23 March 2019

News Flash

अ‍ॅलन बीन

चंद्रावर जाण्यापूर्वी सव्‍‌र्हेयर यान तेथे पाठवण्यात आले होते त्या यानाचे काय झाले हेही त्यांनी पाहिले.

‘मी चित्रे काढणारा चांद्रवीर होतो असे म्हटले, तर तो माझ्यावर अन्याय आहे, त्यापेक्षा तुम्ही मला एके काळी चंद्रावर जाऊन आलेला चित्रकार म्हणा,’ असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, किंबहुना नौदलातून ते नासात गेले त्या वेळीच त्यांना चित्रकलेचा छंद होता, तेव्हापासून ते चित्रे काढत होते. एक मनस्वी कलावंत व चांद्रवीर अशी फार वेगळी गुंफण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती, ती व्यक्ती म्हणजे चंद्रावर पाऊल ठेवणारे अमेरिकेचे चौथे चांद्रवीर अ‍ॅलन बीन. नुकतेच त्यांचे निधन झाले. ते दोनदा मिळून ७ तास ४५ मिनिटे चंद्रावर चालले. तेथे त्यांनी चंद्राच्या भूगर्भशास्त्राच्या अभ्यासासाठी काही उपकरणे लावली, पुढील मोहिमांना ऊर्जा मिळावी यासाठी एक अणुभट्टी बसवली, चंद्रावरचे खडक गोळा केले. ते चंद्रावर जाण्यापूर्वी सव्‍‌र्हेयर यान तेथे पाठवण्यात आले होते त्या यानाचे काय झाले हेही त्यांनी पाहिले.

चंद्र म्हटला की लोकांच्या रोमँटिक भावना वगैरे उचंबळून येतात, पण मी चंद्रावर गेलो होतो, काळ्या धुळीशिवाय तेथे काही नाही असे दिसले, पण माझ्यासाठी मात्र ती नक्कीच मौल्यवान होती, असे सांगून या चांद्रवीराने प्रेमवीरांचा काहीसा विरसही केला होता, तरी त्यांच्या चित्रांमध्ये त्यांनी चंद्रावरील ती धूळ, तेथील बुटांचे ठसे हे सगळे दाखवले होते. अपोलो बारा मोहिमेत ते होते, ते चंद्रावरचे दुसरे अवतरण. त्यानंतरच्या काळात नासाच्या स्कायलॅबमध्ये सामान पाठवण्यासाठी जे यान गेले होते त्यात ते होते. त्या वेळी त्यांनी ५९ दिवस पृथ्वीप्रदक्षिणा केली व २४.४ दशलक्ष मैलांचे अंतर कापले. त्या वेळचा तो जागतिक विक्रम. अवकाशात ६९ दिवस व चंद्रावर ३१ तास अशी त्यांची कारकीर्द. चंद्रावर ज्या बारा लोकांनी पाऊल ठेवले, त्यातील ते एक. चंद्रावरील ओशन ऑफ स्टॉम्र्स या भागात त्यांनी पहिला चांद्रवीर नील आर्मस्ट्राँगनंतर चारच महिन्यांनी पाऊल ठेवले. त्या वेळी चंद्रावर जात असताना तीन दिवसांच्या प्रवासात यानाच्या उड्डाणानंतर वीज कोसळली होती, त्यामुळे जोखमीतून त्यातील सगळेच वाचले होते. चंद्रावर जाण्याच्या आधीचे दिवस रोमांचक होते. प्रत्येक दिवस ख्रिसमससारखा आनंदी वाटत होता.

बिन यांचा जन्म टेक्सासमधील व्हीलर येथे १९३२ मध्ये झाला. त्यांना वैमानिक व्हायचे होते. तो शूर व साहसी व्यक्तींचा प्रांत आहे असे वाटत असल्याने त्यांना ते आकर्षण होते, नंतर ते वैमानिक तर झालेच, पण नौदलातील नोकरीनंतर नासात असताना त्यांनी अनेक अवकाशवीरांना प्रशिक्षण दिले. स्टार ट्रेक मालिकेत निशेली निकोल्सबरोबर भूमिकाही साकारली होती. नासातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी चित्रकार व्हायचे ठरवले, त्याबाबत त्यांनी असे म्हटले होते की, प्रत्येकाने आपली स्वप्ने जगावीत, आपल्याला जे भावते ते करावे, माणूस एकाच वेळी आयुष्यात दोन गोष्टी नक्की करू शकतो. जे आवडते त्यासाठी त्यांनी झोकून दिले. त्यांच्या रूपाने एक कलंदर चांद्रवीर व कलाकार गमावला आहे.

()(   अ‍ॅलन बीन ))

First Published on May 29, 2018 1:51 am

Web Title: alan bean american naval officer