राजकारणात स्त्रियांचा सहभाग तसा कमीच. राजकारणाची सर्वाधिक चर्चा जिथे केली जाते, त्या प्रसारमाध्यमांतही स्त्रियांचे प्रमाण नगण्यच. ज्या आहेत, त्यांच्या वाटय़ाला राजकारणबाह्य़ विषयच येतात. याचे कारण राजकारण हे पुरुषांचे क्षेत्र, त्यातले कळते ते फक्त पुरुषांनाच, असा सर्वसाधारण समज. तो खोडून काढणाऱ्यांपैकी कोकी रॉबर्ट्स या एक. गतशतकाच्या पूर्वार्धात डोरोथी थॉम्पसन या अमेरिकी स्त्री-पत्रकाराने आपली चमक दाखवली होती. या थॉम्पसन यांच्यापासून सुरू झालेली स्त्री-पत्रकारांची परंपरा आपल्या कर्तृत्वाने समृद्ध करणाऱ्यांत कोकी रॉबर्ट्स यांचे नाव घेतले जाते. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ राजकीय पत्रकारिता करणाऱ्या कोकी यांचे मंगळवारी निधन झाले.

१९४३ साली जन्मलेल्या कोकी यांचे कुटुंब अमेरिकी राजकारणातले बडे प्रस्थ. कोकी यांचे वडील थॉमस हेल बोग्स हे अमेरिकी संसदेत तब्बल तीसएक वर्षे प्रतिनिधी होते. १९७२ साली विमान अपघातात त्यांचे निधन झाल्यानंतर कोकी यांची आई- लिण्डी यांनी त्यांची जागा चालवली. कोकी यांची भावंडेही पुढे प्रत्यक्ष राजकारणात गुंतली. परंतु कोकी यांनी मात्र प्रत्यक्ष सत्तेच्या राजकारणात न शिरता, पत्रकारितेचा मार्ग स्वीकारला. १९६४ साली राज्यशास्त्रात पदवी मिळविल्यानंतर त्या सीबीएस या माध्यमसंस्थेत प्रतिनिधी म्हणून रुजू झाल्या. पुढे काही इतर लहान-मोठय़ा माध्यम संस्थांत काम करून कोकी यांनी १९७८ पासून दशकभर नॅशनल पब्लिक रेडिओमध्ये राजकीय घडामोडींचे वार्ताकन केले. या काळात त्यांनी ‘इराण-कॉण्ट्रा प्रकरण’ म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या शस्त्रविक्री प्रकरणाचे केलेले वार्ताकन विशेष गाजले. त्याबद्दल त्यांना मानाचा विन्टेल पुरस्कारही मिळाला. याच काळात त्यांचा ‘द लॉमेकर्स’ हा दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमही प्रसिद्ध होता. यानंतर १९८८ पासून ‘एबीसी न्यूज’ या माध्यम संस्थेत राजकीय बातमीदार म्हणून त्यांनी पुढील सुमारे तीन दशके काम केले. तिथे अमेरिकी संसदेतील घडामोडी, त्यात खेळले जाणारे राजकीय डावपेच, धोरणात्मक निर्णय यांविषयी दर रविवारच्या ‘धिस वीक’ या कार्यक्रमात त्या माहितीपूर्ण विश्लेषण करत. आतल्या गोटातील राजकीय संदर्भानी आणि त्यावरील टिप्पण्यांनी नटलेले त्यांचे विश्लेषण एबीसी न्यूजच्याच ‘वर्ल्ड न्यूज टुनाइट’ या कार्यक्रमातही ऐकायला मिळे. अमेरिकी दूरचित्रवाणी माध्यमांतील योगदानासाठी दिला जाणारा ‘एमी’ पुरस्कारही त्यांना मिळाला होता. पत्रकारितेबरोबरच त्यांनी स्वतंत्रपणे लेखनही विपुल केले. त्यात अमेरिकी समाजावर प्रभाव पाडणाऱ्या स्त्रियांचा गौरव करणारे लेखन त्यांनी प्रामुख्याने केले.