‘अ‍ॅस्टरिक्स’ आणि ‘ओबेलिक्स’ ही जोडी इंग्रजी नियतकालिकांतील कॉमिक स्ट्रिपमध्ये आता-आतापर्यंत दिसे. टोपीवर पंख असलेला अ‍ॅस्टरिक्स आणि फुटबॉलसारखा ढेरपोटय़ा ओबेलिक्स यांच्या करामती आणि किस्से हे मुळात फ्रेंच भाषेत अवतरले, पण इंग्रजीतून सर्वदूर पोहोचले. या दोघांना अजरामर रूप देणारे रेखाचित्रकार अल्बर्ट उद्रेझो नुकतेच निवर्तले. वयाच्या ९२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने २४ मार्चला त्यांना गाठले. उद्रेझो हे चित्रकार, तर रेने ग्रॉसीनी हे लेखक या दोघा तरुणांनी साधारण वयाच्या पस्तिशीत असताना ‘अ‍ॅस्टरिक्स आणि ओबेलिक्स’ या जोडीला जन्म दिला. सन होते १९६१, म्हणजे चार्ल्स द गॉल यांची राजवट आणखी नऊ वर्षे राहणार होती!अ‍ॅस्टरिक्स हादेखील ‘अ‍ॅस्टरिक्स द गॉल’! पण स्पेलिंग निराळे, कधी काळी गॉल जमातीचे लोक युरोपात राहात आणि त्यांनी म्हणे कुठल्याशा शक्तीमुळे आपल्या गावावरील ज्यूलियस सीझरचे आक्रमण थोपवले होते. त्या ‘गॉल’पैकी हा अ‍ॅस्टरिक्स. या व्यक्तिरेखेचे अनेक संदर्भ हे समकालीन राजकारणाशी, समाजकारणाशी जुळत. सूचक कोटय़ा करीत जळजळीत राजकीय उपरोध वाचकांपर्यंत पोहोचवणे, हे फ्रेंच विनोदाचे वैशिष्टय़. ते अ‍ॅस्टरिक्सच्या या दोघा कर्त्यांमध्येही होते. उद्रेझो कुटुंबीय मूळचे इटालियन. अल्बर्ट यांचा जन्म इटलीतला, पण अगदी बालपणी आई-वडील पॅरिसजवळ स्थायिक झाले. त्यामुळे अल्बर्ट यांचे शिक्षण फ्रान्समध्येच, फ्रेंच भाषेतच झाले. मुलांच्या मासिकासाठी काम करताना त्यांना रेने ग्रॉसीनी भेटले आणि पाच वर्षांत ‘अ‍ॅस्टरिक्स’ची कल्पना साकार झाली. अ‍ॅस्टरिक्स कॉमिक्सचे पहिले संकलित बाड निघेपर्यंत १९६९ साल उजाडले, पण पुढल्या अवघ्या १८ वर्षांत तब्बल २५ बाडे तयार झाली.. इतकी या चित्रकथेची मागणी आणि तितकीच या दोघांची प्रतिभा! मात्र उद्रेझो- ग्रॉसिनी यांचे हे सहकार्य १९७७ मध्ये, ग्रॉसिनी यांच्या मृत्यूमुळे संपुष्टात आले. त्याहीनंतर एकहाती, २००९ सालापर्यंत उद्रेझो यांनी ही चित्रकथा चालविली. शाब्दिक कोटय़ांऐवजी दृश्यावर भर दिला जाऊ लागला, तो याच काळात. अ‍ॅस्टरिक्स, ओबेलिक्स, तसेच ‘डॉग्मॅटिक्स’ हा त्यांचा कुत्रा या तिघांचेही भावदर्शन उद्रेझो असे काही घडवीत की, शब्द नसले तरी चालत. त्यांच्या प्रत्येक पुस्तकाला दशलक्षांहून अधिक प्रती खपण्याचा मान तर मिळालाच, पण फ्रान्सचा ‘लीजन ऑफ ऑनर’, नेदरलँड्सचा सर्वोच्च किताब, अनुवादित साहित्यातून विश्वसंवाद घडवून आणल्याबद्दल युनेस्कोचा पुरस्कार असे महत्त्वाचे सन्मान त्यांना लाभले. कॉमिक चित्रपट्टीतली पात्रे स्वच्छ, नितळ आणि म्हणून छानच दिसणारी हवी, हा अमेरिकी वा जपानी शिरस्ता मोडणाऱ्या उद्रेझोंची आठवण कॉमिक-दर्दीमध्ये नेहमीच राहील.