गणित व विज्ञान यांचे नाते खूप जवळचे असते. गणिताला घाबरून तो विषय सोडणारे अनेक असतात, पण नंतर त्यांचे अनेक पर्याय कमी होतात. गणिताची गोडी मुळात शिक्षकांच्या अध्यापन कौशल्याशीही निगडित असते. गणित हा कठीण विषय मानला जात असला तरी त्यात मोठे काम करणाऱ्या भारतीयांचा वारसा मोठा आहे. अलीकडेच मुंबईच्या टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रीसर्चचे डॉ. अमलेंदु कृष्णा यांना भारतातील नोबेल समजला जाणारा ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार’ जाहीर झाला आहे. डॉ. कृष्णा यांचे मूळ काम ‘अल्जिब्रिक-के’ सिद्धांतावर आधारित आहे. २०१५ मध्ये त्यांना खास गणित क्षेत्रासाठीच्या ‘रामानुजन’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. वयाच्या पंचेचाळिशीच्या आतील जे मोजके चांगले गणितज्ञ भारतात आहेत त्यात डॉ. कृष्णा यांचा समावेश होतो. त्यांनी ‘सायकल्स अ‍ॅण्ड मोटिव्हज’ या बीजगणितीय शाखेत काम केले असून एवढा अवघड विषय असूनही सर्वाचे लक्ष त्याकडे वेधले आहे. गणिती कुटिल प्रश्न सोडवणे हा त्यांचा छंदच आहे. अनेकदा गणिती कूटप्रश्न सुटता सुटत नाहीत, त्यामुळे आपले पाय जमिनीवर राहतात, असे त्यांचे म्हणणे! गणितातील काही मूलभूत संकल्पना मांडून त्यांनी त्यात संशोधन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वप्रेरणेने ते विज्ञानाकडे वळले. हे फार थोडय़ा लोकांना जमते. बिहारसारख्या राज्यात कुणी मार्गदर्शन करणारे नसताना त्यांनी ही उंची गाठली. ते मूळचे बिहारचे, त्यांचे शाळा व महाविद्यालयीन शिक्षणही तेथेच झाले. मध्यमवर्गीय कुटुंबातील अडचणींवर मात करून त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. आपल्या गणितातील कामगिरीमुळे घरच्या लोकांनाही खूप अभिमान वाटतो, असे ते आवर्जून सांगतात. आयआयटी कानपूरमधून ते अभियांत्रिकी शाखेबाबत भ्रमनिरास झाल्याने बाहेर पडले. नंतर त्यांना सनदी अधिकारी व्हायचे होते, पण तोही पर्याय त्यांनी सोडून दिला. २००१ मध्ये ते टाटा मूलभूत संशोधन संस्थेत दाखल झाले व पीएच.डी. केली, त्यातच त्यांना गणिताची आवड लागली. गणित विषय ज्यांना कळतो त्यांना तो रंजक व खिळवून ठेवणारा, तसेच आव्हानात्मकही वाटतो. वासुदेवन श्रीनिवास यांच्या अनुभवातून कृष्णा यांनी प्रेरणा घेतली. त्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठात शिक्षण घेऊन ते परत मायदेशी आले.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amalendu krishna
First published on: 30-09-2016 at 03:41 IST