‘फाफडा-जलेबी’शी ‘वडापाव’चे- गुजराती व मराठी भाषकांचे नाते जसे ईर्षांपूर्णरीत्या रंगविले जाते, तसेच तमिळ व मल्याळम भाषकांबद्दलही म्हटले जाते. भारताची दक्षिणभूमी हा संस्थाने वगळता ‘मद्रास प्रांता’चा भाग, त्यातून भाषावार प्रांतरचनेवेळी केरळ वेगळे झाले. पण केरळच्या तिरुवनंतपुरम शहरात राहणारे आणि तमिळ भाषकच नव्हे तर तमिळ लेखक, तमिळ भाषकांचे संघटक असणारे ए. माधवन यांनी मल्याळममधील उत्तम कादंबऱ्या तमिळमध्ये आणून भाषांचे पूलही बांधले. ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ विजेते ए. माधवन यांचे ५ जानेवारीस निधन झाल्याने, दोन्ही भाषांचे नुकसान झाले आहे.
विनाकारण बांधल्या जाणाऱ्या दुविधांच्या भिंती तोडण्याची कलाच माधवन यांना अवगत असावी. म्हणून तर, तिरुवनंतपुरम रेल्वे स्थानकाजवळच्या चलई भागातील बाजारात ‘सेल्वी स्टोअर्स’ हे लहानसे, तमिळ वस्तू भांडार आजन्म चालवताना त्यांनी उत्तम साहित्यनिर्मिर्तीही केली आणि कुठलेही ‘प्राध्यापकी जाळे’ वगैरे हाताशी नसूनसुद्धा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार आणि पुढे निवड समितीत सहभागापर्यंत मजल मारली. द्रमुक या पराकोटीच्या तमिळवादी पक्षाचे ते केरळवासी समर्थक होते. ‘तमिळ संघम’ ही संघटना त्यांनी तिरुवनंतपुरममध्ये स्थापली आणि तमिळनाडूचा ‘कलाइंगार पुरस्कार’देखील मिळवला. पण कधी तिरुवनंतपुरम सोडले नाही. उलट, या शहराच्या गजबजाटातूनच लेखकीय ऊर्जा मिळवली!
यामुळेच, लेखक म्हणून त्यांचे वेगळेपण सुमारे ५०० कथा आणि पाच कादंबऱ्यांतून दिसते. ‘कृष्णपरन्दु’ ही पहिल्या तीनपैकी दुसरी कादंबरी, परंतु त्या तीन कादंबऱ्यांना मिळून ‘कृष्णपरन्दु त्रयी’ म्हटले जाते. कृष्णपरन्दु म्हणजे जिला ‘गरुड’ मानले जाते अशी पांढऱ्या व तपकिरी रंगाची समुद्री घार. जमिनीवरील एखाद्याच जिवाची सूक्ष्म हालचालही उंचावरून नेमकी टिपणे हे घारीचे वैशिष्टय़ माधवन यांच्यातही होते, असे समीक्षक सांगतात. त्यांच्या लिखाणावर सुरुवातीला आर. के. नारायण यांच्या लेखनाचा प्रभाव होता. त्यातून कालपरत्वे- अर्थात स्वत:च्या काळाचे वेगळेपण ओळखू शकल्यामुळेच- ते बाहेर पडले. माणसांच्या दबलेल्या इच्छा हा त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू राहिला. मलयतुर रामचंद्रन यांची ‘यक्षी’, पी. के. बालकृष्णन यांची ‘नान उरंगट्टै’ व करूर नीलकांतपिल्लै यांची ‘सम्मानम’ या तीन समकालीन मल्याळम कादंबऱ्या त्यांनी तमिळ भाषेत अनुवादित केल्या. ‘पुनळम मनलम’ (१९७४) या कादंबरीचे ‘ऑन अ रिव्हर्स बॅन्क’ हे इंग्रजी भाषांतरही अलीकडेच आले. २०१५ सालचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ मात्र त्यांना ‘इळक्किय चुवाडुकल’ या लेखसंग्रहासाठी मिळाला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 8, 2021 12:56 am