स्त्रियांचे प्रश्न व समस्या साहित्यातून मांडण्याचे प्रयत्न आतापर्यंत ज्या स्त्री साहित्यिकांनी केले त्यांच्यात तेलुगू लेखिका अब्बुरी छायादेवी यांचा मोठा सहभाग होता. गेल्या अनेक वर्षांच्या साहित्यिक कारकीर्दीत त्यांनी बदलत्या समाजात स्त्रियांचे प्रश्न मांडले. स्त्रीवादी लेखिका अशी त्यांची प्रमुख ओळख होती. या छायादेवींचे निधन शुक्रवारी, २८ जून रोजी झाले. गेले काही दिवस त्या फुप्फुसाच्या विकाराने आजारी होत्या. त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या ‘थाना मार्गम’ या लघुकथासंग्रहास २००५ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. ‘इव्हार्नी चेसुकोनू’ ही त्यांची दुसरी गाजलेली साहित्यकृती. त्यांच्या पुस्तकांचे इंग्रजी, स्पॅनिश व अन्य भाषांत अनुवादही झाले.

आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्य़ात राजमुंद्री येथे छायादेवी यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९३३ रोजी झाला. समीक्षक, लेखक व अधिकृत भाषा आयोगाचे माजी अध्यक्ष दिवंगत अब्बुरी वरद राजेश्वर राव यांच्या त्या पत्नी. त्यांचे सासरे अब्बुरी रामकृष्ण हे प्रागतिक साहित्य चळवळीचे प्रवर्तक होते. त्यातून त्यांना साहित्याचा वारसा वेगवेगळ्या मार्गानी मिळाला होता. त्या दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून काम करीत. वाचनाच्या गोडीतूनच त्या लेखनाकडे वळल्या. १९५० पासून छायादेवी या साहित्यिक वर्तुळात होत्या. सर्जनशील स्त्रीवादी लेखिका म्हणून त्यांनी १९७० पर्यंत चांगलेच नाव कमावले. १९९८ ते २००२ या काळात त्या केंद्रीय साहित्य अकादमीच्या सदस्य होत्या. ‘अब्बुरी छायादेवी कथालु’ हा त्यांच्या निवडक लघुकथांचा संग्रह, ‘मृत्युंजय’ (दीर्घकथा), ‘तना मार्गम’ ही त्यांची प्रमुख ग्रंथसंपदा. यापैकी ‘तना मार्गम’ पुस्तकात कौटुंबिक बंधनांच्या नावाखाली स्त्रियांचा छळवाद मांडणाऱ्या समाजावर प्रहार करणाऱ्या लघुकथा आहेत. ‘बोन्साय बटुकुलु’ (बोन्साय लाइव्हज) हे त्यांचे स्त्रियांच्या मनातील घुसमट चित्रित करणारे आणखी एक महत्त्वाचे पुस्तक आहे. खेडय़ातूनच नव्हे तर शहरातूनही आज संस्कारांच्या नावाखाली स्त्रियांना अनेक मर्यादांना व अन्यायाला तोंड द्यावे लागते. त्यांचे जीवन अक्षरश: बोन्सायसारखे खुरटून जाते, पुरुषी मानसिकतेच्या सावलीत त्या मुक्तपणे जीवन जगू शकत नाहीत, किंबहुना त्यांचे जीवन यंत्रवत होऊन जाते. ही जवळपास प्रत्येक स्त्रीची व्यथा त्यांनी त्यांच्या पुस्तकांमधून समर्थपणे मांडली आहे.

तेलुगू भाषेत सर्वोत्तम साहित्य यावे, हा त्यांचा ध्यास होता. लेखक स्टीफन झ्वाइग यांच्या, युरोपीय साहित्य-संस्कृतीतील बिनीच्या शिलेदारांचे गुणदोष डोळसपणे सांगणाऱ्या लेखांचे भाषांतर त्यांनी ‘परिचित लेख’ या पुस्तकात केले आहे. जे कृष्णमूर्ती यांच्या व्याख्यानसंग्रहांपैकी ‘मना जीवितालु – जिद्दू कृष्णमूर्ती व्याख्यानलु’ या पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केला होता. मुलांसाठीही त्यांनी लेखन केले त्यात ‘अनगा अनगा’ या लोककथासंग्रहाचा समावेश होता.

२००३ मध्ये त्यांना रंगनायकम्मा प्रतिभा पुरस्कार मिळाला होता, तर १९९६ मध्ये त्यांच्या कार्याचा तेलुगू विद्यापीठ पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. त्यांच्या निधनाने स्त्रियांची दु:खे संवेदनशीलपणे टिपणारी एक लेखिका आपण गमावली आहे.