तस्करी (पायरसी) आणि ऑनलाइन समाजमाध्यमांतील हौशा-गवशा कलाकारांच्या पुरामुळे अध्र्याहून अधिक आर्थिक तोटय़ात असलेल्या जागतिक संगीत उद्योगाच्या पडत्या काळात अडेलसारख्या ‘परफॉर्मर’ गायिकेचे महत्त्व वादातीत आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात मानांकन असलेल्या पाचही मानाच्या पुरस्कारांना खिशात घालून वर सर्वाधिक नऊ नामांकने मिळवून केवळ दोन पुरस्कार पटकावणाऱ्या बियॉन्स या अमेरिकी प्रतिस्पर्धी गायिकेची वारेमाप जाहीर स्तुती करण्याची अडेलची नम्रतेची कला सध्या वाखाणली जात आहे. ब्रिटनमधल्या मध्यमवर्गाचे आयुष्य जगलेल्या अडेलने संगीताचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर केवळ आपल्या ज्ञान-दाखल्याकरिता दोन-तीन गाण्यांचे डेमो बनवून ठेवले होते. व्यावसायिक गायिका बनण्याचे स्वप्न वगैरे काहीच उराशी बाळगले गेले नव्हते. सोशल मीडियातून स्टार बनण्याचा ट्रेण्ड जुना झाला होता, तेव्हा तिच्या परिचिताने तिचे गाणे मायस्पेस या समाजमाध्यमावर प्रसारित केले. ते ऐकून ब्रिटनमधल्या रेकॉर्ड कंपनीने तिला गाण्यांच्या करारासाठी केलेल्या दूरध्वनीवर तिचा विश्वास नव्हता. कारण तिला त्या कंपनीचे नावच माहिती नव्हते. २००८ साली एकोणिसाव्या वर्षी ‘नाइन्टीन’ हा अल्बम आला. ‘होमटाऊन ग्लोरी’ आणि ‘चेसिंग पेव्हमेण्ट’ ही गाणी प्रसिद्ध झाली. पैकी चेसिंग पेव्हमेण्टच्या कलात्मक व्हिडीओचेही कौतुक झाले; पण तत्कालीन चकचकीत संगीत मनोरंजनाच्या विश्वात या भारदस्त आवाजाच्या गायिकेचे भारदस्त शरीर या क्षेत्रात तिला फार काळ टिकू देणार नाही, असे भाकीत वर्तविले गेले. एकीकडे टेलर स्विफ्टच्या शिडशिडीत शरीरसौंदर्याचे आणि दुसरीकडे लेडी गागाच्या दिखाऊ अदाकारीचे गुणगान सुरू असताना म्युझिक प्रोडय़ूसर (बक्कळ पैसे घेऊन ही गाणी लिहिणार, संगीतबद्ध करणार; परंतु नामानिराळे राहून त्यावर प्रसिद्ध गायक/गायिका आणखी प्रसिद्ध होणार) जमात संगीतविश्वात फोफावू लागली होती. या काळात स्वत:ची गाणी स्वत: लिहून चाली-संगीत करणारी जी थोडीथोडकी कलाकारांची फळी शिल्लक राहिली, त्यात अडेल अग्रभागी आहे.

‘नाइन्टीन’ अल्बमने ग्रॅमीत तिला नवकलाकाराचा पुरस्कार पटकावून दिला. अमेरिकेत ओळख प्राप्त झाली आणि दोन वर्षांत झंझावातासारखा हा आवाज जगभर लोकप्रिय झाला. त्यापुढल्या ‘ट्वेन्टीवन’ या तिच्या अल्बमने लोकप्रियतेचे सारे इतिहास मोडून नवे निकष मांडले. ‘रोलिंग इन द डीप’, ‘समवन लाइक यू’ या गाण्यांची यूटय़ूबवर आज शेकडो-हजारो व्हर्शन्स आहेत. या गायिकेने आपल्या आवाजाच्या बळावर गिनेस बुकमध्ये पोहोचावे असे काय आहे तिच्या गाण्यांत? तर वैयक्तिक सुख-दु:खांच्या गाथांना अतिसाध्या शब्दांत पकडून स्वरबद्ध करण्याची हातोटी!

चेसिंग पेव्हमेण्टपासून ते आत्ताच्या हेलोपर्यंतची सारी गाणी, ऐकणारा स्वत:च्या आयुष्याशी ताडून पाहू शकतो. मनोरंजनासाठीची किंवा वेळ मारण्यासाठी बीट्स चमत्कृतींची यमकपूर्ण गाणी बनविण्यात तिला स्वारस्य नाही. तिच्या लोकप्रिय गाण्यांऐवजी ‘टायर्ड’, ‘टेक इट ऑल’, ‘डोण्ट यू रिमेम्बर’ ही गाणीदेखील ऐकावीत. ‘गाण्यात जीव ओतणे’ ही आज कठीण वाटणारी बाब अस्तित्वात असल्याचा प्रत्यय येऊ शकेल. तिच्या या झोकून देण्याच्या प्रवृत्तीमुळेच जेम्स बॉण्डच्या चित्रपटासाठी तिने रचनाबद्ध करून गायलेले गाणे ऑस्कर पटकावून गेले. वयाच्या पंचविशीत १८ ग्रॅमी पुरस्कार मिळविणारी ही गायिका आपल्या सेलेब्रिटीपणाचे नाणे नेहमीच वाजविते; परंतु सेलेब्रिटी पदाला लागून येणाऱ्या धोक्यांपासून स्वत:ला ती कमालीची जपते. म्हणूनच, पुढील कारकीर्दीत नवा सांगीतिक इतिहास रचण्यात तिला काही अडेल असे वाटत नाही.