12 November 2019

News Flash

अहमद इसोप

वर्णविद्वेषाच्या नावाखाली दक्षिण आफ्रिकेत वसाहतवादी काळात मानवतेला काळिमा फासणारे अनेक गुन्हे घडले.

वर्णविद्वेषाच्या नावाखाली दक्षिण आफ्रिकेत वसाहतवादी काळात मानवतेला काळिमा फासणारे अनेक गुन्हे घडले. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनांना शब्दरूप देतानाच तेथील समाजजीवनाचे बारीक पदर उलगडणाऱ्या अहमद इसोप यांच्या लेखनाची धाटणी अतिशय वेगळी होती. विशेष म्हणजे शिक्षकाची नोकरी करीत असताना त्यांनी इतके चतुरस्र लेखन केले. इसोप हे मूळ भारतीय वंशाचे. १९८६ पासून ते शिक्षक म्हणून काम करीत होते. त्याचबरोबर लेखन हाही त्यांच्या जीवनाचा तितकाच महत्त्वाचा भाग होता. त्यांचे नुकतेच निधन झाल्याने साहित्याच्या माध्यमातून वर्णवर्चस्व विरोधाला शब्दातून उद्गार देणारा एक प्रतिभासंपन्न लेखक आपण गमावला आहे.

लघुक था, कादंबऱ्या, असे बरेच साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. दक्षिण आफ्रि केत विसाव्या शतकात वर्णवर्चस्वामुळे वंचितावस्थेत जगणाऱ्या लोकांचे चित्रण त्यांनी केले. मानवतेला काळिमा फासणाऱ्या गुन्ह्य़ांची पाश्र्वभूमी असलेल्या कथांतून त्यांनी नैतिक, मानवी अशा अनेक पातळ्यावंरचे प्रश्न हाताळले. ‘द हाजी’ (१९७८) या कथेत त्यांनी जोहान्सबर्गच्या जवळच असलेल्या फोर्ड्स बर्गच्या वस्तीत जीवन कंठणाऱ्या भारतीय वंशाच्या स्थलांतरितांचे केविलवाणे जिणे रेखाटले आहे.

एकीकडे वास्तव जीवनातील घटना रेखाटताना ते दुसरीकडे याच प्रश्नातील आध्यात्मिक पैलूंना स्पर्श करतात. समाजाने नाकारल्याचा आंतरिक संघर्ष त्यांच्या प्रत्येक कथावस्तूतून डोकावताना दिसतो. अमानवी वर्तणुकीचा कळस आपल्याला दक्षिण आफ्रिकेत पाहायला मिळत असताना, आपले अस्तित्व शून्य असल्याच्या जाणिवेतून स्वत:लाच टोचणी लावणाऱ्या समाजाचे चित्रण त्यांनी केले. त्यातून ‘द व्हिजिटेशन’ (१९८०) व ‘द एम्परर’ (१९८४) या दोन कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. संपूर्ण जगाचे कल्याण हेच माणसाचे मुख्य कर्तव्य असले पाहिजे, या अशोकाच्या वचनाचा उल्लेख ते दुसऱ्या पुस्तकात करतात. दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तींचे आयुष्य कसे होते, हे एरवी इतक्या समर्थपणे जगापुढे आले नसते. ते काम त्यांनी केले.

सम्राट अशोक व महात्मा गांधी यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी तेथील परिस्थिती उलगडतानाच वर्णविद्वेषावर प्रहार केले आहेत. ‘द थर्ड प्रॉफेसी’ (२००४) या पुस्तकात त्यांनी पूर्वीचीच शैली पुढे नेऊन एखादा मुस्लीम दक्षिण आफ्रिकेचा अध्यक्ष होईल, अशी भविष्यवाणी करणाऱ्या रोमा या प्रेषितसदृश व्यक्तिमत्त्वावर आधारित डॉ. सलमान खान हे पात्र रेखाटले आहे. त्यात वर्णविद्वेषानंतरच्या कालखंडातील राजकारण उलगडले आहे. इसोप यांचा जन्म १९३१ मध्ये भारतात झाला; पण ते लहान असतानाच आफ्रिकेत आले. इंग्रजीचे अतिशय उत्तम शिक्षक असा नावलौकिक त्यांनी मिळवला होता.

काही काळ त्यांना वर्णविद्वेषामुळे शिकवण्याचे काम बंद करावे लागले होते. ‘द हाजी अँड अदर स्टोरीज’ या पुस्तकासाठी त्यांना ऑल्विह श्रायनर पुरस्कार १९७९ मध्ये मिळाला होता. नंतर दक्षिण आफ्रिकेच्या कला व संस्कृती मंत्रालयाचा जीवनगौरवही मिळाला. वर्णविद्वेषाच्या कालखंडात त्यांच्या साहित्याने अक्षरश: दीपस्तंभासारखे मार्गदर्शन केले, त्यामुळेच त्यांचे वेगळे महत्त्व होते.

First Published on June 15, 2019 2:06 am

Web Title: ahmed essop