इटलीचे गुलिमो मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावला, त्यामुळे संदेशवहनाची क्रांती जनसामान्यांपर्यंत पोहोचली. पण त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी या क्षेत्रातील संशोधनाला उत्तेजन देण्याचे काम पुढे चालवले आहे. मार्कोनी सोसायटी ही संस्था त्यासाठी स्थापन करण्यात आली. या संस्थेच्या वतीने दिला जाणारा पॉल बॅरन तरुण संशोधक पुरस्कार बेंगळूरुचा तरुण संशोधक आनंदतीर्थ सुरेश याला जाहीर झाला आहे.

सुरेश हा अवघा २८ वर्षांचा असून सध्या गुगलमध्ये काम करतो. इंटरनेटचे वेगवान कनेक्शन सर्वानाच मिळते असे नाही, शिवाय ते कमी किमतीच्या साधनांवर मिळवणे फार अवघड; यावर उपाय म्हणून सुरेशने वेगळे तंत्रज्ञान विकसित केले. त्यात कमी तरंगलांबीच्या इंटरनेट जोडणीतही चांगला वेग साध्य करता येतो. सुरेश याचे शिक्षण बंगळुरूजवळील बनशंकरी व जयानगर येथे झाले. त्याचे शिक्षण श्री राजराजेश्वरी विद्यामंदिर, विजया हायस्कूल, नॅशनल कॉलेज (जयानगर) येथे झाले. त्याने आयआयटी मद्रासमधून २०१० मध्ये भौतिकशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. २०१० ते २०१६  दरम्यान सॅण्डियागोतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून मास्टर्स व डॉक्टरेट या दोन्ही पदव्या त्याने घेतल्या. सध्या  गुगलमध्ये विकसनशील देशांच्या लोकांना इंटरनेटचा फायदा मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञानात्मक उत्तरे शोधण्यासाठी तो काम करीत आहे. सुरेशच्या अलगॅरिथममुळे माहिती देवाणघेवाणीचा खर्च कमी झाला आहे, कारण यात माहितीचे संकलन वेगळ्या रूपात करून ती पाठवण्याचे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले, जे किफायतशीर आहे. तेलाला जे आर्थिक महत्त्व आहे ते आजकाल डेटाला (म्हणजे माहितीला) येत आहे.  सुरेशला विद्युत व संगणक अभियांत्रिकीचे प्राध्यापक अ‍ॅलॉन ओरलिटस्की यांचे मार्गदर्शन लाभले. भारतात सध्या डिजिटल इंडियाचा गाजावाजा होत असला तरी अजून श्रीमंत व गरीब यांच्यातील डिजिटल दरी खूप मोठी आहे. ती दूर करण्यासाठी जे वैज्ञानिक काम करीत आहेत त्यात सुरेशचा समावेश आहे. माहिती विज्ञानाचा वापर करून सामान्यांचे जीवन संपन्न करण्याचे काम तो करीत आहे. सुरेशचे वडील शहरात छापखाना चालवायचे, ते आता हयात नाहीत. आई गृहिणी आहे, अशा साध्या कुटुंबातून आल्याने माहिती तंत्रज्ञान गरिबांच्या आवाक्यात आणण्याचे स्वप्न त्याने पाहिले व ते प्रत्यक्षात उतरवले. आधीचे मार्कोनी पुरस्कार विजेते हे त्याचे आदर्श आहेत. त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच आहे, असे सुरेश सांगतो. १९७४ मध्ये गुलिमो मार्कोनी यांच्या कन्येने हा पुरस्कार सुरू केला. संदेशवहन क्षेत्रातील एक मानाचा पुरस्कार म्हणून त्याकडे बघितले जाते. एवढय़ा लहान वयात सुरेशला मिळालेले हे यश इतर तरुणांना माहिती तंत्रज्ञानातील अभियांत्रिकी शाखेकडे खेचून आणणारे ठरेल यात शंका नाही. माहितीचे वहन हे तरंगलांबी व उपलब्ध साधनातील सुविधा यावर अवलंबून असते. त्यात अजून बरेच बदल अपेक्षित आहेत. मोबाइलमुळे माहितीची क्रांती प्रत्येकाच्या मुठीत आली असली तरी गरिबांपर्यंत हे तंत्रज्ञान पुरेशा प्रमाणात पोहोचलेले नाही. तंत्रज्ञान हे आर्थिक विकासाकडे नेणारे असते, हे आपण मोबाइलच्या माध्यमातून पाहिले. मोबाइलचा वापर सेल्फी काढण्यासाठी करावा, की स्वप्रगतीसाठी हे ज्याने-त्याने ठरवायचे आहे. पण ज्यांना खरोखर आर्थिक उन्नतीची आस आहे ते त्याचा वापर जास्त योग्य पद्धतीने करणार यात शंका नसते. त्यामुळे सुरेशने जे संशोधन केले आहे त्यातून आणखी नवे तंत्रज्ञान माहितीच्या ताकदीवर अनेकांना स्वबळावर उभे करील यात शंका नाही.