शहरी वातावरणात राहून साहित्याला पूरक असे वातावरण लाभल्याने साहित्याची आवड जोपासलेल्या आणि त्यातून पुढे सरस्वतीचे उपासक झालेल्या साहित्यिकांची बरीच उदाहरणे देता येतील. मात्र एखाद्या दुर्गम खेडय़ात जन्मलेल्या आणि नंतर स्वत:च्या प्रतिभेच्या आणि अभ्यासाच्या बळावर साहित्यविश्वात स्वत:चे अढळ स्थान निर्माण केलेल्या साहित्यिकाची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरते. ओडिशाच्या एका लहान गावात जन्मलेले आणि मातृभाषेतच नव्हे, तर इंग्रजी आणि संस्कृतमध्येही आपल्या साहित्यसेवेने ठसा उमटवलेले अनंत चरण सुक्ल हे सर्वार्थाने विद्वान ठरतात. नुकतेच वयाच्या ७८व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने ते कटकमधील निवासस्थानी मरण पावले.

सुक्ल यांचा जन्म ओडिशाच्या भद्रक जिल्ह्य़ातील एका लहान खेडय़ातला. भद्रकमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कलकत्त्याच्या जादवपूर विद्यापीठातून इंग्रजी, तत्त्वज्ञान व संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. याच विद्यापीठातून ‘कन्सेप्ट ऑफ लिमिटेशन इन ग्रीक अँड इंडियन अ‍ॅस्थेटिक्स’ या प्रबंधासाठी त्यांनी तौलनिक साहित्यात पीएच.डी. घेतली.

सुक्ल यांची साहित्य क्षेत्रातील कामगिरी थक्क करणारी आहे. १९७८ सालापासून प्रकाशित होणाऱ्या ‘जर्नल ऑफ कम्पॅरेटिव्ह लिटरेचर अँड अ‍ॅस्थेटिक्स चे ते संस्थापक संपादक होते आणि आयुष्याच्या अखेपर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. १९७७ साली या नियतकालिकाची मुहूर्तमेढ त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय विद्वानांच्या साहाय्याने रोवली. नियतकालिके व मूळ शोधनिबंध प्रकाशित करणाऱ्या ‘कविराज इन्स्टिटय़ूट ऑफ कम्पॅरेटिव्ह लिटरेचर अँड अ‍ॅस्थेटिक्स’चेही ते संस्थापक होते. साहित्यासोबत शिक्षण क्षेत्रातही तोडीची कामगिरी त्यांनी सहज साधली होती. लिव्हरपूल, केंब्रिज, कार्डिफ, सिएना, हेलसिंकी इ. परदेशी विद्यापीठांशिवाय अनेक भारतीय विद्यापीठांमध्ये ते ‘व्हिजिटिंग प्रोफेसर’ होते.

सुक्ल यांनी इंग्रजीत अनेक ग्रंथ लिहिले, तसेच त्यांचे लेख व शोधनिबंध विविध नियतकालिकांत प्रसिद्ध झाले. याशिवाय ओडियातही त्यांनी साहित्यरचना केली. यात ‘सुलताकु शेष चिठ्ठी’ व ‘शताब्दिर शब्द’ हे दोन लघुकथा संग्रह; ‘मानपत्र’ व ‘नि:शब्द आसावरी’ हे दोन कवितासंग्रह; कवी बंसीवल्लभ व नंदकिशोर आणि देशभक्त क्रांतिकारक जयी राजगुरू व चाखी खुंटिया यांच्यावरील चरित्रात्मक नाटके व ओडियाभाषकांना परिचय करून दिलेला ‘पाश्चात्त्य साहित्य इतिहास’ यांचा समावेश आहे. अ‍ॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र, ग्रीक नाटक, तसेच सोफोक्लिस, युरिपिडस व अ‍ॅरिस्टोफेन्स यांच्या नाटकांचे त्यांनी ओडियात भाषांतर केले

संस्कृत कवी आणि व्याकरणतज्ज्ञ विश्वनाथ कविराज, मध्ययुगीन धार्मिक तत्त्वज्ञ श्रीधर स्वामी आणि चैतन्य कालोत्तर धार्मिक तत्त्वज्ञ बलदेव विद्याभूषण यांच्यावर सुक्ल यांनी लिहिलेले शोधनिबंध (मोनोग्राफ) साहित्य अकादमीने ‘मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर’ मालिकेत प्रकाशित करून त्यांच्या साहित्यसेवेची पावती दिली. इतकेच नव्हे, तर बंगालचे रवींद्रनाथ टागोर व आसामचे भूपेन हजारिका यांच्या निवडक गीतांचे अनंत यांनी ओडियात गीतभाषांतर केले.  सुक्ल  यांच्या निधनाने अखंड साहित्यसेवेला वाहिलेल्या आणि अखेपर्यंत प्रसिद्धीपराङ्मुख राहिलेल्या एका व्रतस्थाला आपण मुकलो आहोत.