News Flash

अ‍ॅड. एकनाथराव साळवे

आदिवासी, दलितांना  पाणी मिळावे म्हणून सत्याग्रह केला. अनेक वेळा तुरुंगात गेले.

अ‍ॅड. एकनाथराव साळवे

दोघेही १९६७ मध्ये पहिल्यांदाच आमदार झाले, लोकचळवळीतून राजकारणात आले. दोघेही तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात उतरले होते… यापैकी एक तरुण म्हणजे शरद पवार; तर दुसरे अ‍ॅड. एकनाथराव साळवे. महाराष्ट्राच्या टोकावरील चंद्रपूरसारख्या जिल्ह््यात एकनाथरावांची कारकीर्द बहरली. गरीब शेतकरी कुटुंबात जन्मून व प्रचंड मोठा संघर्ष करून वकिलीची सनद मिळवली. पण, विद्यार्थीदशेतच फुले, आंबेडकर हे वैचारिक आदर्श ठरले. शिवाय, ए. बी. बर्धनांसारखे  कडवे कम्युनिस्ट मित्र म्हणून लाभले. त्यामुळे अर्थातच पैशांचा मोह मागे पडला. एकनाथरावांनी अगदी ठरवून चंद्रपूरच्या जनता विद्यालयात शिक्षकाची नोकरी धरली. याच दरम्यान राष्ट्र सेवा दलाचा लळा लागला. १९६७ मध्ये चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून, पहिल्यांदा एकनाथराव आमदार झाले. १९६७  ते  १९७८  अशी ११ वर्षे ते आमदार होते. पण, ना कुठला बंगला बांधला, ना चारचाकी गाडी घेतली.  ऐंशीव्या वर्षापर्यंत बसमधूनच प्रवास करीत राहिले. राजकारणाला जनहिताचे माध्यम बनवून बल्लारपूर येथे महात्मा जोतिबा फुले हिंदी, उर्दू, तेलुगु विद्यालयाची स्थापना केली.  कुठे शेतमजुरांसाठी मोर्चे तर कुठे आदिवासींसाठी संघर्ष हा तर जणू रोजचाच दिनक्रम. हा असा आडवळणाचा प्रवास सुरू असतानाच १९९३ साली वृत्तपत्रात एक बातमी उमटली. ‘माजी आमदार अ‍ॅड.  एकनाथराव साळवे यांचा बुद्ध धर्मात प्रवेश’ एकनाथरावांनी बुद्ध, आंबेडकर केवळ वाचलेच नाहीत तर त्यांच्या  सम्यक धम्मक्रांतीला आयुष्याचा मूलाधार बनवले. याच सम्यक क्रांतीच्या प्रेरणेतून त्यांनी ‘टाडा’ कायद्याखाली गोवलेल्या गरीब आणि  निरपराध आदिवासींसाठी वकील म्हणून न्यायालयात आवाज बुलंद केला. आदिवासी, दलितांना  पाणी मिळावे म्हणून सत्याग्रह केला. अनेक वेळा तुरुंगात गेले. नक्षलवादी असण्याच्या आरोपावरून पकडलेल्या अनेकांचे खटले त्यांनी चालवले; त्यामुळे ‘नक्षलवाद्यांचा पाठीराखा’ असा शिक्का त्यांच्यावर बसला. पण एकनाथरावांनी त्याची पर्वा कधीच केली नाही. १९९१ साली  सिरोंचाचे काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे नक्षल्यांनी अपहरण केले. मुख्यमंत्री शरद पवारांसह अख्खे सरकार हादरले. तेव्हा पवारांचा हाच मित्र मदतीला धावून आला. एकनाथराव जीप पकडून थेट नक्षल्यांच्या गडात दाखल झाले, सरकारच्या वतीने तडजोडीची चर्चा केली अन् धर्मरावबाबांची सुटका झाली. असे वादळी आयुष्य, त्यातून जन्मलेली अनेक पुस्तके आणि त्यासाठी मिळालेले अनेक  पुरस्कार मागे सोडून अलीकडेच, वयाच्या नव्वदीत एकनाथरावांनी जगाचा निरोप घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2021 12:01 am

Web Title: adv eknathrao salve abn 97
Next Stories
1 विनायक चासकर
2 राम भागवत
3 लोव ऑटेन्स
Just Now!
X