25 April 2019

News Flash

डॉ. अनिकेत जावरे

महाराष्ट्रात एकेकाळी करकरीत बुद्धिवाद आणि व्यासंगाच्या जोरावर सैद्धांतिक मांडणी करणाऱ्या अभ्यासकांची दमदार फळी होती.

महाराष्ट्रात एकेकाळी करकरीत बुद्धिवाद आणि व्यासंगाच्या जोरावर सैद्धांतिक मांडणी करणाऱ्या अभ्यासकांची दमदार फळी होती. परंतु नवउदारीकरणाची चाहूल लागू लागली, तशी असं काही सैद्धांतिक विश्व असतं, ते आपल्या जगण्यावर प्रत्यक्षाप्रत्यक्ष प्रभाव टाकत असतं, किंबहुना त्याआधारे आपण आपलं जगणं समजून घेऊ शकतो याची जाणीवच उरली नाही की काय, असं वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली. अशा काळात अकादमिक जगतात दाखल झालेल्या आणि व्यासंग व नवदृष्टीनं गेली तीनेक दशकं इंग्रजी साहित्याभ्यासात आपला ठसा उमटवणाऱ्या डॉ. अनिकेत जावरे यांचं अलीकडेच निधन झालं.

आपल्या विषयात गाडून घेऊन काम करणं, जगभरचे वैचारिक हिंदोळे पचवून त्यांचा ‘भारतीय’ आशय मांडणं, मुख्य म्हणजे सैद्धांतिक चिकित्सा करत राहणं अशी डॉ. जावरे यांच्या अकादमिक वावराची काही वैशिष्टय़ं सांगता येतील. मात्र अकादमिक मांडणी करणं म्हणजे इतरांशी फटकून वागणं वा अवतरणांची रांगोळी काढत बसणं अशी त्यांची वृत्ती नव्हती. विद्यार्थिप्रिय अध्यापक अशी त्यांची ख्याती होती. समग्रता सुलभ व सहजपणे मांडता येते यावरचा विश्वास आणि भारतीय समाजव्यवस्थेच्या गुंतागुंतींच्या संदर्भात स्वत:च्या अध्यापक असण्याचा अर्थही ते जाणत होते, हे ‘द सायलेंस ऑफ द सबाल्टर्न स्टुडन्ट’ या त्यांच्या १९९८ सालच्या निबंधातून ध्यानात येतं.

१९९१ साली पुणे विद्यापीठातून पीएच.डी. झाल्यानंतर तिथेच इंग्रजी विभागात ते रुजू झाले. इंग्रजी साहित्यसमीक्षा, अनुवादाभ्यास, कल्पित साहित्य, कल्पित विज्ञानसाहित्य, एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र आणि विशेषत: साठोत्तरी पाश्चिमात्य वैचारिक मांडणीचा परामर्श हे त्यांच्या अभ्यासाचे विषय राहिले. त्यांच्या पुढाकारामुळेच पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात सिनेअभ्यास, ग्रंथेतिहास यांसारखे अनवट विषय अभ्यासक्रमाचा भाग बनू शकले आणि पुढे ते दिल्लीच्या ‘शिव नाडर विद्यापीठा’त गेले. ‘सिम्प्लिफिकेशन्स’ हे सस्यूर, लाकां, फुको, देरिदा आदींच्या विचारांचा आलेख मांडणारं पुस्तक असो वा ‘निऑन फिश इन डार्क वॉटर’ हा भविष्यवेधी विज्ञानकथांचा संग्रह असो, डॉ. जावरे यांनी गंभीर वैचारिक लिखाणाबरोबच सर्जनशील लेखनही केलं आहे. गत महिन्यात प्रसिद्ध झालेलं ‘प्रॅक्टिसिंग कास्ट : ऑन टचिंग अ‍ॅण्ड नॉट टचिंग’ हे अस्पृश्यतेच्या प्रश्नाचा मूलगामी वेध घेणारं पुस्तकही त्यांच्या नवदृष्टीचं उदाहरण ठरावं. मराठीत त्यांची ‘जवानी दिवानी अर्थात उद्धव दीक्षितचा प्रेमभंग’ ही कादंबरी तशी दुर्लक्षितच राहिली, परंतु ‘काळे पांढरे अस्फुट लेख’ हा त्यांचा लेखसंग्रह आजच्या मराठी वैचारिकतेत भर घालणारा ठरला आहे.

 

First Published on December 5, 2018 1:56 am

Web Title: aniket jaaware