‘गौर बब्बा’ ऊर्फ डॉ. हरिसिंग गौर यांनी १९४६ मध्ये स्थापलेल्या सागर विद्यापीठातील पहिल्या काही प्राध्यापकांपैकी एक म्हणून अमरेश दत्तांची नियुक्ती झाली, तेव्हा ते होते २८ वर्षांचे. इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. ‘कवी आणि अभ्यासक’ ही त्यांची ओळख तेव्हापासून कायम राहिली. शेक्सपिअरविषयीची त्यांची विद्वत्ता जगन्मान्य ठरली आणि विद्यार्थ्यांमधील त्यांची लोकप्रियता कैक पिढय़ांना व्यापून उरली. या अमरेश दत्ता यांचे निधन गुरुवारी सकाळी, वयाच्या १०२ व्या वर्षी झाले.

सागर विद्यापीठ ते गुवाहाटी विद्यापीठ आणि पुढे दिब्रुगड विद्यापीठ असा त्यांचा प्रवास प्राध्यापक म्हणून झाला.  त्यांच्या शिक्षणाविषयी- विशेषत:, ते इंग्रजी साहित्याचे उच्चशिक्षण घेण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात ऑक्सफर्ड वा केम्ब्रिजला गेले होते का, याविषयी- माहिती उपलब्ध नाही. मात्र तरुणपणीदेखील ते शेक्सपिअरचे उत्तम अभ्यासक म्हणून ओळखले जात, आणि ऑक्सफर्डमधील विद्यार्थी व प्राध्यापक ज्याप्रमाणे नदीकाठी सहलीस जात, तशा सहली काढण्याची आवड त्यांना होती (अशी आठवण, याच विभागातून पुढे राजस्थान विद्यापीठात गेलेल्या अमेरिकी प्राध्यापिका फ्रान्सिन एलिसन कृष्णा यांनी नोंदवली आहे). याच सागर विद्यापीठात असताना प्रा. दत्ता यांचा ‘कॅप्टिव्ह मोमेंट्स’ हा इंग्रजी काव्यसंग्रह (१९५२) प्रकाशित झाला, त्यासाठी त्यांना रोम येथील ‘इंटरनॅशनल असोसिएशन फॉर पोएट्री’चे पारितोषिकही मिळाले. त्यांनी लिहिलेले ‘शेक्सपिअर्स ट्रॅजिक व्हिजन अ‍ॅण्ड आर्ट’ हे पुस्तक (१९६३) दिल्लीतील ‘किताब महल’ने प्रकाशित केले आणि अटलांटिक सागराच्या दोन्ही किनाऱ्यांवरील विद्वानांनी या पुस्तकाची चिकित्सक प्रशंसा केली. दु:खातून सत्य शोधणारा कलावंत, असे शेक्सपिअरचे रूप दाखवणारे प्रा. दत्ता ‘अभ्यासक आणि कवी’ आहेत, हे या पुस्तकाने पुन्हा सिद्ध केले. टाइम्स हार्वेस्ट हे भारतीय महाकाव्यांतील मिथकांवर आधारित कवितांचे पुस्तक तसेच ‘लोटस अ‍ॅण्ड द क्रॉस’ हा तिसरा काव्यसंग्रह त्यांच्या नावावर आहे.

मात्र भारतात ते ज्यासाठी लक्षात राहतील, असे काम आणखी निराळे. ‘साहित्य अकादमी’साठी सहा खंडांचा आणि २० भाषांचा वेध घेणारा ‘एन्सायक्लोपीडिया ऑफ इंडियन लिटरेचर’ हा ग्रंथप्रकल्प त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या खंडांवर आतापर्यंत ‘प्रमुख संपादक’ म्हणून प्रा. अमरेश दत्ता यांचेच नाव होते (आता नवी आवृत्ती, नव्या संपादनाखाली निघेल असे सांगण्यात येते).

वयाच्या पन्नाशीनंतर आसामला परतलेल्या प्रा. दत्तांना गुवाहाटी विद्यापीठाने ‘सुप्रतिष्ठ प्राध्यापक’ पद बहाल केले. दिब्रुगड विद्यापीठातही ते महनीय मार्गदर्शक म्हणून काम करीत. दीर्घायुष्य लाभलेले, देशाने स्वातंत्र्योत्तर काळात शैक्षणिक व साहित्य क्षेत्रांत साधलेली प्रगती केवळ अनुभवलेलेच नव्हे तर तिचा भाग असलेले प्रा. दत्ता आसामातील ‘हांडिक पुरस्कारा’चे मानकरी होते. त्यांचा अंत्यविधी सरकारी इतमामात करण्यात आला.