08 March 2021

News Flash

ऐश्वर्या टिपणीस

ऐश्वर्या टिपणीस या दिल्लीच्या स्कूल ऑफ प्लानिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर या संस्थेच्या माजी विद्यार्थिनी आहेत.

ऐश्वर्या टिपणीस

कुठलेही गाव, शहर, महानगर या प्रत्येकाला जुना वारसा असतो. त्याच्या खाणाखुणा या तेथील जुन्या इमारती, वाडे व ऐतिहासिक वास्तूंत दिसत असतात. त्यात सामान्य माणसाला वेगळेपण दिसेलच असे नाही. सरकारी धोरणे या वास्तूंना संरक्षण देण्यास अनुकूल अशीच असतात, पण त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही. त्यामुळे हा वारसा ग्रामीण भागातील असो वा शहरी भागातील तो जपला जातोच असे नाही. वास्तुरचनाकाराला मात्र या वास्तूतील सौंदर्य, वारसा, जतन करण्याच्या पद्धती हे सगळे कळावे लागते. भारतातील काही वास्तूंचे अशाच पद्धतीने वास्तुरचना संधारण-शास्त्राच्या माध्यमातून संवर्धन करणाऱ्या ऐश्वर्या टिपणीस यांना नुकताच फ्रेंच सरकारचा ‘शवालिए द ला ऑर्दे दे आर्त ए लेत्र’ (कला-साहित्य क्षेत्रातील उमराव) हा सांस्कृतिक सन्मान जाहीर झाला आहे. भारतातील फ्रेंच वास्तूंचे संवर्धन करण्याच्या कामासाठी त्यांना गौरवण्यात आले. ऐश्वर्या या संवर्धन वास्तुरचनाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. जुन्या वास्तूंचे तिचा मूळ पोत कायम ठेवून संवर्धन व जीर्णोद्धार करण्याचे तंत्र त्यांना अवगत आहे. वयाच्या सदतिसाव्या वर्षी त्यांना हा सन्मान मिळाला आहे, त्यामुळे अजून बराच काळ या क्षेत्रात त्यांना कामासाठी संधी आहे. यापूर्वी १९८०च्या दशकात कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांना हा पुरस्कार मिळाला होता, तर वास्तुरचनाशास्त्रात राज रेवाल यांना गौरवण्यात आले होते.

ऐश्वर्या टिपणीस या दिल्लीच्या स्कूल ऑफ प्लानिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर या संस्थेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांनी देशातील संवर्धन वास्तुरचनाकार म्हणून पुरातन वास्तूंचा वारसा जपण्यात मोठे काम केले. मध्य प्रदेशातील महिदपूर किल्ल्याचे संवर्धन, डेहराडून येथील डून स्कूलच्या इमारतीचे संवर्धन हे त्यांचे प्रकल्प गाजले. त्यासाठी त्यांना युनेस्कोचा पुरस्कारही मिळाला होता. भारतातील ज्या फ्रेंच वारसा इमारती आहेत त्यांचे त्यांनी जतन केले आहे. चंद्रनगर ही कोलकात्यापासून ४० कि.मी. अंतरावर असलेली फ्रेंच वसाहत त्यांनी संवर्धन तंत्राने जपली. टिपणीस यांनी युरोपीय शहर संवर्धन या विषयात स्कॉटलंडच्या डँडी विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली. ब्रिटनमध्ये वास्तुरचनेचे प्रशिक्षण घेतले. ‘व्हर्नाक्युलर ट्रॅडिशन्स-कंटेम्पररी आर्किटेक्चर’ हे पुस्तक त्यांनी लिहिले असून अनेक वृत्तपत्रांतून वास्तुकलेवर लेखनही केले आहे. त्यांनी पश्चिम बंगालमधील चिनसुरा ही डच वास्तू संवर्धित केली असून जागतिक वारसा असलेल्या दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचा सर्वंकष संवर्धन व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

‘नवीन इमारतींच्या रचना तयार करण्यात इतर सहकाऱ्यांप्रमाणे माझे मन रमणार नव्हते, त्यामुळे यातील संवर्धन वास्तुरचनेची वेगळी वाट निवडली,’ असे त्या सांगतात. भूतकाळ व भविष्यकाळ यांचे नाते जोडण्याचे हे काम नक्कीच सोपे नाही, पण त्यात ऐश्वर्या यांनी मिळवलेले नैपुण्य हे निश्चितच शहरी संस्कृतीची जुनी ओळख जपणारे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 2:06 am

Web Title: aishwarya tipnis
Next Stories
1 के. सिवान
2 आंचल ठाकूर
3 विजय मुखी
Just Now!
X