झपाटा वाद्यवृंद आणि कै. वसंत खेर हे समीकरण अवघ्या मराठी जनांना चांगलेच परिचयाचे आहे. त्यांचे पुत्र आदित्य खेर यांच्या संकल्पनेतून दिग्दर्शक प्रथमेश सावंत नव्या स्वरूपात ‘झपाटा’ वाद्यवृंद सुरू करीत असून पहिला प्रयोग गुरुवार, २५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता शिवाजी मंदिर येथे होणार आहे.
शंकर-जयकिशन यांच्या संगीताने वसंत खेर यांना झपाटून टाकले होते. त्यातून वसंत खेर आणि त्यांच्या मित्रांनी मिळून १९७६ साली सिंफनी या संस्थेची स्थापना करून नंतर ‘झपाटा’ वाद्यवृंद सुरू केला होता.  विशिष्ट अक्षरलेखनानेही झपाटा वाद्यवृंदाच्या जाहिराती गाजल्या होत्या.
तब्बल पाच हजारांपेक्षाही अधिक प्रयोग ‘झपाटा’चे झाले होते. नव्या स्वरूपातील नवी-जुनी गाणी, मेडली, थीम डान्स सादरीकरण, विनोदी चुटकुले असे करणूकप्रधान मिश्रण करून नवीन प्रयोग बसविण्यात आला आहे. या नव्या स्वरूपातील कार्यक्रमाचे संगीत संयोजन राज नाईक यांचे असून नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे यांनी केले आहे. वेशभूषेची जबाबदारी महेश शेरला यांनी सांभाळली असून हरी पाटणकर व्यवस्थापक म्हणून काम पाहणार आहेत.