काही माणसे अशी असतात की, ती ज्या क्षेत्रात उडी घेतील, त्या क्षेत्राची प्रगती सकारात्मक दिशेने होते. विविध क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रांतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व लाभलेले नारायण कृष्णा तथा आबासाहेब महाजन हे अशाच व्यक्तींमध्ये मोडणारे संघटक होते. त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या मनमिळाऊ स्वभावाने हजारो चाहते निर्माण केले होते. गिर्यारोहण, शिक्षण, स्काऊट, नागरी संरक्षण दल, रेडक्रॉस अशा विविध क्षेत्रांमध्ये महाजनसरांच्या अतुलनीय कार्याचा ठसा उमटला आहे.

एन.डी. नगरवाला यांच्यासमवेत नगरवाला प्रशालेच्या (पूर्वीची नॅशनल मॉडेल स्कूल) स्थापनेत महाजन यांचा महत्त्वाचा वाटा होता. परगावच्या मुलांची निवासाची सोय व्हावी यासाठीच दिनप्रशालेबरोबरच निवासी प्रशालाही त्यांनी स्थापन केली. नगरवाला प्रशालेचे मुख्याध्यापक म्हणून काम करताना त्यांनी मुलांसाठी अनेक वैशिष्टय़पूर्ण उपक्रम सुरू केले होते. केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगाचे नाही, त्याच्या जोडीला अन्य क्षेत्रांचीही माहिती मुलांनी मिळविली पाहिजे असा त्यांचा दंडक असे. त्यांना क्रीडा क्षेत्राची विलक्षण आवड होती. मुलांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही चमक दाखविली पाहिजे या हेतूने त्यांनी हॉकी, बॉक्सिंग, अ‍ॅथलेटिक्स आदी विविध खेळांच्या संघटनांची स्थापना केली. शालेय स्तरावर विविध स्पर्धाच्या आयोजनातही त्यांनी पुढाकार घेतला होता. महाराष्ट्र हॉकी संघटनेमार्फत त्यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू महाराष्ट्रातून घडविले. बॉक्सिंगमध्ये महाराष्ट्राची मुले कमी पडतात हे लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हा स्तरावर या खेळासाठी संघटना उभी केली.  गिर्यारोहण हे त्यांच्या नसानसांत भिनले होते, असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. ‘भारत आऊटवर्ड बाऊंड पायोनीयर्स’ या संस्थेमार्फत त्यांनी सह्य़ाद्री पर्वतराजीप्रमाणेच हिमालयातही भरपूर पदभ्रमण मोहिमांचे आयोजन केले. या मोहिमांमधील त्यांचा उत्साह अन्य तरुण गिर्यारोहकांना नेहमीच थक्क करणारा असे. सिंहगडाचे वारकरी अशीच त्यांची ओळख होती. मात्र आजारी होण्यापूर्वीदेखील दर रविवारची सिंहगड चढण्याची वारी त्यांनी कधीही चुकवलेली नाही. अगदी आता वयाच्या ९६ व्या वर्षीदेखील त्यांचा हा नेम चुकला नाही. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी पॅराग्लायडिंग करीत साहसी क्रीडा क्षेत्रातील आपल्या जिद्दीचा प्रत्यय घडविला होता. सह्य़ाद्रीतील मोहीम असो की हिमालयातील मोठी मोहीम असो; महाराष्ट्रातील अनेक गिर्यारोहकांना महाजन यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभत असे. गिरिप्रेमी संस्थेच्या एव्हरेस्ट मोहिमेसह र्सवच मोहिमांसाठी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते. महाजन यांचा सामाजिक कार्याकडेही ओढा होता. कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी आर्थिक मदत उभारणीच्या कार्यातही त्यांनी मोलाची कामगिरी केली होती. महाजन यांचे नुकतेच निधन झाले, मात्र पदभ्रमण व अन्य क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामगिरीद्वारे ते सतत सर्वाच्या स्मरणात राहणार आहेत.

((  आबासाहेब महाजन )))