हॉलीवूडनगरीत कुण्या एके काळी सुवर्णकाळ होता तेव्हाचे डोरिस डे या अभिनेत्री- गायिकेने पियानो-आसनात गायलेले ‘के सेरा सेरा’ आणि बॉलीवूडमधील कुण्या एके काळी ‘प्यार’ शब्दावरच्या मधुमेही चिपाडगाण्यांचा रतीब धबधब्याने ओतला जात असताना माधुरी दीक्षित-प्रभुदेवा यांच्या नर्तनझटक्यांनी ओसंडून वाहणारे ‘के सेरा सेरा, जो भी हो सो हो’ या गाण्यांची गमतीशीर तुलना होऊ शकते.

आपल्याकडच्या गाण्यातील ‘के सेरा सेरा’ या शब्दत्रयीला डोरिस डे यांच्याच गाण्याचा संदर्भ आहे. फरक इतकाच की, अल्लड, नवथर, अजाण नवयौवनाचे धुमारे व्यक्त करण्याच्या करामती बालिशपणे टिपेला पोहोचविण्याची एकही संधी आपल्याकडल्या गाण्याने शब्द-नृत्यातून सोडली नाही. आणखी साठ वर्षांनंतर आपल्याकडचे हिंदी ‘के सेरा सेरा’ जिवंत राहण्याची शक्यता शून्य. पण वयाचा ९७ वर्षांचा पल्ला गाठवलेल्या डोरिस डे यांच्या नुकत्याच झालेल्या निधनानंतर त्यांच्या ‘के सेरा सेरा’ या गाण्याची सर्व माध्यमांवरील आळवणी, ही ते इंग्रजी गीत कालहत न होऊ शकल्याची खूण होती. डोरिस डे यांच्या हॉलीवूडमधला सुवर्णकाळ म्हणजे पल्प मॅगझिनमधून कल्पक-गडद कथानकांनी ब्लॉकबस्टर सिनेमा बनण्याचा काळ. मेरिलिन मन्रोच्या अनावृत छायाचित्रांनी प्ले-बॉय नियतकालिकाचा पाया उभारला जाण्याचे अमेरिकी वातावरण आणि सिनेनट-नटय़ांची लफडी-कुलंगडी रवंथ करण्यास उपलब्ध करून देणाऱ्या साप्ताहिकांचे मौज-मजेचे दिवस. अमेरिकेतील सिनसिनाटी या शहरगावात जन्मलेल्या डोरिस डे यांना घरातच संगीताचे सान्निध्य होते. वडील संगीत शिक्षक असले, तरी त्यांनी मात्र नृत्यांगना होण्याचा ध्यास घेतला होता. एका अपघातात नृत्यसाधनेची आहुती द्यावी लागल्यानंतर त्यांनी आपले लक्ष गाण्याकडे केंद्रित केले. स्थानिक बँड स्थापला आणि गायिका म्हणून नावारूपाला आल्यानंतर चित्रपट क्षेत्राची वाट पकडली. पहिल्या हलक्याफुलक्या हॉलीवूडपटानंतर गायिका आणि नायिका या दोन्ही पातळ्यांवर सिनेमांमध्ये डोरिस डे यांनी आपली छबी मिरवली. १९५१ सालातील ‘आय विल सी यू इन माय ड्रीम’ या संगीत चित्रपटाने यशस्वी अभिनेत्री म्हणून डोरिस डे यांचे नाव हॉलीवूडपटांमधून चर्चिले जाऊ लागले. क्लार्क गॅबेल, कॅरी ग्राण्ट, जेम्स स्टिवर्ट, फ्रँक सिनात्रा, कर्क डग्लस या नरपुंगवांसोबत प्रमुख भूमिकांमध्ये गाजलेली ही रांगडी सौंदर्यवती गाण्यांसोबत अभिनयातूनही एका पिढीच्या तारा छेडत होती. अभिनेत्रींकडून उत्तानतेच्या अधिकाधिक पातळ्या ओलांडल्या जात असताना डोरिस डे यांची सद्दी संपत गेली. सत्तरीच्या दशकात त्यांनी हॉलीवूडच्या चकमकत्या जगाला रामराम केला. २०११ पर्यंत त्यांची गानसाधना सुरू होती. पण आल्फ्रेड हिचकॉकच्या ‘द मॅन हू न्यू टू मच’ या चित्रपटातील ‘के सेरा सेरा’ या गाण्याइतपत उंची त्यांच्या कोणत्याही गीताला गाठता आली नाही.