संगीताच्या प्रांतात रसिक आणि कलावंत यांच्यातील सारा संवाद स्वरांचा असतो. कलावंताची सारी प्रतिभा रसिकांच्या साक्षीने फुलत असते आणि त्यांची दाद हीच त्या कलावंताचीही ऊर्जा असते. पण कित्येक दशके अशा रसिकांपासून दूर राहूनही त्यांच्या मनात असलेले स्थान ढळू न देण्याची किमया केवळ अन्नपूर्णा देवी यांनाच साध्य झाली. त्यांच्याभोवती असलेले गूढ वलय आणि त्यांनी गाजवलेली कारकीर्द यामुळे जिवंतपणीच दंतकथा होण्याचे भाग्यही अन्नपूर्णा देवी यांनाच साध्य झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय अभिजात संगीतात मैहर एवढे नाव जरी उच्चारले, तरीही कानाच्या पाळीला हात लावून आदर व्यक्त केला जातो. मध्य प्रदेशातील मैहर हे गाव तेथील अल्लाउद्दीन खाँ यांच्या वास्तव्याने जगप्रसिद्ध झाले. खाँसाहेबांनी संगीतात केलेल्या अजोड कामगिरीला आजही सगळे लवून सलाम करतात, याचे कारण संगीताच्या क्षेत्रात ते अभिव्यक्त करण्यासाठी एका स्वतंत्र शैलीला म्हणजे घराण्याला जन्म देणे हे अतिशयच कठीण काम. त्यासाठी असामान्य बुद्धिमत्ता आणि कमालीची सर्जनशीलता अंगी हवी. अल्लाउद्दीन खाँ यांना हे साध्य झाले. अन्नपूर्णा देवी या त्यांच्या कन्या. त्यांचा जन्मच मुळी स्वरांच्या सान्निध्यात झाला. त्यांचे सगळे जगणे त्या स्वरांशीच निगडित झाले.  सूरबहार हे वाद्य हाती आले, तेव्हापासून अन्नपूर्णा देवींनी त्यावर हुकमत मिळवण्याची जी जिद्द दाखवली, त्याला तोड नाही. परिसरातील सामाजिक वातावरणात महिला कलावंत म्हणून प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता हळूहळू निर्माण होत असताना, अन्नपूर्णा देवी यांनी आपली सारी प्रतिभा पणाला लावत संगीताच्या क्षेत्रात पाऊल टाकले. वडील बाबा अल्लाउद्दीन खाँ, बंधू अतिशय सर्जनशील असलेले सरोद वादक अली अकबर खाँ आणि शिकत असतानाच्याच काळात प्रेमात पडून विवाह झालेले पती, ज्येष्ठ सतारवादक पंडित रविशंकर. अशा वातावरणात या कलावतीने त्या काळातील रसिकांच्या भुवया सतत उंचावत ठेवल्या. रविशंकर आणि अन्नपूर्णा देवी यांच्यातील प्रतिभेचा संवाद खुंटला आणि अन्नपूर्णा देवींनी स्वत:ला कोशात गुरफटून घेतले. वाद्य जाहीर मैफिलीत कधीच हाती धरले नाही, पण आपल्या प्रतिभेचा धाकही कधी कमी होऊ दिला नाही. मोजक्या शिष्यांना आपल्याजवळचे ज्ञान मुक्तपणे देऊन त्यांनी संगीतातील आपली परंपरा मात्र पुढे सुरू ठेवली. संगीतात भिजूनही कोरडे राहण्याच्या या त्यांच्या संतप्रवृत्तीमुळेच त्यांच्याभोवती एक वलय तयार झाले. पण त्यांनी मात्र त्याकडे ढुंकूनही न पाहता आपली कलासाधना सुरूच ठेवली. त्यांच्या निधनाने एक फार मोठी कलावती आणि गुरू काळाच्या पडद्याआड गेली आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Annapurna devi indian music performer
First published on: 15-10-2018 at 02:59 IST