पन्नासहून अधिक वर्षे अमेरिकेतील लोकप्रिय संस्कृतीची नाडी ओळखून केलेले लेखन. एखाद्या घटनेचे वर्णन कुठलेही भाव न मिसळता करणाऱ्या पत्रकारितेला शब्दसौंदर्याच्या कोंदणात बसवून नवपत्रकारितेचे पितृत्व अशी अनेक वैशिष्टय़े टॉम वूल्फ यांनी त्यांच्या कारकीर्दीत प्राप्त केली होती. त्यांच्या निधनाने एक सिद्धहस्त पत्रकार व लेखक जगाने गमावला आहे.

वूल्फ यांचा जन्म १९३१ मध्ये व्हर्जिनियातील रिचमंड येथे झाला. त्यांचे वडील शेतकरी तर आई कलाकार होती. वॉशिंग्टन येथे सुरुवातीच्या शिक्षणानंतर त्यांनी येल विद्यापीठातून पीएचडी केली. १९६०-७० च्या दशकात त्यांनी न्यू जर्नालिझम म्हणजे नवपत्रकारिता हा प्रवाह पुढे आणला. ‘न्यू जर्नालिझम’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. एकदा ‘डेड लाइन’ जवळ आलेली असताना हातात काहीच नसल्याने त्यांनी एक काल्पनिक बातमीवजा लेख संबंधितांना पाठवून दिला तो जसाच्या तसा प्रकाशित झाला होता, त्यातून त्यांना ही कल्पना सुचली. कुठलाही प्रसंग बातमीत कोरडेपणाने वर्णन न क रता त्यात साहित्यिक लेखनशैली व प्रसंगी काल्पनिक पात्रे वापरून तो अधिक प्रभावी करण्याची त्यांची जी शैली होती ती वस्तुनिष्ठतेपासून दूर जाणारी असली तरी लोकांना भुरळ घालणारी ठरली. रॅडिकल चिक (ढोंगी उदारमतवादी), दी मी डेकेड (स्वमग्नतेचे दशक-१९७०) हे त्यांचे काही शब्द हे खोचक व अचूक वेध घेणारे. दी बोनफायर ऑफ व्हॅनिटीज, दी राइट स्टफ, दी इलेक्ट्रिक कूल एड अ‍ॅसिड टेस्ट यांसारख्या पुस्तकातून त्यांनी अमेरिकेतील प्रत्येक बदल व सांस्कृतिक मंथन टिपले. कलाजगत, वॉल स्ट्रीट, १९६० मधील हिप्पी संस्कृती यांच्या माध्यमातून त्यांनी वर्ग, सत्ता, वांशिकता, भ्रष्टाचार, लैंगिकता या सगळ्या क्षेत्रांत मुशाफिरी केली. टॉम वूल्फ यांची कारकीर्द सुरू झाली ती मॅसॅच्युसेटसमध्ये स्प्रिंगफील्ड युनियन वृत्तपत्रातून. नंतर दी वॉशिंग्टन पोस्ट, न्यू यॉर्क हेराल्ड ट्रिब्यून व न्यू यॉर्क मॅगझिनमध्ये त्यांनी काम केले. वूल्फ यांची लेखनशैली ही पत्रकारिता म्हणून सर्वानाच पटणारी नव्हती, त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली हे खरे, पण त्यांनी मध्यम-उच्चवर्गीय पत्रकारितेला कंटाळलेल्यांना काही काळ दिलासा दिला. दी कँडी कलर्ड टँगरीन- फेक स्ट्रीमलाइन बेबी, आय अ‍ॅम शार्लट सिमन्स, द पम्प हाऊस गँग, रॅडिकल चिक, दी पेंटेड वर्ल्ड, अ मॅन इन फुल, मेरी प्रँकस्टर्स यांसारखी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली, त्यातील काही बेस्ट सेलरही ठरली. पांढरी हॉम्बर्ग हॅट, दोन रंगछटांचे बूट, व्हाइट सूट ही त्यांची खासियत. लोकांचे लक्ष वेधून घ्यायला त्यांना आवडायचे. टवकारलेले कान, तेजाबने भरलेली लेखणी, विषयाच्या अंतरंगातील डुबकी, त्याच्या जोडीला पत्रकारितेच्या माध्यमातून जीवनाच्या प्रत्येक अंगाची झिंग अनुभवत ते एक प्रभावी लेखक ठरले.