X
X

हेरॉल्ड ब्लूम

READ IN APP

समीक्षकांच्या पिढय़ांना त्यांचे कार्य प्रेरणा देत राहील, ते या संशोधकवृत्तीमुळे.

‘साहित्याला माणसाचा शोध लागला’ अशी दाद शेक्सपिअरला देणारे हेरॉल्ड ब्लूम परवाच्या सोमवारी (१४ ऑक्टोबर) निवर्तले. ते अमेरिकी साहित्य-समीक्षक. मुळात साहित्य-समीक्षकांना स्वत:च्याच देशात परकेपणाने वागवले जाते, त्यामुळे आपल्याला कुणा अमेरिकी साहित्य-समीक्षकाविषयी प्रेम, जिव्हाळा वगैरे वाटणे अंमळ कठीणच. पण अमेरिकेतील दोन वा तीन पिढय़ांमधील साहित्यप्रेमींनी ब्लूम यांचे एक तरी पुस्तक वाचलेले असते. त्यांच्या पुस्तकाची एकंदर संख्या २० हून अधिक. अर्थात, १९५५ पासून आजतागायत येल विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात अध्यापनकार्य करीत असलेल्या ब्लूम यांना उसंत बरीच मिळाली असेल.. शिवाय, वाचनाच्या वेगाबद्दल कौतुक झालेले समीक्षक, अशीही त्यांची एक ख्याती होती. एका बैठकीत हजारभर पाने ते सहज वाचू शकत आणि मुख्य म्हणजे हे वाचन, ‘परिशीलन’ या संज्ञेला पात्र ठरणारे- वाचलेल्या मजकुराविषयी विचार मांडू शकणारे- असे.

म्हणजे तुलनेने त्यांच्या ग्रंथसंपदेची संख्या कमीच म्हणायची.. पण काय करणार? फार अभ्यास करीत ते.. म्हणजे उदाहरणार्थ, ‘द अँग्झायटी ऑफ इन्फ्लुअन्स’ हे त्यांचे सर्वाधिक गाजलेले पुस्तक घ्या. कवींवरील प्रभाव अभ्यासून या प्रभावांच्या तऱ्हांनुसार त्यांचे प्रकार ओळखून त्यांवर उपाय काही असतो काय याचे चिंतन करणारे हे पुस्तक लिहिण्यापूर्वी ब्लूम यांनी किती वर्षे घालविली असावीत? दहा!! अद्भुतवादी (रोमँटिक) इंग्रजी काव्याचे वाचन करताना ही प्रभावांची प्रभावळ त्यांना प्रथम जाणवली, या बहुतांश इंग्रज कवींपैकी शेली आणि यीट्स यांच्यावर स्वतंत्र पुस्तके त्यांनी आधी लिहिली होतीच, पण प्रभावांचा विचार हा सैद्धान्तिक आहे, तो तडीस जाण्यासाठी अधिक अभ्यास हवा, म्हणून त्यांनी दान्तेपासून अमेरिकी राष्ट्रकवी वॉल्ट व्हिटमनपर्यंत सारे महत्त्वाचे कवी वाचले आणि मग पुस्तक लिहिले. तरीही हे पुस्तक फक्त प्रभावांविषयीचे होते. ‘प्रभावमुक्तीतून परंपरेचे नवे पाऊल पडते’ ही धारणा जरी सार्वत्रिक असली, तरी ती सिद्ध करण्यासाठीचे नवे पुस्तक ब्लूम यांनी लिहिले. पाश्चात्त्य साहित्याची परंपरा (द वेस्टर्न कॅनन) हे त्यांचे पुस्तक १९९४ साली आले; म्हणजे १९७३ सालच्या ‘अँग्झायटी ऑफ इन्फ्लुअन्स’ नंतर २१ वर्षांनी. त्याआधीच, हेरॉल्ड ब्लूम हे ‘पाश्चात्त्यकेंद्री’ असल्याची टीका त्यांच्यावर होत होती.. पण २१ वर्षे नवपरंपरेचा शोध घेण्यात त्यांनी घालविली. त्यामुळेच त्यांच्या ‘कॅनन’मध्ये व्हर्जिनिया वूल्फ, पाब्लो नेरुदा असे पाश्चात्त्याभिमानी कंपूला अनपेक्षित ठरणारे साहित्यिकही होते. समीक्षकांच्या पिढय़ांना त्यांचे कार्य प्रेरणा देत राहील, ते या संशोधकवृत्तीमुळे.

22
X