इंग्लंडने साऱ्या जगाला क्रिकेट शिकवले, त्यामुळे हा खेळ नेमका कसा आहे, याचे ज्ञान त्यांना नक्कीच आहे. एकीकडे फक्त जय-पराजय यांच्यावरून खेळ आणि खेळाडूंची चाचणी करणारे देश आहेतच, पण इंग्लंड त्या पंक्तीत नाही. त्यांना खेळाचा आनंद सर्वात महत्त्वाचा. अ‍ॅलिस्टर कुकने सर्वाधिक आनंद आपल्या नेतृत्वाच्या कारकीर्दीत इंग्लंडच्या चाहत्यांना दिला. सोमवारी अचानक कुकने कसोटी कर्णधारपदाचा त्याग केला आणि बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या.

कुकने खरेच कर्णधारपद सोडण्याची आवश्यकता होती का? हा सर्वासमोर मोठा प्रश्न आहे. भारतातील कसोटी मालिकेत कुकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला एकही सामना जिंकता आला नाही. हे कुकने कर्णधारपद सोडल्याचे निमित्त मात्र ठरले असावे. इंग्लंडला असे पराभव नवीन नाहीत. यापेक्षाही मानहानिकारक पराभव त्यांनी पचवले आहेत. त्यामुळे या पराभवानंतर कुकला कर्णधारपद सोडण्याचे त्यांच्या क्रिकेट मंडळाने सुचवलेले नसावे. कुकचा हा वैयक्तिक निर्णय असावा. तोही त्याने आपल्या मैदानातील देहबोलीनुसार शांतपणेच घेतला. एक कर्णधार म्हणून इंग्लंडचे नेतृत्व करताना कुक कधीही आक्रमक, हताश, अतिउत्साही दिसला नाही. त्याच्या नेतृत्वकौशल्यालाही एक वेगळी झालर होती. काही खेळाडूंसाठी तो अडून बसायचा आणि त्याचे परिणाम मैदानात दिसायचे. इंग्लंडचे नेतृत्व सांभाळल्यावर त्याने देशाला दोन वेळा मानाचा अ‍ॅशेस चषक जिंकवून दिला. दक्षिण आफ्रिकेतही मालिका जिंकली. इंग्लंडमध्ये २०११ साली भारताचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर मायदेशात त्यांना बघून घेऊ, अशी वल्गना काही भारतीय क्रिकेटपटूंनी केली होती. भारताच्या २०१२च्या दौऱ्यात इंग्लंडला काहीही करून पराभूत करण्याची रणनीती आखली गेली; पण कुक काही बोलण्यापेक्षा रणनीती आखण्यात व्यस्त होता. केव्हिन पीटरसन आणि माँटी पनेसार या दोन खेळाडूंसाठी तो भांडला आणि त्यांना संघात स्थान मिळवून दिले. या दोन्ही खेळाडूंनी इंग्लंडच्या विजयाचा विजयलेख लिहिला.

कुक मैदानात नेहमी शांत दिसला. त्याचे खटके कुणाशी उडाले नाहीत किंवा कुणाला त्याने दमात घेतले वगैरे अजिबात नाही. त्याचा तो पिंडच नव्हता. गोलंदाजाने जास्त धावा दिल्या किंवा फलंदाज जास्त धावा करू शकले नाहीत किंवा मैदानात खेळाडूने मोठी चूक केली तर त्याच्यावर कधीही कुकने आरडाओरड केली नाही. गेल्या काही वर्षांमध्ये इंग्लंडच्या फलंदाजीचा भारही त्याच्याच खांद्यावर होता. इंग्लंडकडून सर्वाधिक शतके झळकावण्याचा आणि जास्त धावा करण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर. कर्णधारपद भूषवताना वैयक्तिक कामगिरीवर विपरीत परिणाम होतो, असे म्हणतात, पण कुक त्यासाठी अपवाद ठरला. उलटपक्षी त्याची कामगिरी अन्य खेळाडूंसाठी प्रेरणादायी होती.

एक आदर्शवत कर्णधार कसा असावा, हे कुककडे पाहिल्यावर चाहत्यांना वाटायचे. पण यापुढे तो संघाचे नेतृत्व करताना दिसणार नाही, याची खंतही त्यांना असेल. त्यामधील काहीशी समाधानाची बाब एवढीच की कुक यापुढेही खेळत राहणार आहे. क्रिकेटमधून त्याने निवृत्ती पत्करलेली नाही. कुक कर्णधार नसला तरी यापुढे तो संघाच्या रणनीतीचा एक भाग असेल आणि आगामी कर्णधाराला व संघाला मदत करताना कुक आखडता हात घेणार नाही. आता कर्णधारपदाचे ओझे नसताना कुकची फलंदाजी किती बहरते, हे पाहणे साऱ्यांसाठी उत्सुकतेचे असेल.