१९६१ मध्ये चीन, तर १९७१ मध्ये पाकिस्तानविरुध्द झालेल्या युद्धात हवाईमार्गे भारतीय जवानांना उतरविणे, आघाडीवरील सैन्याला रसद व शस्त्र पुरवठा करणे, अशी अतुलनीय कामगिरी निभावून वीर चक्र आणि महावीर चक्राचे मानकरी ठरलेले एअर व्हाइस मार्शल चंदन सिंह (निवृत्त) यांचे नुकतेच निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. सिंह यांनी प्रत्येक जबाबदारी धीरोदात्तपणे पार पाडली. विशेष म्हणजे, स्थलसेनेत दाखल होऊन नंतर हवाई दलात जाणारे ते पहिलेच अधिकारी. जोधपूरलगतचे बागावास हे सिंह यांचे मूळ गाव. वयाच्या १६ व्या वर्षी ते जोधपूर लान्सरमध्ये दाखल झाले. दुसऱ्या महायुध्दात त्यांची रेजिमेंट सहभागी झाली होती. काही वर्षांनी त्यांनी रॉयल इंडियन नेव्हीत जाण्याचा निर्णय घेतला. स्पिटफायर लढाऊ विमानास अपघात झाल्याने त्यांना हवाई दलाच्या वाहतूक विभागात पाठविण्यात आले. हिमालयीन पर्वतरांगांत अतिदुर्गम भागातील लष्करी ठाण्यांवर हवाई मार्गाने रसद पुरवठय़ाची त्यांनी सांभाळलेली भिस्त लक्षणीय ठरली. भारतीय हवाई दल आजदेखील रसद पुरवठय़ासाठी ती कार्यपध्दती, मानकांचे पालन करते.  स्क्वॉड्रन लिडर असताना सिंह यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. साधारणपणे हे पदक दोन किंवा त्यापेक्षा अधिक तारांकित अधिकाऱ्यांना दिले जाते.

१९६२ च्या भारत-चीन युद्धात सिंह यांनी आपल्या हेलिकॉप्टरने लडाख क्षेत्रात आघाडीवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांना रसद, शस्त्र पुरवठा केला. शत्रूकडून गोळीबार होत असताना त्यांच्या हेलिकॉप्टर फेऱ्या सुरू राहिल्या. या कामगिरीची दखल ‘वीर चक्र’ने घेण्यात आली. अशाच धाडसी कामगिरीचे दर्शन त्यांनी १९७१ च्या भारत-पाक युध्दात घडविले. यावेळी ते पूर्व क्षेत्रातील जोऱ्हाट हवाई तळावर मुख्य अधिकारी होते. भारतीय सैन्याला बांगलादेशातील ढाकाकडे कूच करण्यास अडचणी येत होत्या. यावेळी सिंह यांनी लष्करी तुकडय़ा शस्त्रसामग्रीसह एकाच रात्रीत हेलिकॉप्टरद्वारे मेघना नदीच्या पैलतीरावर नेण्याची योजना आखली. हेलिकॉप्टरच्या २६ फेऱ्यांद्वारे तीन हजार जवान आणि ४० टन दारूगोळा नेण्यात आला. पाकिस्तानी सैन्याकडून अखंडपणे गोळीबार सुरू असताना सिंह यांनी हे अभियान सुरू ठेवले. त्याची फलश्रुती भारतीय जवानांना ढाका शहराला वेढा घालणे सुकर झाले. पाकिस्तानी सैन्याला आत्मसमर्पण करावे लागले. या कामगिरीबद्दल सिंह यांना महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले. १९६५ च्या भारत-पाक युध्दात सिंह यांनी एन-१२ या मालवाहू विमानाद्वारे आपले वेगळेपण सिध्द केले. १९६२ च्या युध्दानंतर ओडिशात एव्हिएशन संशोधन केंद्राच्या स्थापनेत त्यांचे योगदान लाभले होते.