शहर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात फेरबदल करण्यात आले असून विद्यमान पदाधिकाऱ्यांना डच्चू देण्यात आला आहे. संघटनेचे पदाधिकारी निष्क्रिय असल्याने आमदार भाऊसाहेब कांबळे व माजी आमदार जयंत ससाणे यांनी हस्तक्षेप करून तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पवार यांना नवीन नियुक्तया करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आता शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक सलिम शेख यांचे चिरंजीव शाजेब, उपाध्यक्षपदी अतुल गुंड, तर कार्याध्यक्षपदी सिद्धार्थ उपाध्ये यांची नेमणूक करण्यात आली.
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी युवकमधील नियुक्तया बंद केल्या आहेत. आता त्या निवडणुकीद्वारे होतात. असे असले तरी पक्षाच्या वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांनी नुतन पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केलेल्या नाहीत. गांधी यांच्या धोरणाविरोधात तालुकाध्यक्ष पवार यांनी नियुक्तया केल्या असून हे प्रकरण राज्य स्तरावर गाजण्याची शक्यता आहे. शहरात युवकमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी, संघटना बळकट करावी, तसेच विविध उपक्रम राबविले जावेत म्हणून ससाणे व कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन नियुक्तया करण्यात आल्याचे पवार यांचे म्हणणे आहे. यापूर्वीची कार्यकारिणी त्यांनी जैसे थे ठेवली आहे. राहुल गांधी यांनी युवकमध्ये शिस्त आणली असून नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसारच राज्यभर अध्यक्ष विश्वजित कदम, उपाध्यक्ष सत्यजित तांबे, हेमंत ओगले हे काम करीत आहेत. त्यांची या निर्णयाला संमती आहे की नाही हे मात्र समजू शकले नाही. ससाणे व कांबळे यांच्या हस्तक्षेपामुळे मात्र पवार यांनी या नियुक्तया केल्या आहेत.