कोकणात कवी मंडळींची संख्या भरपूर. ढोबळमानाने बघायचे तर त्यातील बहुतांश कवी हे रोमँटिसिझमकडे झुकलेले. हे चित्र निदान ७०-८०च्या दशकात तरी होतेच होते. (केशवसुत आदींची उदाहरणे येथे देणे कालानुरूप औचित्याचे ठरणार नाही.) बंडखोरीचे, विद्रोहाचे सूर फारच विरळा कवींच्या रचनांतून दिसायचे. आबा सोनू शेवरे हे अशा विरळा कवींमधील एक.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजव्यवस्था, जातिव्यवस्था, भेदव्यवस्था, अंधश्रद्धा अशा अनेक कुप्रथांना धिक्कारणारी अशी आबांची कविता. ८०च्या दशकात स्थानिक नियत-अनियतकालिकांतून त्यांना प्रसिद्धी मिळाली. आंबेडकरी विचार, परिवर्तनवादी विचार हा त्यांच्या कवितेचा पाया. हा असा पाया ज्यांच्या कवितांचा आहे असे अनेक कवी आज कोकणात दिसतात. त्यातील अनेक त्यासाठी आबांचे ऋण मान्य करतात, यावरून आबांचे मोठेपण लक्षात यावे. सरळसोट नोंद घ्यायची तर आबा शेवरे यांचा जन्म १५ जुलै १९४६ रोजीचा. देवगड तालुक्यातील कोर्ले हे त्यांचे गाव आणि प्रदीर्घ काळ वास्तव्य खारेपाटण येथे. शिक्षण वगैरे प्रचलित परंपरांनुसार झालेले. पोटापाण्यासाठी काही काळ खारेपाटण हायस्कूलमध्ये आणि काही काळ एसटीमध्येही आबांनी नोकरी केली. पण त्यात ते अल्पस्वल्पही रमू शकले नाहीत. कवितेसाठी, कवितेपायी वेडा झालेला हा माणूस. व्यवहार, त्यातील खाचखळगे, त्यात कळत-नकळत कराव्या लागणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा तडजोडी, जगण्यासाठी कधी करावी लागणारी बनवेगिरी या असल्या गोष्टींपैकी काही म्हणजे काहीही आबांना कधीही जमले नाही. अशा माणसाच्या आयुष्याचे मग जे काही होते ते झालेच.. परवड आणि वणवण. आपल्या आयुष्याच्या अंताआधी, त्या तथाकथित परमेश्वरास, त्याने न मागताच दिलेली जात, द्वेष, मत्सर त्यालाच परत करण्याची इच्छा बाळगणारा हा अवलिया कवी एक छोटे वर्तुळ वगळता इतरत्र फारसा परिचित नव्हता. माणसाला नाकारून चालणार नाही, हे त्यांच्या कवितेचे आणि आयुष्याचेही सूत्र होते. कवितांमधून शब्दांच्या आधारे वाईट गोष्टींवर तीव्र प्रहार करणारा हा कवी, प्रत्यक्ष आयुष्यात वागायला, बोलायला अतिशय मृदू व हळवा. त्यांच्या निधनाचे वृत्त बुधवारी समाजमाध्यमांवर फिरले आणि गुरुवारी वृत्तपत्रांत आले, तेव्हा अनेकांना मुळात असा कुणी कवी होता आणि तो उत्तम कविता करायचा याची माहिती झाली. प्रसिद्धीखोर साहित्यव्यवहारांकडे आबा शेवरे यांनी फिरवलेली सपशेल पाठ हे त्यामागचे एक प्रमुख कारण. ‘गांधारीची फुले’, ‘दफनवेणा’, ‘अंधारातला जागल्या’, ‘झिरो बॅलन्स असलेले माझे पासबुक’ ही त्यांची पुस्तके. त्यातील ‘झिरो बॅलन्स असलेले माझे पासबुक’ हे पुस्तक अगदी आत्ता आत्ता, सुमारे महिन्याभरापूर्वी प्रकाशित झाले. शेवटच्या संग्रहाचे नाव वास्तव आयुष्याला इतके जवळ जाणारे असावे, यातून आबांचे सच्चेपण कळावे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaba shewre
First published on: 28-10-2016 at 02:58 IST