X

बर्ट रेनॉल्डस्

१९६०च्या दशकात बर्ट रेनॉल्डस् नावाच्या वादळाचा लौकिक इतका होता

हॉलीवूडमधील बर्ट रेनॉल्डस् या अभिनेत्याच्या कारकीर्दीचा आरंभ आपल्याकडच्या शाहरुख खान या नटाच्या सुरुवातीशी बराच मिळताजुळता आहे. या दोघांनीही आपापल्या देशांत टीव्ही मालिकांमधून बरीच वर्षे राष्ट्रीय पातळीवर प्रेक्षकांच्या मनामध्ये आपली प्रतिमा तयार केली. फक्त शाहरुख खान पुढे हिकमतीवर आणि एका काळातील दर्जेवजा सिनेमांना उचलून धरण्याच्या प्रेक्षकांच्या लाटेत ‘किंग ऑफ बॉलीवूड’ बनला, बर्ट रेनॉल्डस्ने हॉलीवूडचा किंग बनण्याच्या संधींना कायम नाकारले.

१९६०च्या दशकात बर्ट रेनॉल्डस् नावाच्या वादळाचा लौकिक इतका होता, की मालरेन ब्राण्डोचा वारसा हा अभिनेता चालविणार ही भाकिते उच्चरवात केली जाऊ लागली. ब्राण्डोसारखाच रांगडा तोंडवळा असल्याने त्याला रंगभूमीवर आणि पुढे टीव्ही मालिकांमध्ये सहज प्रवेश मिळाला. जेम्स बॉण्ड सिनेमांवर मुख्य भूमिकेत ब्रिटिश अभिनेताच काम करेल, ही अट लादली गेली नसती, तर बॉण्डचा अमेरिकी दावेदार बर्ट रेनॉल्डस्च असल्याचे दावे या अभिनेत्याच्या गाजत्या वर्षांत होत होते. कॉस्मोपॉलिटिन या प्रसिद्ध मासिकासाठी त्याने आपली द्विपानी दिगंबर छबी झळकावून सांस्कृतिक खळबळ उडवून दिली ते १९७२ साल त्याच्या कारकीर्दीतील सोनेरी पान म्हणून ओळखले जाते. ब्राण्डोने नाकारलेली भूमिका वाटय़ाला आलेला ‘डिलिव्हरन्स’ याच वर्षी प्रदर्शित झाला आणि नायकपद घेऊन दिग्दर्शकांचा ताफा त्याच्याकडे दाखल होऊ लागला. डिलिव्हरन्सइतकीच चर्चा त्याच्या अनावृत्त छायाचित्राची झाली.

डच, स्कॉटिश आणि आयरिश पूर्वजांचा वारसा असलेला बर्टन रेनॉल्डस् अमेरिकेतील मिशिगन शहरात पोलिसाच्या घरात वाढला. पिढीजात माज शरीरभर वावरत त्याचे तरुणपण फुटबॉलपटू बनण्याच्या स्वप्नात वाहत होते. एका मोठय़ा कार अपघातात हे स्वप्न भंगले आणि बर्टनच्या आयुष्याची गाडी अभिनयाच्या प्रांतात शिरली. नाटकांमधील भूमिकांनी टीव्ही मालिका दिल्या आणि टीव्हीतील अभिनयपुण्याई मोठय़ा पडद्यावर झळकवून देण्यास कारणीभूत ठरली. ‘लाँगेस्ट यरड’, ‘हुपर’ आणि तिकीटबारीवर डझनांहून हिट सिनेमे पोहोचवूनही रेनॉल्डस् जगभरातील हॉलीवूड प्रेक्षकांचा लाडका कधीच बनला नाही. आपल्या मस्तीत सिनेमांची निवड करण्याच्या त्याच्या छंदामुळे पुढे त्याने नाकारलेल्या अनेक भूमिका इतरांनी वठविल्या आणि त्यांना ऑस्कर पारितोषिके मिळाली. बर्ट रेनॉल्डस् मात्र पहिल्या फळीतल्या अभिनेत्यांच्या पंगतीत येण्याऐवजी आपटलेल्या सिनेमांमुळे पुन्हा छोटय़ा पडद्याच्या वाटेने निघून गेला. लग्न, लफडी आणि छोटय़ा-मोठय़ा पडद्यांदरम्यान लटकलेली अवस्था यांतून त्याच्या विक्षिप्त आयुष्याचीच लक्तरे निघू लागली. त्याला नव्वदीच्या दशकात त्याला आपली दिवाळखोरीही जाहीर करावी लागली. त्यातूनही फिनिक्स भरारी घेत त्याने पॉल थॉमस अ‍ॅण्डरसनच्या ‘बुगी नाइट्स’मध्ये पोर्नोग्राफरची भूमिका वठवत ऑस्करचे नामांकन मिळवले. क्वेन्टीन टेरेन्टीनोच्या आगामी चित्रपटात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मात्र ती पडद्यावर पाहण्याआधीच हा कलाकार अंतर्धान पावला आहे. त्याच्या मृत्यूने प्रसिद्धी आणि कुप्रसिद्धीचा त्याच्याबाबत न चुकणारा फेराही थांबला आहे.