खरे तर हवामान बदलाच्या काळात कृषी क्षेत्राचा विचार करणे फार आवश्यक आहे. आपल्याकडची शेती पावसावर अवलंबून आहे. यंदा पाऊस पडत आहे हे ठीक; पण तो काही भागांमध्ये जास्त आहे, काही भागांत फारच कमी आहे. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांच्या प्रजातींचे संशोधन करण्यास महत्त्व आहे. हे काम करणाऱ्यांपैकी एक असलेले कृषी वैज्ञानिक डॉ. नीलमराजू गंगाप्रसाद राव यांचे नुकतेच हैदराबाद येथे निधन झाले. वयाच्या ८९ वर्षीही ते कार्यरत होते. कोरडवाहू जमिनीत कोणती पिके घेता येतील याबाबत त्यांचे मूलभूत व उपयोजित संशोधन होते; त्याचा खूप मोठा फायदा भारतीय कृषी क्षेत्राला झाला.

भारतातील संकरित ज्वारीचे निर्माते अशी त्यांची ओळख आजही आहे. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्य़ात कोरिसापाडू येथे झाला, तर शिक्षण बापटला येथील कृषी महाविद्यालयातून झाले. नंतर त्यांनी नवी दिल्लीतील इंडियन अ‍ॅग्रिकल्चरल रीसर्च इन्स्टिटय़ूट व बिहार विद्यापीठातून पुढे शिक्षण घेतले. त्यांना चंद्रशेखर आझाद कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाने मानद डॉक्टरेटही दिली होती.

gadchiroli lok sabha marathi news, gadchiroli lok sabha election marathi news
७ हेलिकॉप्टर, १५ हजारांहून अधिक जवान, गडचिरोलीत युद्ध क्षेत्राचा भास व्हावा…..
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती

ज्वारीच्या सीएसएच १, सीएसएच ५ व सीएसएच ९ अशा प्रजाती त्यांनी शोधून काढल्या, त्या फार लोकप्रिय झाल्या. भारतात जवळपास ८ ते १० दशलक्ष हेक्टर क्षेत्रात या प्रजातींची लागवड आहे. त्यामुळे ज्वारीचे उत्पादन १९७० ते १९८० या काळात खूप वाढले. भरपूर पाणी लागणाऱ्या गहू व तांदळाचे उत्पादन आधी जास्त होते, पण राव यांच्या संशोधनामुळे ज्वारीचेही उत्पादन त्यांच्या तोडीस तोड वाढवण्यात यश आले ही त्यांची सर्वात मोठी कामगिरी होती.

खरीप ज्वारीच्या उत्पादनात त्यांच्या संशोधनामुळे बरीच प्रगती झाली, त्यामुळे बियाणे उद्योगालाही फायदा झाला. एस ३५ ही ज्वारीची एक प्रजाती पश्चिम आफ्रिकेतील दुष्काळी भागात वाढते, त्याची लोकप्रियता वाढवण्यात राव यांचा मोठा वाटा होता. कोरडवाहू भागातील पीक पद्धतीत त्यांनी बदल केले. त्यात एरंड, चवळी, देशी कापूस यांची लागवड सुरू केली. त्यांच्या नावावर दोनशे संशोधन निबंध प्रसिद्ध असून संयुक्त राष्ट्रांची अन्न व कृषी संघटना, एआयआरआय, ज्वारी प्रकल्प समन्वयक, नायजेरिया, पश्चिम आफ्रिका या भागांतील विद्यापीठांमध्ये त्यांनी मार्गदर्शनाचे काम केले होते.

परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. सी. सुब्रह्मण्यम सुवर्णपदक, एस. एस. भटनागर जैविक विज्ञान पुरस्कार, रफी अहमद किडवई वनस्पती पुरस्कार,  वासविक कृषी विज्ञान पुरस्कार, आत्मगौरव पुरस्कार, उत्कृष्ट कृषी वैज्ञानिक पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले.

नवी दिल्ली येथील इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमी, अलाहाबाद येथील नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस या नामांकित संस्थांचे ते फेलो होते.