News Flash

सुमिता सन्याल

काळ पुढे सरकत असल्याने, ‘वय वाढणे’ ही अपरिहार्यता तिला टाळता आली नाही.

सुमिता सन्याल

सुमारे ४५ वर्षांपूर्वी रुपेरी पडद्याला पडलेले ‘आनंद’ नावाच्या चित्रपटाचे स्वप्न, तरुणाईच्या तीन पिढय़ा उलटल्यानंतरही अजूनही तेवढेच टवटवीत आहे. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या त्या काळातील सुपरस्टार जोडीचा कसदार अभिनय, मनाचा ठाव घेणारे हळवे कथानक यांच्याबरोबरच, तरुणाईला स्वाभाविक हुरहुर लागून राहील अशा एका अनोख्या आकर्षणाचे वलय त्या चित्रपटाला लाभले आणि चित्रपटाच्या अजरामरतेसोबत ते वलयही तेवढेच अजरामर होऊन राहिले. या चित्रपटात अमिताभ बच्चनच्या प्रेयसीची- ‘रेणू’ची भूमिका वठविणारी सुमिता सन्याल हे त्या सुंदर स्वप्नाचे नाव! १९४५ साली जन्मलेल्या आणि ‘आनंद’च्या लोकप्रियतेच्या काळात पंचविशी नुकतीच ओलांडलेल्या या सोज्वळ अभिनेत्रीने तिच्या अभिनय आणि रूपाने त्या जमान्यातील तरुणाईला अक्षरश: वेड लावले, तिच्यासाठी अनेक तरुण मने झुरली, जागेपणी आणि स्वप्नातही तिच्या प्रतिमेची पूजा करत अनेकांनी आपली उभी तरुणाई तिच्यावर उधळून टाकली. ‘टॉलीवूड’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या बंगाली चित्रपटसृष्टीत आणि ‘बॉलीवूड’मध्येही सुमिता सन्याल हे नाव १९६३ पासून अगदी काल-परवापर्यंत झळकत राहिले. काळ पुढे सरकत असल्याने, ‘वय वाढणे’ ही अपरिहार्यता तिला टाळता आली नाही. सुमिता सन्याल नावाच्या १९६५-७५ च्या दशकातील या सौंदर्यवती अभिनेत्रीच्या शरीरावर वयोमानाच्या खुणा उमटल्या, तरी रसिकांच्या मनाच्या पटलावर मात्र, तिचा त्या वयातील निखळ सौंदर्यवान चेहराच अढळपणे उमटून राहिला होता.

स्वातंत्र्यपूर्व काळातील बंगाल प्रांताच्या दार्जिलिंगमध्ये जन्मलेल्या सुमिताचे पाळण्यातले नाव मंजुळा असले, तरी चित्रपटसृष्टीने मात्र तिला सुमिता या नावानेच स्वीकारले आणि याच नावाने तिची कारकीर्द खुलली. टॉलीवूडच्या दुनियेतील पदार्पणात तिचे सुचौरिता असे नामकरण करण्यात आले, पण नंतर चित्रपट निर्माते कनक मुखोपाध्याय यांनी त्या नावाला ‘सुमिता’ असा सुटसुटीतपणा दिला. १९६० मध्ये ‘खोकाबाबूर प्रत्याबर्तन’ या बांगला चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलेल्या सुमिताने ४० हून अधिक बांगला चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची आणि सौंदर्याचीही मोहोर उमटविली. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘आशीर्वाद’, ‘आनंद’, ‘गुड्डी’, ‘मेरे अपने’, ‘द पीकॉक स्प्रिंग’ आदी गाजलेल्या चित्रपटांत काहीशा दुय्यम भूमिका करूनही तिच्या आठवणी एका पिढीने अजूनही आपल्या मनाच्या हळव्या कप्प्यात जपून ठेवल्या आहेत. चित्रपटांचा विषय निघाला, की ही पिढी नकळत तो कप्पा अलगदपणे उघडते आणि त्यांच्या नजरेसमोर सुमिताची त्या वेळची प्रतिमा पुन्हा जिवंत होते, आठवणी ताज्या होतात आणि ‘एक था बचपन’ म्हणत, मनातल्या मनात, ‘बोले रे पपीहरा’ची धूनही ताल धरू लागते.. बंगाली नाटय़सृष्टी आणि चित्रवाणी मालिकांमध्येही सुमिताचा तो खास बंगाली सौंदर्याने नटलेला लोभसवाणा चेहरा अगदी परवापरवापर्यंत रसिकांना त्यांच्या जमान्याच्या आठवणींच्या गुदगुल्या करत राहिला, पण आपल्या कसदार अभिनयाने चित्रपटसृष्टीवर ठसा उमटविणाऱ्या आणि रसिकांना भुरळ घालणाऱ्या सुमिताला चित्रपटसृष्टीने मात्र काहीसे उपेक्षितच ठेवले. चित्रपटांच्या संपादन क्षेत्रात ज्यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते, त्या सुबोध रॉय यांच्याशी सुमिताचा विवाह झाला. ‘गुड्डी’तील वहिनीप्रमाणेच पती, मुलगा, संसार यात त्या रमून गेल्या. गेल्या रविवारी, वयाच्या ७१ व्या वर्षी, हृदयविकाराच्या झटक्याने कोलकाता येथे सुमिताचे निधन झाले आणि पाच दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनात जपल्या गेलेल्या एका टवटवीत स्वप्नाची अखेर झाली. तिच्या सोज्वळ सौंदर्याची आणि अभिनयाची आठवण जागी असलेल्या तेव्हाच्या तरुण पिढीची अवस्था आता, ‘जिया लागे ना’.. अशीच झाली असेल, यात शंका नाही!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 1:26 am

Web Title: actress sumita sanyal
Next Stories
1 नरेश चंद्र
2 निरुपम सेन
3 हिरा पंडित
Just Now!
X