22 September 2020

News Flash

अ‍ॅना राजम मल्होत्रा

अ‍ॅना राजम यांचा जन्म कोळिकोडचा. उच्च शिक्षणासाठी त्या तेव्हाच्या मद्रास प्रांतात आल्या.

निवृत्तीनंतर, उतारवयातही मुंबई विमानतळ परिसरातील लीला हॉटेलच्या प्रशस्त लॉबीत त्या कधी वाचन करीत बसात, तर कधी ज्येष्ठ सनदी अधिकारी त्यांच्याशी चर्चा करायला येत. प्रत्येकाशी त्या शांतपणे बोलत, मार्गदर्शन करत. त्यांचे नाव होते अ‍ॅना राजम मल्होत्रा. स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या महिला प्रशासकीय अधिकारी!

अ‍ॅना राजम यांचा जन्म कोळिकोडचा. उच्च शिक्षणासाठी त्या तेव्हाच्या मद्रास प्रांतात आल्या. डॉक्टर वा प्राध्यापक होणे शक्य असतानाही त्यांनी नागरी सेवेची परीक्षा दिली. त्या वेळी आयोगाच्या अनेक सदस्यांनी महिलांसाठी परराष्ट्र सेवा योग्य राहील असा सल्ला दिला, पण त्यांनी तो जुमानला नाही. मग भारतीय प्रशासकीय सेवेत १९५१ साली त्या दाखल झाल्या. सेवेसाठी त्यांना मद्रास केडरच देण्यात आले.  तेव्हा मुख्यमंत्री राजाजी, कायदा व सुव्यवस्थेसारखे विषय महिला सक्षमपणे हाताळू शकणार नाहीत, असे म्हणाले. नंतर मात्र राजाजी यांनी जाहीर सभेत अ‍ॅना राजम यांच्या कामाचे व सचोटीचे कौतुक केले होते.

मद्रासमधील सात मुख्यमंत्र्यांच्या काळात त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. केंद्रात प्रतिनियुक्तीवर असताना १९८२ मध्ये दिल्ली एशियाडच्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्याच बॅचचे अधिकारी रा. ना. मल्होत्रा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मल्होत्रा हे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर बनल्याने अ‍ॅना  यांनाही महाराष्ट्रात येण्याची संधी मिळाली.  सरकारने न्हावाशेवा येथे अद्ययावत बंदर उभारणीचे महत्त्वाचे काम त्यांच्यावर सोपवले. भूसंपादन ते केंद्राकडून पर्यावरणविषयक मंजुऱ्या मिळवणे हे मोठे जिकिरीचे काम होते. कोणत्याही प्रकारची कटुता येऊ न देता सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन हे काम त्यांनी पूर्ण केले. जेएनपीटीच्या आजच्या स्वरूपाचे श्रेय बरेचसे त्यांचेच. सरकारी सेवेतील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. ९२ वर्षांचे प्रदीर्घ, कृतार्थ आयुष्य त्या जगल्या. गेल्या आठवडय़ात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 12:06 am

Web Title: anna rajam malhotra
Next Stories
1 कल्पना लाजमी
2 शांताराम पोटदुखे
3 वि. वि. चिपळूणकर
Just Now!
X