युद्धस्य कथा रम्य: असे म्हटले जाते, पण ज्यांच्या वाटय़ाला प्रत्यक्ष युद्धाचे कटू अनुभव येतात, त्यांच्यासाठी या कथा नक्कीच डोळ्यांत पाणी आणणाऱ्या असतात, अशाच निम्न आत्मचरित्रात्मक युद्धकहाणीने जपानमध्ये अनेकांना सुन्न केले होते. त्याचे लेखक व कादंबरीकार अकियुकी नोसाका यांच्या निधनाने बहुमुखी प्रतिभेचा लेखक काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या त्या गाजलेल्या पुस्तकाचे नाव होतारू नो हाका (ग्रेव्ह ऑफ द फ्लाईज).
नोसाका यांचा जन्म कामाकुरा शहरातला. त्यांचे बालपण फार कठीण परिस्थितीत गेले. त्यांच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी आई निवर्तली. त्यांना ज्यांनी दत्तक घेतले होते त्या वडिलांचाही दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस कोबे येथे हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. ही दुर्दैवी साखळी येथेच थांबली नाही तर त्यांची बहीण आजारपणात मृत्युमुखी पडली. ही सारी वेदना त्यांच्या ‘ग्रेव्ह ऑफ द फायरफ्लाईज’ या आत्मचरित्रवजा कादंबरीत प्रकट झाली आहे. १९६७ मध्ये त्यांच्या अमेरिका हिजिकी व होतारू नो हाका या पुस्तकांना नोआकी पुरस्कार मिळाला. औपचारिक शिक्षण झाले नसले तरी त्यांची प्रतिभा बहुमुखी होती, त्यांनी राजकारण, किकबॉक्सिंग या क्षेत्रात सुरुवातीला स्वत:ला अजमावले. ते लेखक म्हणून प्रसिद्ध असले तरी चांगले गायक व अभिनेतेही होते. फ्रेंच साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता. अमेरिकन हिजिकी या दुसऱ्या पुस्तकात त्यांनी जपानचा दुसऱ्या महायुद्धातील पराभव ते आजची जपान-अमेरिका मैत्री या युद्धोत्तर काळातील मानसिक आंदोलनांचा आलेख एका व्यक्तिरेखेतून साकारला आहे. एरोगोटोशिटाची (द पोर्नोग्राफर्स) ही त्यांची पहिली कादंबरी. १९८३ मध्ये ते जपानमधील संसद म्हणजे डाएटच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणून निवडूनही आले होते, पण त्यांनी राजीनामा दिला. नंतर पुन्हा माजी पंतप्रधान काकुइ तनाका यांच्या धनशक्तीविरोधात दंड थोपटले, पण कनिष्ठ सभागृहाच्या सदस्य निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांनी हास्यकथा, दूरचित्रवाणी कार्यक्रमाच्या पटकथा लिहिल्या, अनेक वर्तमानपत्रे व मासिकांचे ते स्तंभलेखक होते. त्यांच्या ओमोचा नो चा. चा. चा या गीताला जपान रेकॉर्ड पुरस्कार मिळाला होता. गायक म्हणून त्यांची मरलिन मन्रो नो रिटर्न व कुरो नो फुनोटा ही गीते विशेष गाजली. गीतकार रोकुसुके व अभिनेता शोइची ओझावा यांच्याबरोबर त्यांनी गाण्याच्या मैफली केल्या होत्या.