News Flash

अनिता पगारे

समकालीन प्रश्नांबद्दलची अस्वस्थता लिहून व्यक्त करणाऱ्या अनिता यांच्यासारख्या अनुभवी कार्यकर्तीमुळे त्यावर व्यापक चर्चाही घडे.

अनिता पगारे

सामाजिक चळवळींमध्ये आक्रमकता ठासून भरलेले आणि नेतृत्व करण्यासाठी पुढे येणारे अनेक जण दिसतील. परंतु आक्रमकतेला अभ्यास आणि विवेकाची जोड नसल्याने बहुतेकांचे नेतृत्व एका मर्यादेपुढे जाऊ शकत नाही. अनिता पगारे यांच्यामध्ये मात्र आक्रमकता, अभ्यासूवृत्ती, विवेक आणि समोरच्या व्यक्तीला आपले म्हणणे समजावून सांगण्याची विलक्षण हातोटी हे सारे गुण होते. त्यामुळेच विविध सामाजिक चळवळींत अनिता यांच्याबरोबर काम करणाऱ्यांना त्यांच्या निधनाने अतीव दु:ख होणे साहजिक आहे. अनिता यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील पुरोगामी तसेच आंबेडकरवादी चळवळीची हानी झाली आहे.

नाशिक शहरातील फुलेनगरच्या वस्तीत जन्मलेल्या अनिता पगारे यांनी आपल्या अभ्यासूवृत्तीमुळे सामाजिक चळवळींत घेतलेली झेप अनेकांना प्रेरणा देणारी ठरली. अंगी असलेल्या झुंजारपणामुळेच त्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये महिलांचे हक्क आणि हिंसा या विषयावर आवाज उठवू शकल्या. अनिता यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने २०१९ मध्ये नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात महिला हिंसामुक्ती परिषद झाली. अनिता यांच्याकडे उत्तम संघटनकौशल्य असल्याने या परिषदेत तब्बल ३०० स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. नाशिकची महिला हक्क संरक्षण समिती, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा महिला विभाग, मुंबईचा फूड बाजार, जव्हारची आवेदन, नाशिकची विश्वास प्रबोधिनी या संस्थांबरोबर अनेक वर्षे काम के ल्याने आलेल्या अनुभवातून अनिता यांनी ‘संगिनी’ ही संस्था स्थापन केली.

समकालीन प्रश्नांबद्दलची अस्वस्थता लिहून व्यक्त करणाऱ्या अनिता यांच्यासारख्या अनुभवी कार्यकर्तीमुळे त्यावर व्यापक चर्चाही घडे. वंचितांसह भूमिहिनांचे प्रश्न, शालेय मुलींचे भावविश्व हे विषय अनिता यांनी परिसंवाद, मेळाव्यांत मांडलेच; पण वर्तमानपत्रे-नियतकालिकांतूनही त्या वेळोवेळी व्यक्त झाल्या. समाजाशी संबंधित आणि प्रामाणिकतेचा गंध असेल तर अनिता कोणत्याही आंदोलनात सहभागी होत. त्यामुळेच समता आंदोलन, छात्रभारती, दक्षिणायन, नर्मदा बचाव अशा वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये अनिता यांचा सक्रिय वावर राहिला. युवावर्गाशी संंबंधित समस्या, त्यांचे भावविश्व समजून घेण्यासाठी युवावर्गाशी मैत्रीचे नाते जपणाऱ्या अनिता यांनी ‘मैत्रकारवा’ हा उपक्र म नाशिकमध्ये सुरू केला होता. चळवळींची रूढ चौकट ओलांडून कार्यरत राहिलेल्या या कार्यकर्तीने जगाचा निरोप घेणे, त्यामुळेच चटका लावणारे ठरते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2021 12:06 am

Web Title: anita pagare profile abn 97
Next Stories
1 पं. नाथराव नेरळकर
2 नवल अल सदावी
3 विलास वाघ
Just Now!
X