18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

एअर मार्शल हेमंत भागवत

साडेतीन दशकांहून अधिक काळ भागवत यांनी हवाई दलात अनेक महत्त्वपूर्ण पदांची धुरा सांभाळली आहे.

लोकसत्ता टीम | Updated: August 9, 2017 1:32 AM

एअर मार्शल हेमंत भागवत  

भारतीय हवाई दलाच्या प्रशासकीय विभागाकडे मनुष्यबळाशी संबंधित आणि इमारतींची नवीन बांधकामे, दुरुस्ती व तत्सम स्वरूपाच्या कामांची जबाबदारी असते. या विभागांतर्गत आणखी दोन उपशाखा आहेत. हवाई वाहतूक आणि लढाऊ विमानांचे नियंत्रण. शत्रूच्या विमानावर हल्ला चढविण्यासाठी आपल्या लढाऊ विमानाचे स्थान महत्त्वाचे ठरते. त्या अनुषंगाने दैनंदिन सरावाद्वारे अभ्यासांती सज्जता राखली जाते. अतिशय महत्त्वपूर्ण अन् विशेष स्वरूपाचे हे काम. त्याचे दायित्व असणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखपदाची जबाबदारी आता, प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या एअर मार्शल हेमंत नारायण भागवत यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.

साडेतीन दशकांहून अधिक काळ भागवत यांनी हवाई दलात अनेक महत्त्वपूर्ण पदांची धुरा सांभाळली आहे. अकस्मात व गतिमान सैनिकी कार्यवाहीसाठी हवाई छत्रीधारी सैनिकांचे (पॅराट्रपर) विशेष पथक कार्यरत असते. हेलिकॉप्टर किंवा विमानातून झेप घेऊन त्यांना कारवाई करावी लागते. या क्षेत्रात भागवत यांनी लक्षणीय कामगिरी नोंदविली. आजवर वेगवेगळ्या २० विमानांमधून त्यांनी थोडय़ाथोडक्या नव्हे तर तब्बल २४०० उडय़ा मारल्या आहेत. युद्ध कार्यवाही प्रशिक्षण आणि क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी हा पल्ला पार केला. हवाई छत्रीतून उडी मारण्याचे शिक्षण देणारे दलातील अतिवरिष्ठ प्रशिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.

रत्नागिरी जिल्ह्य़ातील चिपळूण हे भागवत यांचे मूळ गाव. जून १९८१ मध्ये हवाई दलाच्या प्रशासकीय विभागातून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. वेलिंग्टनच्या डिफेन्स सव्‍‌र्हिस स्टाफ कॉलेजमधून पदवी घेऊन भागवत यांनी हैदराबादच्या ‘कॉलेज ऑफ एअर वॉरफेअर’मधून ‘हायर एअर कमांड’चे शिक्षण घेतले. सिकंदराबादच्या कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंटमधून ‘सीनिअर डिफेन्स मॅनेजमेंट’, मद्रास विद्यापीठातून सामरिकशास्त्र विषयात एम.एस्सी. आणि उस्मानिया विद्यापीठात एम.फिलचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले.

प्रारंभीची सात वर्षे हवाई दलाच्या आघाडीवरील तीन तळांवर हवाई वाहतूक नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले. आग्रास्थित पॅराट्रपर प्रशिक्षण केंद्रात मुख्य प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. हवाई दलाच्या ‘आकाशगंगा’ या हवाई छत्रीधारी सैनिकांच्या संघाचे अनेक वर्षे त्यांनी नेतृत्व केले. देशातील असा एकही भाग नाही की, जिथे भागवत यांनी हवाई छत्रीद्वारे झेप घेतलेली नाही. अमेरिका, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आदी देशांत आंतरराष्ट्रीय पॅरा सरावातदेखील ते सहभागी झाले. हवाई दलाचे दक्षिण-पश्चिम मुख्यालय, पश्चिम मुख्यालयात वरिष्ठ अधिकारी (प्रशासन), हवाई दल मुख्यालयात महत्त्वाच्या पदावर काम केले. पॅराट्रपिंगमधील योगदानाबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना वायू सेना पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. युद्धात हवाई दलाचे प्रभुत्व निर्णायक ठरते. सध्या देश वेगळ्या स्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. या वेळी भागवत यांचा अनुभव व कौशल्य हवाई दलास नव्या दिशेने झेपावण्यास उपयुक्त ठरेल, यात शंका नाही.

First Published on August 9, 2017 1:30 am

Web Title: air marshal hemant bhagwat