जवळपास २६ प्रकारच्या लढाऊ आणि माल वाहतुकीच्या विमानांचे सारथ्य करणाऱ्या, ४२५० तासांचा उड्डाण-अनुभव असलेल्या अधिकाऱ्याकडे भारतीय हवाई दलात दाखल होणारे ‘राफेल’ पहिल्यांदा उडविण्यास देण्यात यावे, यात नवल नव्हते. हे अनुभवसिद्ध अधिकारी एअर मार्शल राकेशकुमार भदोरिया यांच्याकडे १ ऑक्टोबरपासून भारतीय हवाई दलप्रमुखाची जबाबदारी सोपविण्यात येत आहे. राजकीय वादंग काहीही असले, तरी राफेलसारख्या आधुनिक विमानांची निकड हवाई दल कित्येक वर्षांपासून मांडत आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या करारानुसार ही विमाने भारत विकत घेईल. याविषयी भारत-फ्रान्स दरम्यानच्या तांत्रिक वाटाघाटींत भदोरिया यांची महत्त्वाची भूमिका राहिली. दोन आसनी विमानात आवश्यकतेनुसार १३ बदल करून घेण्यात आले. हवाई दलाच्या प्रमुखपदाची धुरा पुढील दोन वर्षे एअर मार्शल भदोरिया यांच्याकडे राहणार आहे. याआधी त्यांनी दलात उपप्रमुखपदासह अनेक  महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. त्यांचे वडील हवाई दलातील निवृत्त अधिकारी. लहानपणीच त्यांना दलाची ओळख झाली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रशिक्षण पूर्ण करून १९८० मध्ये राकेशकुमार हे हवाई दलात दाखल झाले. हवाई दलात आज बहुधा असे कोणतेही लढाऊ विमान नसेल की जे त्यांनी हाताळले नसेल. मालवाहू विमानांचेही त्यांनी सारथ्य केले. विमानाच्या परीक्षणासाठी चाचणी वैमानिक, प्रथम श्रेणीचे हवाई प्रशिक्षक, वैमानिकांना हवाई हल्ले चढविण्याचे शिक्षण देणारे प्रशिक्षक म्हणूनही ते परिचित आहेत. स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानाच्या चाचणीत ते मुख्य वैमानिक राहिले आहेत. हवाई उड्डाण चाचणी केंद्राचे प्रकल्प संचालक, जॅग्वार विमानाच्या तुकडीचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. ‘कमांड अ‍ॅण्ड स्टाफ’ महाविद्यालयातून त्यांनी संरक्षणशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. हवाई दलाचे दक्षिणी मुख्यालय, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. हवाई दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भदोरिया यांना परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, वायुसेना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राफेलचे उड्डाण केल्यानंतर त्यांनी चाचणी महत्त्वाची असल्याचा अनुभव मांडला. आपल्या आवश्यकतेनुसार राफेलचा प्रभावीपणे कसा वापर करता येईल हे सरावातून समजते, याकडे लक्ष वेधले होते. सुमारे ४० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेचा अनुभव त्यांना हवाई दलाचे नेतृत्व करताना निश्चितपणे कामी येईल.