अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत काम करूनही काहीसे – किंवा खरे तर फारच – उपेक्षित राहणे दग्दर्शक व पटकथालेखक अनिल गांगुली यांच्या वाटय़ाला आले होते. १९७० ते १९९० अशी त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकीर्द. बंगाली भद्रलोकातून आलेल्या या निर्माता-दिग्दर्शकाने मध्यमवर्गीय घरातील विवाहांमध्ये सासवांच्या हस्तक्षेपासह असलेले अनेक विषय चित्रपटातून गाजवले होते. त्यांचे नुकतेच निधन झाले, तेव्हा त्यांची ओळख दूरचित्रवाणीवरील संजीवनी, साराभाई विरुद्ध साराभाई आदी मालिकांतील तारका असलेल्या रुपाली गांगुलीचे वडील म्हणून सांगितली जात होती. अशी ओळख एखाद्या पित्याला अभिमानास्पदच. तरीही अनिलदांची कारकीर्द इतकीही दुर्लक्ष करण्यासारखी मुळीच नाही. ते ‘कोरा कागज’चे दिग्दर्शक!

बंगालीतील ‘सात पाके बंधा’ हा चित्रपट ‘कोरा कागज’ नावाने हिंदीत (विजय आनंद-जया बच्चन) आणला. त्यात त्यांनी मूळ बंगाली चित्रपटातील शोकात्म शेवट बदलल्याने लोक रागावले होते. ‘कोरा कागज’ चित्रपट हीच त्यांची ओळख. १९७६ मध्ये आशापूर्णादेवी यांच्या कथेवर आधारित ‘तपस्या’ चित्रपट त्यांनी केला, त्याने राखी गुलजार यांना अभिनेत्री म्हणून मान्यता मिळवून दिली. तपस्या चित्रपटातही त्यांनी पुन्हा सुखात्म शेवट करून मूळ कथेत बदल केला होता. बंगाली चित्रपटांच्या हिंदी रूपांतरणात त्यांनी नेहमीच लोकांच्या भावनांचा विचार कदाचित केला असेल. नंतर ‘हमकदम’ या चित्रपटात त्यांनी सत्यजित राय यांच्या ‘महानगर’ चित्रपटाचा रीमेक करण्याचा अपयशी प्रयत्न केला. ‘आँचल’ चित्रपटातही पतीला पत्नीचे त्याच्या भावाशी संबंध असल्याचा संशय दाखवला आहे.

मध्यमवर्गीय स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतरे टिपण्याचा अनिलदांचा प्रयत्न होता, पण अनेकदा त्यांच्या चित्रपटात गीतांच्या लोकप्रियतेने त्यांना झाकोळून टाकले. ‘आँचल’ चित्रपटात आर. डी. बर्मन यांचे ‘भोर भये पंछी धून..’, कोरा कागजमध्ये ‘मेरा जीवन कोरा कागज..’, सरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या परिणितावर आधारित संकोचमधील ‘बंधी रे कही प्रीत..’, तपस्यामधील ‘दो पंछी..’, खानदानमधील ‘ये मुलाकात एक बहाना हैं..’ या गीतांमुळे त्यांचे चित्रपट लक्षात राहिले, पण लोक अनिलदांना मात्र विसरले. ‘साहेब’ हा त्यांचा अखेरचा लक्षणीय चित्रपट. अखेरच्या काळात त्यांनी सडक छाप, मेरा यार मेरा दुश्मन, दुश्मन देवता यासारखे सामान्य प्रेक्षकांसाठीचे चित्रपट केले. १९६० मध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून हाफ टिकट व भीगी रातपासून कारकीर्द सुरू झाली. त्यांनी ‘अंगारा’ या चित्रपटातून कन्या रुपाली गांगुलीला या क्षेत्रात आणले, पण तिलाही चित्रपटांत फारसे यश मिळाले नाही. ‘किये परा किये नजारा’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट. त्यांच्या निधनाने जुन्या काळाशी जोडणारा उपेक्षित दुवा निखळला आहे.