24 January 2021

News Flash

अजय देसाई

देसाई यांनी आपले आयुष्य खऱ्या अर्थाने हत्तींना समर्पित केले.

अजय देसाई

 

भारतीय माणसाला हत्तींची नव्याने ओळख करून देणाऱ्या संशोधकांमध्ये अजय देसाई यांचे प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल. तिरस्कार, भय किंवा परंपरागत प्रदान केलेले दैवीपण अशा टोकाच्या मानसिकतेचे पडसाद भारतीय वन्यजीव वर्षांनुवर्षे भोगत आहेत. त्यातून उभ्या राहणाऱ्या माणूस आणि वन्यजीवांतील परस्पर संघर्षांतून काही प्रमाणात हत्तींचा बचाव झाला, यातही देसाई यांचा मोठा वाटा आहे. देसाई यांचे नुकतेच वयाच्या ६३ व्या वर्षी बेळगाव येथे निधन झाले.

देसाई हे मूळचे बेळगावचे. बेळगावातच सागरी जैवविविधता या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई येथील ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’त त्यांनी संशोधन सुरू केले. देसाई यांनी आपले आयुष्य खऱ्या अर्थाने हत्तींना समर्पित केले. मनोरंजन, शिकारी याला विरोध करून प्राणी हक्काचा, संवर्धनाचा विषय गांभीर्याने घेतला जाऊ लागला होता अशा १९७०च्या दशकात त्यांनी कामाला सुरुवात केली. जवळपास ३५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी हत्तींचे संवर्धन आणि त्यांच्या चालढालीचा अभ्यास केला. हत्तींना ‘रेडिओ कॉलर’ लावून त्या माध्यमातून हत्तींचा अभ्यास करण्याची सुरुवात त्यांनी केली. दक्षिण भारतात हत्ती संवर्धनासाठी काम करणारी जवळपास एक पिढी त्यांच्या हाताखाली उभी राहिली. आशियातील हत्ती हा त्यांच्या संशोधनाचा विषय. हत्ती संवर्धनाचा आराखडा तयार करणाऱ्या समितीत त्यांचे योगदान होते. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झव्‍‌र्हेशन ऑफ नेचर’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या आशियाई हत्तींच्या संवर्धनासाठी नेमण्यात आलेल्या अभ्यासगटाचे १० वर्षे त्यांनी नेतृत्व केले. नुकतीच तमिळनाडूतील हत्ती व मानव संघर्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली होती. हत्तींचे पूजन आणि त्यांचा संहार या दुटप्पीपणाची जाणीव त्यांनी भारतीयांना प्रकर्षांने करून दिली. आशियातील हत्तींच्या प्रजातींना असलेला धोका, त्यांची शिकार, रागातून होणारी त्यांची हत्या, त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाय या सगळ्याचा लेखाजोखा मांडणारा, १९९७ साली प्रसिद्ध झालेला त्यांचा शोधनिबंध अनेक योजनांना चालना देणारा ठरला. त्यानंतरही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांमध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे शोधनिबंध हत्तींची नव्याने ओळख करून देत राहिले. संशोधन हे कागदोपत्री न ठेवता हत्तींच्या दहशतीत असलेल्या अनेक गावांत जाऊन नागरिकांशी संवाद साधून त्यांनी हत्ती व मानव संघर्ष कमी करण्यावर भर दिला. वन्यजीव संघर्षांबाबत माणूस किंवा प्राणी यांपैकी एकाला टोकाची सहानुभूती न देता सारासार विचार रुजवणे हे देसाई यांचे वैशिष्टय़. कोईम्बतूर, मदुराई यांसह श्रीलंकेतील मानव-हत्ती संघर्ष आटोक्यात आणण्यात देसाई यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.

‘प्राण्यांना हुसकावून लावणे किंवा माणसांना स्थलांतरित करणे यापेक्षा माणूस आणि हत्ती यांनी एकमेकांना स्वीकारून राहणे हाच हा संघर्ष टाळण्याचा पर्याय आहे,’ ही भूमिका त्यांनी सातत्याने ठामपणे मांडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2020 12:01 am

Web Title: ajay desai profile abn 97
Next Stories
1 मेजर जनरल आर. एन. छिब्बर (निवृत्त)
2 मृदुला सिन्हा
3 आलोकरंजन दासगुप्ता
Just Now!
X