सनई म्हणजेच शहनाई हे भारतीय संस्कृतीत मंगलवाद्य म्हणून सर्वमान्य झाले, मात्र त्याला अभिजात संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळण्यासाठी अनेक कलावंतांना आपली सारी प्रतिभा एकवटावी लागली. उस्ताद बिस्मिल्ला खाँ हे या सगळय़ा प्रयत्नांचे अग्रदूत. त्यांनी या वाद्याला जे अलौकिकत्व प्राप्त करून दिले, त्यामुळे या वाद्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलून गेली. बिस्मिल्ला खाँ यांच्यानंतरही सनईला आपल्या सर्जनाने रसिकांसमोर आणून त्याची लोकप्रियता टिकवण्याचे अवघड कार्य करणाऱ्या मोजक्या कलावंतांमध्ये अली अहमद हुसेन खाँ यांचे नाव अपरिहार्यपणे घ्यायला हवे.
सनई हे वाद्य मूळच्या पुंगीचे विकसित रूप. बासरी या भारतीय संस्कृतीतील आद्य वायुवाद्यातून निर्माण झालेली ही परंपरा नंतरच्या काळात विज्ञानाच्या मदतीने अधिक परिष्कृत झाली. अली अहमद हुसेन खाँ यांनी या वाद्याला जी झळाळी प्राप्त करून दिली, त्यामुळे ते आजही लोकप्रियतेच्या शिखरावर राहिले आहे. त्यांचे आजोबा वझीर अली खाँ यांनी बकिंगहॅम येथील राजप्रासादात पहिल्यांदा सनईचे वादन केले. वडील अली जान खाँ, काका नझीर हुसेन खाँ आणि इमद हुसेन खाँ हे बनारसमधील प्रख्यात सनईवादक. संगीताची एवढी संपन्न पाश्र्वभूमी असताना अली अहमद हुसेन खाँ यांनी त्याच पायवाटेवरून जाणे अगदी स्वाभाविक होते.
पंडित रविशंकर यांच्या साहाय्याने भारतीय दूरदर्शनची ‘सिग्नेचर टय़ून’ तयार करणाऱ्या खाँसाहेबांना घराघरांत सलाम मिळाला, मात्र त्यांचे नाव कुणालाच कळले नाही. परंतु आकाशवाणीवरील त्यांच्या सततच्या सनईवादनाने ते देशभर परिचित झाले. उस्ताद विलायत खाँ, पंडित मणिलाल नाग, व्ही. जी. जोग यांच्याबरोबर त्यांनी सादर केलेल्या जुगलबंदीलाही रसिकांनी भरभरून दाद दिली. कोलकात्यातील संगीत रिसर्च अ‍ॅकॅडमीत त्यांनी दीर्घकाळ अध्यापनकार्य केले. कार्यक्रमांसाठी भारतभर आणि विदेशांतही दौरे केले. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, तानसेन समारोहामध्ये सुवर्णपदक, विश्व बंग संमेलन पुरस्कार, श्रुतिनंदन पुरस्कार, यांसारखे सन्मान त्यांच्या सुरेल वादनात अधिक रंग भरणारे ठरले.
सनई या वाद्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे फुंक. भल्याभल्यांना ती सहजी जमत नाही आणि त्यामुळे वाद्य मध्येच बेसुरे होते. अली अहमद हुसेन खाँ यांचे सनईवादनाचे जे अनेक अल्बम प्रकाशित झाले आहेत, ते ऐकल्यावर ही फुंक किती महत्त्वाची असते, हे सहजपणे कळून येते. कलावंत म्हणून सतत प्रकाशझोतात राहता आले नाही, तरी खाँसाहेबांचे सांगीतिक योगदान त्यामुळे अजिबात कमी होत नाही. त्यांच्या निधनाने शहनाईच्या विश्वातील अतिशय मोलाचा आणि हळवा कलावंत आपल्यातून निघून गेला आहे.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Distribution of Akshata on the eve of Prime Minister Narendra Modis meeting in Wardha
पंतप्रधान मोदींच्या वर्धेतील सभेच्या पूर्वसंध्येला ‘अक्षता’ वाटप; आधी सभास्थळी झाले होते कलश पूजन
Loksatta sanvidhan bhan Constitution Fundamental rights equal protection
संविधानभान: जनमते मानुस होत सब..
madhya pradesh high court marathi news, live in relationship marathi news
लिव्ह-इन हे कायद्याने शक्य आहे म्हणजे व्यवहार्य आहेच असे नाही… मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे निरीक्षण