गुंथर सोंथायमर किंवा मॅक्सिन बर्नसन या अभ्यासकांप्रमाणे एलिनॉर झेलियट यांनीही शेवटपर्यंत महाराष्ट्राशी नाते टिकवले. अमेरिकेतील कार्लटन महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य न सोडता, भारताची- विशेषत: महाराष्ट्राची अगदी अद्ययावत माहिती मिळवत राहून या देशातील सामाजिक स्थिती-गतीच्या इतिहासाचा अभ्यास त्यांनी सुरू ठेवला. त्यांच्या या अभ्यासाची फळे म्हणजे चोखामेळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रा. रं. बोराडे, शंकरराव खरात ते नामदेव ढसाळ, राजा ढाले यांचे जागतिक स्थान काय, याचे वेळोवेळी झालेले स्पष्टीकरण! ‘दलित’ ही संज्ञा आता (डॉ. आंबेडकरांनी वापरलेल्या पददलित अशा अर्थाने नव्हे, तर) अस्मितादर्शक अर्थाने वापरली जाते हे सकारात्मक विवेचन झेलियट यांचे, तसेच ‘दलित साहित्याची चळवळ लवकरच अखिल भारतीय स्वरूपाची होणार’ हे भाकीतही त्यांनीच १९८०च्या दशकात केले होते. त्या अर्थाने, त्या क्रांतदर्शी इतिहासकार ठरतात. आधुनिक भारतीय बौद्धधम्म-पुनशरेधाबद्दल लिहिताना ‘मी कथा सांगणार नाही’ असे म्हणणाऱ्या डॉ. झेलियट यांचा पिंड एखाद्या घटनेमागील कारणे शोधणाऱ्या, दुवे जुळवणाऱ्या इतिहासकाराचा होता. ‘दलितांचा अभ्यास करते म्हणून मला कोणी इतिहासकार समजतच नाहीत- मानववंश शास्त्रज्ञच समजतात’ ही त्यांची तक्रार केवळ आत्मपर नसून, इतिहासाचे नवोन्मेष लोकांना का कळू नयेत याबद्दलची होती. ‘दलितांना इतिहास नाही, हे खरे; पण म्हणूनच अभ्यासकांनी तो शोधायला हवा’ ही त्यांची कळकळच त्यांना चोखामेळा इंग्रजीत नेण्याचे श्रेय देऊन गेली.

स्वतंत्र लेखांद्वारे त्यांच्या अभ्यासकीय कार्याचा परामर्श घेतला जाईलच, परंतु येथे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही दुवे समजून घ्यायला हवे. अमेरिकी क्वेकरपंथीय कुटुंबात १९२६ साली जन्मलेल्या एलिनॉर यांच्यावर या पंथातील सहृदय मानवतावादाचा प्रभाव बालपणापासून होता. ‘‘महायुद्धात क्वेकरांनी अमेरिकेतील जपानी निर्वासितांना मदत केली आणि पुढे मी ‘नॅशनल असोसिएशन फॉर द अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ कलर्ड पीपल’ या (कृष्णवर्णीयांच्या) संघटनेचे काम करू लागले.. डॉ. आंबेडकर यांचे नाव अधूनमधून वाचू लागले.. मग १९५२ मध्ये क्वेकर युवा दलातर्फे भारतात आले.. तेव्हा आंबेडकरांशी भेट नाहीच झाली..’’ अशा आठवणी त्यांनी (‘कास्ट इन लाइफ’ या पुस्तकातील लेखात) नमूद केल्या आहेत.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!

‘डॉ. आंबेडकर अ‍ॅण्ड द महार मूव्हमेंट’ हा पीएच.डी. प्रबंध (पेनसिल्व्हानिया विद्यापीठ, १९६९) लिहिण्यासाठी १९६४ पासून त्या पुण्यात येत. पुढे एस. एन. कदमांसह महाडला व पुढे कोकणात, दादासाहेब गायकवाडांना भेटण्यासाठी नाशकात, दीक्षाभूमीसाठी नागपुरात अशा अनेक ठिकाणी त्या फिरल्या. वसंत मून यांच्या कार्याने भारावल्या आणि मीनाक्षी मून, सुधीर वाघमारे अशांच्या सुहृद बनल्या. महाराष्ट्राशी त्यांनी अभ्यासातून  जोडलेले नाते मात्र, पाच जून रोजी त्यांच्या झालेल्या निधनानंतरही थांबणारे नाही.