ एकलकोंडे करणे ४५.५%

’ वैद्यकीय मदत नाकारणे ३२.७%

बालकामगारांविषयी तरुणांची मते

(‘चाइल्ड राइट अ‍ॅण्ड यू’च्या अहवालानुसार):

 

’ सिग्नलवर मासिके विकणारी मुले बालकामगार म्हणून गणली जावीत – ८२%

’ घरामध्ये बालकामगार ठेवणे चुकीचे – ६८.५%