निव्वळ सिद्धान्तांवर आधारित ज्ञानापेक्षा अनुभवाधिष्ठित व माहितीआधारित साधनांच्या आधारेच आर्थिक धोरणे बनवली जावीत, असा आग्रह धरणारी अर्थतज्ज्ञांची एक नवीन पिढी गत सहस्रकाअंती अमेरिकेत उदयाला आली. या पिढीतील एक महत्त्वाचे अर्थतज्ज्ञ होते अ‍ॅलन क्रूगर. बिल क्लिंटन आणि बराक ओबामा यांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले.

प्रस्थापित सिद्धान्तांवर अवलंबून राहून एखाद्या अर्थव्यवस्थेचे, समाजव्यवस्थेचे विश्लेषण करण्यापेक्षा प्रत्यक्ष ‘प्रयोगभूमी’वर उतरून माहिती गोळा करून त्या आधारावर निष्कर्ष बनवण्याला क्रूगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राधान्य दिले. या संदर्भात त्यांची ओळख जगाला झाली, ती त्यांनीच पुढाकार घेऊन राबवलेल्या एका क्रांतिकारी प्रकल्पानंतर. न्यू जर्सीत किमान वेतनामध्ये वाढ झाल्याचा परिणाम नोकऱ्यांवर कितपत झाला याचा अभ्यास क्रूगर आणि त्यांचे सहकारी डेव्हिड कार्ड यांनी केला. सहसा असे काही किमान वेतन निश्चित केले की अशा ठिकाणी नोकरकपात होते, अशी पारंपरिक अर्थतज्ज्ञांची ठाम समजूत. या समजाच्या मुळाशी आहे, मागणी व पुरवठय़ासंबंधीचा एक सिद्धान्त, ज्यान्वये एखाद्या वस्तूची किमान किंमत निश्चित केल्यास तिची टंचाई निर्माण होते. परंतु न्यू जर्सीमध्ये असे काहीच झाले नव्हते. या प्रयोगाने आर्थिक विश्वात खळबळ उडाली. निव्वळ सिद्धान्तांवर अवलंबून न राहता, वैज्ञानिकांप्रमाणे नमुने गोळा करून जुने सिद्धान्तही पारखून पाहण्याची सवय अ‍ॅलन क्रूगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना होती. किमान वेतनावरील त्यांचे निष्कर्ष अधिक व्यापक पाहण्यांमध्येही उपयोगी ठरू लागले. शिक्षण, आरोग्य, कामगार अशा अनेक क्षेत्रांमध्ये अनुभवाधिष्ठित (इम्पिरिकल) संशोधनांमुळे प्रस्थापित सिद्धान्त ढासळू लागले. कामगार या विषयवस्तूबद्दल त्यांना खास ममत्व होते. यासाठी कोणतीही तात्त्विक बैठक प्रमाण न मानता, निव्वळ आकडेवारी जमवण्यावर त्यांनी भर दिला. त्यातून आणखी एका प्रयोगाचा जन्म झाला. अमेरिकेतील बडय़ा फास्टफूड कंपन्यांमध्ये परस्परांचे कर्मचारी पळवायचे किंवा स्वीकारायचे नाहीत, असे करार झाले होते. पण त्यामुळे किमान वेतन खालच्या स्तरावर ठेवण्यात आणि ते दीर्घकाळ न वाढवण्यात या कंपन्या यशस्वी ठरल्या. क्रूगर यांचे संशोधन प्रसिद्ध झाल्यानंतर अमेरिकी सरकारला या अलिखित गळचेपीविरोधात पावले उचलावी लागली. अनेक कामगारहितैषी धोरणे राबवताना क्लिंटन आणि ओबामा यांना क्रूगर यांच्या संशोधनाची मदत झाली. या अर्थतज्ज्ञाचा ५८व्या वर्षी झालेला अकाली मृत्यू त्यामुळेच व्यापक हळहळ निर्माण करून गेला.