08 March 2021

News Flash

एन्गोझी ओकोन्जो- इवेआला

जागतिक व्यापार संघटनेतील पद आपणांस मिळावे, ही इच्छा एन्गोझी यांनी २०२० च्या  जूनमध्येच मुखर केली होती.

एन्गोझी ओकोन्जो- इवेआला

वित्तीय, आर्थिक व कॉपरेरेट क्षेत्रात संचालक व त्याहून मोठय़ा पदांवरील स्त्रियांचे जागतिक प्रमाण आहे १७ टक्के, तर आफ्रिकेत ते अधिक- म्हणजे २५ टक्के आहे. तरीही, जागतिक व्यापार संघटना-  डब्ल्यूटीओच्या महासंचालकपदी पोहोचणारी पहिली आफ्रिकन व्यक्ती आणि पहिली महिला, म्हणून एन्गोझी ओकोन्जो- इवेआला यांचे कौतुक होते आहे. ६६ वर्षांच्या एन्गोझी नायजेरियात जन्मल्या, अमेरिकेत त्यांनी उच्चशिक्षण (हार्वर्ड विद्यापीठातून १९७९ मध्ये अर्थशास्त्रात एमए, ‘एमआयटी’मधून १९८१ मध्ये पीएच.डी.) घेतले आणि नायजेरियाच्या आर्थिक क्षेत्रातील भ्रष्टाचार व अव्यवस्था यांविरुद्ध सातत्याने आवाज उठविला. २००३ ते २००६ आणि पुढे २०११ ते १५ या वर्षांत नायजेरियाचे अर्थमंत्रिपद, तर मधल्या काळात परराष्ट्र मंत्रिपद त्यांनी सांभाळले. मंत्री म्हणून अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांशी त्यांचा संबंध आलाच, पण सत्तापद सोडल्यानंतर युनेस्को, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अशा जागतिक संस्थांच्या उपक्रमांतच त्या अधिक गुंतल्या. शैक्षणिक समान संधी निधी या युनेस्कोच्या उपक्रमात तसेच नाणेनिधीच्या विकास-धोरण समितीत त्यांनी काम केले. प्रसिद्ध ब्रूकिंग्ज इन्स्टिटय़ूट आणि अन्य संस्थांत अभ्यागत व्याख्यात्या म्हणून कार्यरत राहिल्या, तसेच ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ इकॉनॉमीज ऑफ आफ्रिका’ ही स्वत:ची अभ्याससंस्था स्थापली. जागतिक आरोग्य संघटना तसेच युनिसेफने स्थापलेल्या, तर बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडून निधी घेणाऱ्या  ‘गावि’- ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अ‍ॅण्ड इम्युनायझेशन-च्या प्रमुख संचालक म्हणून २०१६ पासूनचे त्यांचे काम उल्लेखनीय आहे.

जागतिक व्यापार संघटनेतील पद आपणांस मिळावे, ही इच्छा एन्गोझी यांनी २०२० च्या  जूनमध्येच मुखर केली होती. नायजेरियातील सार्वजनिक जीवनातून जवळपास निवृत्तच झाल्यानंतर मुले अमेरिकेत असल्याने, एन्गोझी यांनी मेंदूशल्यचिकित्सक पती इकेम्बा इवेआला यांच्यासह अमेरिकी नागरिकत्व स्वीकारले. त्या २०१९ पासून दुहेरी नागरिक (नायजेरिया, अमेरिका) आहेत. जागतिक व्यापार संघटनेतील महत्त्वाचे पद त्यांना मिळाले ते ‘अमेरिकी नागरिक’ म्हणूनच, हे खरे असले तरी आफ्रिकेतील अनेक संस्था- संघटना, धोरणकर्ते यांच्याशी नित्यसंपर्क असणाऱ्या एन्गोझी आफ्रिकेची बाजू या व्यापार- व्यासपीठावर मांडतील, अशी आशा आफ्रिकेस आहे. त्याहीपेक्षा, जागतिक व्यापार संघटनेपुढे आज देशोदेशींच्या ‘संरक्षणवादी व्यापार धोरणां’चे आव्हान मोठे आहे. अशा स्थितीत एन्गोझी, येत्या एक मार्चपासून पदग्रहण करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 12:06 am

Web Title: angakozhi okonjo iweala profile abn 97
Next Stories
1 डेव्हिड वॉशब्रुक
2 मेजर जनरल (निवृत्त) बसंत कुमार महापात्र
3 लिन स्टॉलमास्टर
Just Now!
X