जगप्रसिद्ध लेखक खलील जिब्रान याचे चरित्र लिहिणाऱ्या आणि त्यासाठी पुरस्कार मिळवलेल्या अलेक्सांद्रे नज्जर याची ओळख भारतीयांना नसेल. पण त्याच्या काहीशा विरोधाभासी पार्श्वभूमीच्या वैशिष्टय़ांसाठी तो नक्कीच लक्षात राहण्यासारखा आहे. नुकत्याच मिळालेल्या फ्रेंच अकादमीच्या प्रतिष्ठित पुरस्कारामुळे तो प्रकाशझोतात आला.
नज्जर हा फ्रेंच लेखक, पण तो फ्रान्सचा नागरिक नसून पश्चिम आशियातील लेबनॉन या अशांत देशाचा रहिवासी आहे. उत्तर व पूर्वेला सीरिया; तर दक्षिणेला इस्रायल हे देश शेजारी असलेला लेबनॉन हा संघर्षग्रस्त देश म्हणूनच ओळखला जातो. सतत बॉम्बस्फोट आणि गोळीबाराचे वातावरण असलेल्या या देशात अलेक्सांद्रे हा फ्रेंचसारख्या नजाकतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भाषेत लेखन करतो, हा एक ठळक विरोधाभास! खरे तर आपल्याला लिहिता येते (..आणि त्यासाठी वेळोवेळी पुरस्कार मिळतात म्हणजे चांगले लिहिता येते) अशी स्वत:ची खात्री झाल्यानंतर नज्जरने फ्रान्समध्ये स्थायिक होऊन साहित्यसेवा केली असती, तर तेथे त्याला मानाचे स्थान नक्कीच मिळाले असते. मात्र कदाचित मातृभूमीचे प्रेम भाषाप्रेमापेक्षा वरचढ ठरले आणि तो लेबनॉनमध्येच राहिला.
प्रशिक्षित वकील असलेला नज्जर हा लेबनीज कादंबरीकार आणि साहित्यिक समीक्षक आहे. मात्र त्याची व्यावसायिक पार्श्वभूमी पाहिली, तर दुसरा विरोधाभास लक्षात येईल. बैरुतमध्ये जन्मलेला हा युवक शिक्षणासाठी पॅरिस विद्यापीठात गेला. त्याने ‘व्यवसाय प्रशासन’ या विषयात डॉक्टरेट मिळवली, तो बँकिंग आणि वित्तीय कायद्यांमध्ये तज्ज्ञ मानला जातो. अशा रुक्ष विषयांमध्ये शिक्षण घेतलेला नज्जर साहित्याच्या प्रांतात सहजी आणि दर्जेदार मुशाफिरी करतो. कादंबऱ्या, कवितासंग्रह व आत्मचरित्रे मिळून त्याने तीसहून अधिक पुस्तके लिहिली असून त्यांची १२ भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. कविता आणि काल्पनिक कथांव्यतिरिक्त तीन नाटकांचे लेखनही त्याच्या खात्यावर आहे.
नज्जरच्या उल्लेखनीय रचनांमध्ये, ‘दि बैरुत नॉव्हेल’, ‘डिक्शनरी लव्हर ऑफ लेबनॉन’ आणि ‘द प्रॉफेट’चा लेखक खलील जिब्रानचे चरित्र यांचा समावेश आहे. २०१८ साली, दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली ‘हॅरी अँड फ्रांझ’ ही त्याची कादंबरी ‘इंत्राली प्राईझ’ या फ्रेंच साहित्याच्या प्रतिष्ठित पुरस्काराच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. साहित्यिक कामगिरीसाठी गेल्या ऑक्टोबरात त्याला ‘गोल्ड मेडल ऑफ दि फ्रेंच रेनेसाँ’ मिळाले होते. ‘फेनिशिया’ या पुस्तकाने त्याला फ्रेंच अकादमीच्या सन्मानासह अनेक लेबनीज व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिले. या सगळ्यांवर कळस ठरावा असा प्रतिष्ठित ‘फ्रँकोफोन ग्रँड अॅवॉर्ड’ त्याने नुकताच मिळवला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 19, 2021 12:01 am